रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय?

रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे आपल्या शरीराला अशी शक्ती मिळते की, ज्यामुळे आपल्या शरीराचे विविध प्रकारच्या संसर्गजन्य जीवाणू, विषाणू यासारख्या हानिकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक प्रणालीला Immune system असे म्हणतात. तर रोगप्रतिकार शक्तीला immunity असे म्हणतात.

Table of Contents

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे –

जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर, अशावेळी आपण सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांना सहज बळी पडतो. तेच जर आपली प्रतिकारशक्ती मजबूत असल्यास आपल्याला सहजासहजी असे आजार होत नाहीत. immunity मुळे एकप्रकारे संरक्षणात्मक कवच आपल्या शरीराला मिळते. कारण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून लढण्यास मदत होत असते. यासाठी निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते.

रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची कारणे –

अनेक कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • निकृष्ट आहार घेण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
  • कुपोषण,
  • अपुरी झोप,
  • मानसिक ताण तणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते,
  • दारू, सिगारेट तंबाखू यासारखी व्यसने,
  • आजारपण,
  • कॅन्सरवरील केमोथेरपी सारख्या औषधांमुळे,
  • आमवात (RA), टाइप1 मधुमेह, सोरायसिस, मल्टिपल स्क्लेरोसिस, ल्युपस, एडिसन रोग, एचआयव्ही किंवा एड्स अशा Autoimmune आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय –

योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप अशा हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे सोपे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

1) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घ्यावा.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषकघटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, विविध फळे, सुखामेवा, विविध धान्ये, कडधान्ये, दूध, दही, ताक, अंडी, मांस, मासे, आंबवलेले पदार्थ यांचा आहारात समावेश असावा. कारण यात व्हिटॅमिन, खनिजे, क्षार, फायबर्स, हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स आणि अँटिऑक्सिडंट्स ही महत्वाची पोषकतत्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेटेड राहिले पाहिजे यासाठी दिवसभरात पुरेसे पाणीही प्यावे. साधारण आठ ते दहा ग्लास पाणी दिवसभरात पिणे आवश्यक असते.

2) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चुकीच्या आहार पदार्थांपासून दूर राहावे.

सतत तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, चरबी वाढवणारे पदार्थ, जंकफूड, फास्टफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, चिप्स, स्नॅक्स, बिस्किटे खाणे टाळावेत.. कारण अशा निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे लठ्ठपणा, डायबेटिस सारख्या समस्या होत असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अशा चुकीच्या आहार पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

3) रोगप्रतिकार शक्ती टिकवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे.

दारू, अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा सर्वच व्यसनांनी आपले आरोग्य धोक्यात येते. ह्या व्यसनानी आपले शरीर आतून पोखरत असते. यासाठी जर आपणास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायची असेल तर, अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.

4) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

नियमित व्यायाम केल्याने शरीर मजबूत होत असते. पर्यायाने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होण्यास व्यायामाने मदत होते. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. व्यायामामध्ये जोरात चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग, दोरीउड्या, मैदानी खेळ यांचा समावेश करू शकता.

5) रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तणावापासून दूर राहा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मानसिक तणाव आणि चिंता यापासून दूर राहणे गरजेचे असते. त्यामुळे कोणताही मानसिक तणाव घेऊ नये. तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासावा, मनोरंजनाचा आनंद घ्यावा, फिरायला जावे किंवा ध्यान धारणा करावी.

6) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.

रोगप्रतिकार शक्ती आणि झोपेचा खूप जवळचा संबंध असतो. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कामाबारोबच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे. पुरेशी झोप व विश्रांती घेतल्याने तुमची नैसर्गिक प्रतिकारशक्ती मजबूत होत असते. यासाठी दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. प्रौढांना 7 तासांची झोप गरजेची असते. तर किशोरवयीनांना 8-10 तास आणि लहान बालकांना 14 तासांपर्यंत झोपेची आवश्यकता असते.

7) रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी स्वच्छतेचा अवलंब करावा.

स्वच्छता किती महत्वाची आहे ते आपण सर्वांनीच ‘कोरोना’मध्ये अनुभवले आहे. अस्वच्छतेमुळे अतिसार, गॅस्ट्रो, उलट्या, डेंग्यू, मलेरिया असे असंख्य साथीचे रोग होत असतात. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती कमजोर होऊन आरोग्य बिघडत असते. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहून रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय –

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C महत्वाचे असते. त्यामुळे व्हिटॅमिन-C असणारी आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे खावीत.
  • हेल्दी फॅट्स म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यासारखी पोषकातत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेची असतात. यासाठी अक्रोड, काजू, बदाम यासारखे ड्रायफ्रूट्स (सुखामेवा) खाण्यात असावेत.
  • दही, ताक, इडली, डोसा यासारखे प्रोबायोटिक घटक असणारे पदार्थ आहारात असावेत.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्लासभर दुधात अर्धा चमचा हळद घालून ते दूध प्यावे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय उपयोगी पडतो.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हर्बल टी प्यावा. हर्बल टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात लसूण, हळद, काळी मिरी, जिरे यांचा आवर्जून समावेश करावा.

आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

हे सुध्दा वाचा – लसूण खाण्याचे फायदे जाणून घ्या.

Read Marathi language article about Home remedies and Tips for improving immunity power. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.