सोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती

2901
views

Psoriasis in Marathi information. Psoriasis causes, symptoms, types in Marathi. Psoriasis treatment in Marathi.

सोरायसिस म्हणजे काय..?
सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. इतर अन्य त्वचारोगांसारखाच सुरुवातीला वाटणारा हा त्वचारोग मात्र यावर वेळीच योग्य उपचार न केल्यास प्रसंगी गंभीर परिणाम उदभवू शकतात. आपणास त्वचेच्या कुठल्याही भागावर पुरळ किंवा चट्टे दिसल्यास जवळच्या त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डोक्यावरील त्वचा, गुडघे, कोपर, कंबर, पाठ, कानामागे येथे सुरुवातीला सोरायसिसचे चट्टे दिसू लागतात. नंतर ते वाढत जातात. मात्र योग्य औषधोपचाराने सोरायसिस काबूत ठेवता येतो.

यात त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन प्रचंड खाज सुटते. त्वचा जाड होते व त्वचेत सफेद चंदेरी रंगाचे खवले सैलसर चिकटलेले असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाजवल्यानंतर भुशाप्रमाणं खाली पडतात. त्वचेच्या बाह्यपेशींचं फारच जलदगतीनं विभाजन झाल्यामुळे त्वचा जाड होते. पातळ पापुद्रयासारखे खवले निघतात.

सोरायसिसची कारणे :
हा रोग संसर्गजन्य नाही. शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा रोग होतो. सोरायसिस या आजारात रक्तामधील पांढऱ्या पेशींपैकी ‘टी’ लिम्फोसाइटमध्ये काही बदल होऊन त्याचा परिणाम त्वचेच्या अस्तरामधील पेशींमध्ये होतो. यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा कमी वेळ लागतो आणि खवल्यांप्रमाणे जाडीभरडी त्वचा तयार होऊन लालसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसू लागतात. तसंच या चट्टय़ांवर रुपेरी पांढरट पापुद्रेही येतात.

या आजाराचं दुसरं कारण आहे आनुवंशिकता. सोरायसिसच्या 30 टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिकता हे कारण आढळून आलं आहे. जर आई-वडील दोघंही सोरायसिसनं आजारी असतील, तर मुलाला सोरायसिस होण्याची शक्यता 30 टक्क्यांनी वाढते.

 

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

सोरायसिसचे प्रकार आणि लक्षणे :
सोरायसिसचे एकूण आठ प्रकार आहेत.
1) प्लाक सोरायसिस – संपूर्ण शरीरावर मोठ्या आकाराच्या सोरायसिसच्या चट्ट्यांना प्लाक सोरायसिस म्हणतात. त्वचा जाड व कोरडी होते. खूप खाज येते. पांढरा कोंडा भरपूर पडतो. रोगाची सुरवात सांध्यांभोवती होते. उदा. हाताचे ढोपरे, गुडघ्यात हा प्रकार सर्वांत जास्त आढळून येतो.

2) गटेट सोरायसिस – संपूर्ण शरीरावर छोट्या-छोट्या थेंबांप्रमाणे येणा-या सोरायसिसला गटेट सोरायसिस म्हणतात. त्यांना खाज कमी असते व कोंडाही कमी पडतो. रोगाची सुरवात पाठ, छातीपासून होते.,

3) पस्टुलर सोरायसिस – संपूर्ण शरीरावर पसरलेल्या सोरायसिसमध्ये जेव्हा पू किंवा पाणी भरलेले लहान पुरळ दिसतात त्याला पस्टुलर सोरायसिस म्हणतात. त्वचेला सूज येते. त्वचेतून पाणी व पू निघतो. त्वचेला तडे जातात. खवले पडण्याचे प्रमाण जास्त असते.

4) इन्व्हर्स सोरायसिस – रोगाची सुरवात सांध्यांच्या खोबणीत होते. काखेमध्ये, जांघेमध्ये व इतर झाकून राहणाऱ्या या भागांमध्ये होणा-या सोरायसिसला इन्व्हर्स सोरायसिस म्हणतात. या प्रकारात त्वचेला जास्त प्रमाणात सूज येते व खवलेही पडतात. अशा जागांमध्ये सतत घाम येतो व तो पुसला न गेल्यामुळे ते भाग ओलसर राहतात.

5) डोक्याचा सोरायसिस – यामध्ये फक्त डोक्यावरच लालसर चट्टे येतात. त्यावर पांढ-या रंगाची खवले असतात.

6) नखांचा सोरायसिस – सोरायसिसच्या रुग्णांमध्ये नखे काळीनिळी पडतात व वेडीवाकडी होतात याला नेल सोरायसिस म्हणतात. नखांमध्ये वेदना होतात, पण खवले पडत नाहीत.

7) पाल्मोप्लँटर सोरायसिस – फक्त तळहात व तळपायावर येणा-या सोरायसिसला पाल्मोप्लँटर सोरायसिस असे म्हणतात.

8) सोरियाटिक आथ्रायटिस – त्वचेबरोबर काही वेळा सोरायसिस रुग्णांना संधिवात होतो याला सोरायाटिक आथ्रायटिस असे म्हणतात.
त्वचेच्या सोरायसिसमुळे सांध्यांना संधिवाताप्रमाणे सूज येऊ लागते. सुरवात लहान सांध्यांपासून होते. उदा. पायाचा अंगठा, हाताचे बोट. सांध्यांच्या सोरायसिसमध्ये सांधे पूर्णपणे झिजतात. ही झीज कायम स्वरूपाची असते. त्यामुळे हातापायाची बोटे वाकडी होतात. सांधे चिकटतात व कायमस्वरूपी निकामी होतात.

सोरायसिसवर उपचार करताना नेमका प्रकार कोणता आहे हे विचारात घेणे गरजेचे असते. प्रकारानुसार उपचारांमध्ये बदल करावा लागतो.

 

सोरायसिस कसा आटोक्यात ठेवाल..?

  • मानसिक ताणतणाव कमी करा. त्यासाठी योगासनं, प्राणायाम हे प्रकार खूप फायदेशीर ठरू शकतात.
  • दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहा.
  • पित्त वाढविणाऱ्या तेलकट, आंबट, खारट पदार्थांपासून दूर राहा.
  • ज्या-ज्या ठिकाणी त्वचेला इजा पोहोचते, तिथे सोरायसिसचा आजार असण्याची वा आधी होऊन गेलेला असल्यास तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे छोटया-मोठया जखमांपासून सावध राहा.
  • सुती, मऊ आणि सैलसर कपडे वापरा.
  • महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही बाहेरची औषधं स्वत:च्या मनानं वापरू नका. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर अचानकपणे स्वत:च्या मनानं बंदही करू नका. काही औषधांमुळेही सोरायसिसचा आजार बळावतो. जसं की, मलेरियाची औषधं, वेदनाशामक औषधं, उच्चरक्तदाब कमी करण्याची औषधं,मानसिक आजारांवरील औषधं. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही बाहेरची औषधं स्वत:च्या मनानं वापरू नका.

हिवाळयात या आजाराचं प्रमाण वाढतं. थंडीच्या दिवसात त्वचा शुष्क होत असल्यामुळे जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. तर उन्हाळयात कमी होतं. परंतु कधी-कधी जास्त सूर्यप्रकाशही हानिकारक ठरू शकतो. उन्हामध्ये हिंडताना आपल्या त्वचेची काळजी घ्या.

 

सोरायसिस उपचार :
आयुर्वेद आणि होमिओपॅथिक शास्त्रात सोरायसिसवर प्रभावी उपचार आहेत. सोरायसिसवर अधिक प्रभावीपणे उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली संयुक्त उपचार पद्धत विकसित झाली आहे.
चट्टय़ांची जाडी व पापुद्रे कमी करण्यासाठी विविध ऑइलमेन्ट्स, तेले, लोशन्स आज उपलब्ध आहेत.
या उपचारांबरोबरच सूर्यकिरणोपचार किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणोपचार तसेच अत्याधुनिक टारगेटेड फोटोथेरपी हे उपचारही सोरायसिसवर उपयुक्त ठरतात. नॅरो बॅण्ड अल्ट्राव्हायोलेट किरणोपचार हे अतिशय सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहेत.

सोरायसिस हा त्वचारोग संसर्गजन्य नाही. या रोगापासून जिवाला कसलाच धोका नसतो.
थोडा संयम राखल्यास, नियमित योग्य औषधोपचार आणि सकारात्मक विचार घेतल्यास या सोरायसिसवर नक्कीचं मात करता येईल.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.