मधुमेह – Diabetes mellitus :

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज आपल्या देशातील तब्बल सात कोटींच्या आसपासचे लोक हे मधुमेहाने त्रस्त आहेत.

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.

मधुमेह किंवा डायबेटीसमध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनचा वापर करण्यासाठीची यंत्रणा असमर्थ ठरते. यामुळे मधुमेहात रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढते.

डायबेटीस होतो म्हणजे शरीरात नेमके काय-काय होते..?
1) स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती कमी प्रमाणात होते किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत.
2) रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.
3) रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते.
4) साखरेचे शरीरात व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही.
5) वाढलेली साखर कोणत्याही कार्याशिवाय मुत्रातून बाहेर टाकली जात असते.
6) मधुमेहाचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्या, किडन्या, हृदय, डोळे, मेंदू- मज्जासंस्था (nervous system) यावर सतत होऊ लागतो.

मधुमेहाचे प्रकार (Types of diabetes) :

मधुमेहाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
(1) टाईप-1 मधुमेह
(2) टाईप-2 मधुमेह
(3) गरोदरपणातील मधुमेह (Gestational Diabetes)

टाईप-1 मधुमेह :
हा मधुमेह प्रकार जास्त धोकादायक असून Type-1 मधुमेह प्रकारचे रुग्ण कधीही डायबेटीस पासून बरे होत नाहीत. त्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होत नाही. यासाठी त्यांना नेहमी बाहेरून इन्सुलिन इंजेक्शन घेणे गरजेचे असते.

टाईप-2 मधुमेह :
अयोग्य आहार, बैठी जीवनशैली यामुळे वजन जास्त प्रमाणात वाढल्याने इन्सुलिन निर्मितीवर परिणाम झाल्याने Type-2 मधुमेह होतो. टाईप-2 मधुमेह रुग्ण हे योग्य आहार आणि नियमित व्यायाम या उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. तसेच त्यांना गोळ्यांची किंवा इन्सुलिनचीही गरज भासू शकते.

गरोदरपणातील मधुमेह :
प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास ह्या प्रकारचा मधुमेह होत असतो. यावर इन्सुलिन इंजेक्शनद्वारे नियंत्रण ठेवले जाते. गरोदरपणात मधुमेह झालेल्या साधारण 80% स्त्रियांची ग्लुकोज लेव्हल बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. तर काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतरही मधुमेह राहू शकतो. गरोदरपणातील मधुमेहविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

प्री-डायबेटिस किंवा मधुमेह पूर्व अवस्था म्हणजे काय..?

कोणत्याही लक्षणाशिवाय डायबेटीस आपल्या शरीरात छुपलेला असतो. रक्तातील साखरेची तपासणी केल्यास ती टाईप-2 डायबेटीस पेक्षा थोडी कमी असते. तेंव्हा त्या अवस्थेस Prediabetes असे म्हणतात. ही अवस्था म्हणजे धोक्याची एक घंटाच असून या अवस्थेत योग्य आहार व नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. मात्र जर प्री-डायबेटिस असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा योग्य आहार व व्यायाम न केल्यास टाईप-2 प्रकारचा डायबेटीस होतो.

मधुमेह होण्याची कारणे (Diabetes causes) :

टाईप-1 मधुमेहाची कारणे :
टाईप-1 मधुमेह हा एक autoimmune आजार आहे. टाइप-1 डायबिटीज हा प्रामुख्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे, स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यानर होतो. टाईप-1 मधुमेहमध्ये आपलीच इम्यून सिस्टीम ही आपल्याच शरीरातील स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशीवर हल्ला करतात. त्यामुळे शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिनची निर्मिती होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहत नाही. पर्यायाने टाईप-1 प्रकारचा मधुमेह होतो. साधारण 10 टक्के रुग्ण हे ह्या प्रकारच्या मधुमेहाचे असतात.

टाईप-2 मधुमेहाची कारणे :
इन्सुलिनमुळे रक्तातील साखर ही शरीरातील पेशींपर्यंत जात असते. त्यामुळेच शरीराला ऊर्जा मिळत असते. मात्र टाईप-2 प्रकारच्या मधुमेहात शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर पेशिंपर्यंत योग्यरीत्या जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते आणि पर्यायाने डायबेटिस होतो. तसेच टाईप-2 डायबेटिसमध्ये पुढील स्थितीत इन्सुलिन स्त्रावाच्या निर्मितीवर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाही.

टाईप-2 मधुमेहाची सहाय्यक कारणे कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

 • लठ्ठपणा हे टाइप-2 मधुमेहाचे प्रमुख कारण ठरत आहे. आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये जास्त वजन वाढल्यामुळे इन्सुलिन निर्मितीस बाधा पोहोचून टाईप-2 मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे.
 • अनुवांशिकतेमुळे टाईप-2 मधुमेह होऊ शकतो. कुटुंबातील आजी, आजोबा, आई, वडील यांपैकी कुणालातरी मधुमेह असल्यास अनुवांशिकतेमुळे मधुमेह होऊ शकतो.
 • अयोग्य आहारामुळे, जास्त कॅलरीयुक्त आहार, फास्टफूड, जंकफूड, मिठाई, बेकरीचे पदार्थ, शीतपेये, तेलकट पदार्थ यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे,
 • भरपेट जेवण करण्याच्या सवयीमुळे, भूक लागली नसतानाही सतत खात राहण्याच्या सवयीमुळे,
 • बैठी जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्ती,
 • व्यायामाचा अभाव,
 • मानसिक ताणतणाव,
 • ज्या स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह झाला असल्यास त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना पुढील पाच ते पंधरा वर्षांत टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता असते.
 • जन्मतः 3.5 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये योग्य काळजी न घेतल्यास भविष्यात टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

मधुमेहाची लक्षणे (Diabetes symptoms) :

मधुमेह हा आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे त्याची प्रत्येकवेळी लक्षणे दिसतीलचं असेही नाही. मधुमेहाची लक्षणे ही रक्तातील साखरेची चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. मधुमेहात खालील लक्षणे जाणवू शकतात.

 • वारंवार लघवीला जावे लागणे,
 • वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
 • अचानकपणे वजन घटणे,
 • अशक्तपणा, चक्कर येणे,
 • अधिक भूक लागणे,
 • हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
 • डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
 • मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
 • जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
 • मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

डायबेटीसचे असे करतात निदान :

मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण फास्टिंग शुगर टेस्ट किंवा पीपी शुगर टेस्टद्वारे तपासले जाते.

फास्टिंग शुगर टेस्ट –
ही चाचणी उपाशीपोटी केली जाते.

 • नॉर्मल प्रमाण – 70 ते 99 mg/dL पर्यंत.
 • प्री-डायबेटीस अवस्था – 100 ते 126 mg/dL पर्यंत.
 • मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर 126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.

पीपी शुगर टेस्ट (Post Prandial test) –
जेवणानंतर ही चाचणी केली जाते.

 • नॉर्मल प्रमाण – 140 mg/dL च्या आत असणे.
 • प्री-डायबेटीस अवस्था – 140 ते 200 mg/dL पर्यंत.
 • मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर 200 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.

डायबेटीसमुळे होणारे दुष्परिणाम :

मधुमेह असूनही रक्तातील साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या हृद्य, डोळे, किडनी, मेंदू आणि नाड्यांवर (मज्जासंस्थेवर) होतो त्यामुळे अनियंत्रित डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येणे, डोळे जाऊन अकाली अंधत्व येणे, किडन्या निकामी होणे, पक्षाघात (लकवा) किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी होऊन पाय कापून काढावा लागणे असे अनेक गंभीर दुष्परिणाम यामुळे होतात.

डायबेटीस आणि हार्ट अटॅक :
डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

डायबेटीस आणि किडन्या फेल होणे :
योग्य उपचारांनी मधुमेह कंट्रोलमध्ये न ठेवल्यास किडनीच्या कार्यावर वाईट परिणाम होऊन किडन्या निकामी होऊ शकतात. यासाठी किडन्या फेल होण्याची लक्षणे जाणून घ्या..

मधुमेह आणि त्यावरील उपचार (Diabetes treatments) :

मधुमेहावरील उपचाराचे चार प्रमुख उद्देश आहेत –
1) रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे.
2) डायबिटीजच्या दुष्परिणामापासून रुग्णाचा बचाव करणे.
3) वजन आटोक्यात ठेवणे.
4) उच्चरक्तदाब, हृद्यविकार यासारखे विकार होऊ न देणे.

योग्य आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचारामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी मधुमेही रुग्णांनी त्यांचे आहार, व्यायाम आणि उपचारांचे नियोजन पुढीलप्रमाणे ठेवावे.

(1) मधुमेह आणि आहार नियोजन –

 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणता आहार घ्यावा, कोणता घेऊ नये यासाठीचे डायट चार्ट बनवून घ्यावे.
 • डॉक्टरांनी सुचवलेला आहार वेळच्या वेळी घ्यावा.
 • वेळेवर आहार न घेतल्यास मधुमेही रुग्णांमध्ये ‘हायपोग्लायसेमिया’ होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता असते. यासाठी आहाराच्या वेळा पाळणे मधुमेहींसाठी अत्यंत गरजेचे असते.
 • मधुमेही रुग्णांनी दर चार तासांनी थोडे-थोडे खाणे आवश्यक असते. एकावेळीचं भरपेट जेवणे टाळा.
 • कमी कॅलरीजचा आहार घ्यावा. आहारात गरजेपेक्षा जास्त उष्मांक असल्यास त्यांचं रूपांतर चरबीत होते. यामुळे लठ्ठपणा होऊन इन्सुलिन निर्मितीस बाधा येते.
 • हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, हातसडीचा तांदूळ यांचा आहारात समावेश करावा. यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ती मधुमेहामध्ये जास्त उपयुक्त ठरतात.
 • मधुमेही रुग्णांनी साखरेचे गोड पदार्थ, विविध मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट (बिस्किटे, पाव, केक इ.), तेला-तुपाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, चरबीजन्य पदार्थ, कंदमुळे (बटाटा, रताळी इ.), जास्त गोड फळे (आंबा, फणस, चिक्कू, केळी इ.) आणि खारट पदार्थ खाऊ नयेत.

(2) मधुमेह आणि व्यायाम –

 • डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम (Excercise workout tips) नियमितपणे करावा.
 • नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
 • व्यायामामध्ये चालणे, पळणे (जॉगिंग), सायकलिंग यासारखे व्यायाम करू शकता.
 • दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
 • व्यायाम करताना शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • व्यायामामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
 • रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळावे.
 • सततची बैठी जीवनशैली टाळावी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे.
 • मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.
 • धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

(3) मधुमेह आणि औषध उपचार –

 • मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांकडूनचं उपचार करून घ्या.
 • स्वतःच्या स्वतः ऐकीव माहितीवर किंवा जाहिरात पाहून घरगुती उपाय करत बसू नका.
 • मधुमेहावरील उपचारासाठी आपले डॉक्टर रुग्णाची प्रकृती, मधुमेहाचा प्रकार, रक्तातील साखरेचे प्रमाण विचारात घेऊन मधुमेहावरील गोळ्या किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन देतील.
 • डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्यावीत.
 • नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी.
 • डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यामध्ये रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

Read Marathi language article about Diabetes Symptoms, Causes, Diagnosis test, Prevention and Treatment options. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Join the Conversation

3 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *