Dr Satish Upalkar’s article about Urticaria in Marathi.

अंगावर पित्त उठल्यावर काय उपाय करावे याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

अंगावर पित्त उठणे –

शीतपित्ताचा त्रास अनेकजणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काहीवेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.

शीतपित्त म्हणजे काय – Urticaria in Marathi :

अंगावर पित्त उठणे या समस्येला आयुर्वेदात ‘शीतपित्त’ ह्या नावाने संबोधलेले आहे. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला ‘शीतपित्त’ असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया (Urticaria) किंवा Hives असे म्हणतात तर बोलीभाषेत ‘अंगावर पित्त उठणे’ असे म्हंटले जाते.

अंगावर पित्त उठण्याची कारणे –

प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात.

कशामुळे अंगावर पित्त येते ..?

कोणकोणत्या पदार्थांमुळे ऍलर्जी होऊन अंगावर पित्त उठू शकते याची माहिती खाली दिली आहे.

 • काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, शेलफिश, मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ वैगेरे खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. असा पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पित्त उठते.
 • विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते.
 • घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते.
 • थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते.
 • सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते.
 • धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे,
 • टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास,
 • तसेच पोटामध्ये कृमी व जंत झाल्याने, कीटक चावल्याने किंवा सर्दीसारखे इन्फेक्शन झाल्यामुळेही अंगावर पित्त उठू शकते.

शीतपित्ताची लक्षणे – Hives symptoms :

 • अंगावर खाज येणे,
 • अंगावर पित्त उठणे,
 • त्वचेवर सूज असणाऱ्या लालसर गांधी किंवा चकते उठणे अशी लक्षणे शीतपित्तामध्ये असतात.

या त्रासात आलेल्या पिताच्या गांधी व अंगाला होणारी खाज काहीवेळात आपोआप कमी होत असतात. मात्र पुन्हा ऍलर्जी असणाऱ्या पदार्थाच्या संपर्कात आल्यास पुन्हा अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्त उठते.

शीतपित्त उपचार – Urticaria treatments in Marathi :

शीतपित्त किंवा अंगावर पित्त येणे हा त्रास एखाद्या पदार्थाच्या ऍलर्जीमुळे होत असतो. त्यामुळे नेमक्या ऍलर्जीचा ट्रिगर ओळखून त्यापासून दूर राहिल्यास हा त्रास दूर होत असतो. म्हणजे जर एखाद्यास शेंगदाणे खाल्ल्यानंतर असा त्रास होत असल्यास, त्याने शेंगदाणे खाणे बंद केल्यास हा त्रास होणे थांबते.

यासाठी नेमकी कशाची ऍलर्जी आहे ते ओळखणे शीतपित्तामध्ये आवश्यक असते. वर दिलेल्या ट्रिगरचा आधार घेऊन आपल्याला कशामुळे हा त्रास होत आहे ते ठरवू शकता. किंवा थोडे निरीक्षण ठेवल्यास, कशामुळे अंगावर पित्त उठले ते समजू शकेल. यासाठी तुम्ही एक लिस्ट बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही रोज घेत असलेल्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांंची नावे लिस्टमध्ये लिहा. त्यानंतर कोणता पदार्थ खाल्यावर त्रास होतो हे आपल्या निरीक्षणातून ओळखणे सोपे जाईल. खाद्यपदार्थांची ऍलर्जी नसल्यास ऊन, उष्ण किंवा थंड वातावरण, कपडे, घरातील पाळीव प्राणी यापैकी कशाची ऍलर्जी आहे ते ही निरीक्षणातून ओळखू शकता.

आणि ज्या पदार्थाची ऍलर्जी आहे असे वाटल्यास काही दिवस त्यापासून दूर राहून त्रास कमी होतो की नाही ते पाहावे. ऍलर्जी असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्यास निश्चितच आपला त्रास कमी होतो.

काही जणांना हा त्रास अनेक महिने ते अनेक वर्षेही होऊ शकतो. अनेकजण शीतपित्त उपचारासाठी अँटी-हिसटामीन औषधे घेतात. अशा औषधामुळे खाज तात्पुरती कमी होते मात्र पुन्हा शीतपित्ताचा त्रास उदभवतो. बहुतांशी लोक अंगावर गांधी उठून खाज सुरू झाली की सेट्रीझिन किंवा Ebastine अशा गोळ्या घेतात. याने खाज थांबते आणि तात्पुरते बरे वाटते; पण या औषधांचे दीर्घकालीन दुष्परिणामही अधिक आहेत. कारण या औषधांच्या अधिक सेवनामुळे शरीरातील सर्व स्राव अचानक शोषल्यासारखे होतात. तोंड, घसा कोरडा पडतो. झोप जास्त लागते. किडनीचे आजार उदभवतात म्हणून या आजारावर अशा गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करण्याऐवजी याला मुळापासून बरे केले पाहिजे.

मुळापासून हा त्रास घालविण्यासाठी शीतपित्ताचे मूळ कारण म्हणजे ऍलर्जी असणारा पदार्थ दूर ठेवणे हाचं आहे. असे पदार्थ शोधणे व त्यापासून दूर राहणे हाचं अंगावर पित्त उठणे यावरील सर्वोत्तम उपचार आहे.

अंगावर पित्त येणे यावरील आयुर्वेदिक औषध उपचार –

अंगावर पित्त उठणे यावर आयुर्वेदात प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. या त्रासाला आयुर्वेदात ‘शीतपित्त’ या नावाने वर्णिले आहे. शीतपित्तामध्ये हळद खूप गुणकारी असते. हळदीपासून बनवलेले हरिद्रा खंड हे चूर्ण स्वरूपातील औषध अंगावर पित्त उठणे यावर प्रभावी आहे. हरिद्रा खंड हे आयुर्वेदिक औषध मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असते. याशिवाय आरोग्यवर्धीनी वटी, कामदुधा रस ही आयुर्वेदिक औषधे शीतपित्तामध्ये उपयोगी पडतात. त्यामुळे अंगावर पित्त येणे हा त्रास असल्यास जवळच्या आयुर्वेदतज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेऊ शकता.

अंगावर पित्त उठल्यावर हे घरगुती उपाय करावे –

 • अंगावर पित्त उठल्यास आमसुले पाण्यात भिजवून ते पाणी अंगास लावावे.
 • अंगावर पित्त उठल्यावर तेथे कोमट केलेले खोबरेल तेल लावावे यामुळे लगेच बरे वाटेल.
 • अंगावर पित्त आल्यावर तेथे हळदीचा लेप लावल्यास होणारी खाज कमी होऊन आराम पडतो.
 • बेकिंग सोड्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करावी. अंगावर पित्त झाल्यास तेथे बेकिंग सोड्याची पेस्ट लावावी. व थोड्यावेळाने थंड पाण्याने धुवून काढावे.
 • अंगावर पित्त झाल्यावर तेथे एलोवेरा जेल लावल्याने आराम मिळतो.
 • अंगाला खाज येऊन पित्त उठल्यास अंगाला करंज तेल चोळावे. ज्यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाज कमी होते.

अंगावर पित्त उठणे यावर वरील घरगुती उपाय तुम्ही करू शकता. त्यामुळे या त्रासात अंगाला होणारी खाज कमी होण्यासाठी मदत होते.

वरचेवर अंगावर पित्त उठत असल्यास घ्यायची काळजी –

 • खाज कमी करणाऱ्या अँटी-हिसटामीन गोळ्या औषधे वारंवार खाणे टाळावे.
 • नेमकी कशाची एलर्जी आहे ते शोधून त्यापासून दूर राहा.
 • अंगावर खाज येत असल्यास अंग खाजवणे टाळावे.
 • सॉफ्ट साबण वापरावा.
 • सुती व सैलसर कपडे वापरावीत.
 • पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे. एरंडेल तेल चमचाभर रात्री झोपताना घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते.
 • जंत व कृमींचा त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने जंतनाशक गोळ्या घ्या.

शीतपित्त आणि आहार – Urticaria diet chart :

शीतपित्ताचा त्रास असल्यास काय खावे व काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.

अंगावर पित्त उठत असल्यास काय खावे ..?

 • वरचेवर शीतपित्ताचा त्रास होत असल्यास आहारात तूप घालून वरण भात खावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा यामध्ये खूप चांगला उपयोग होतो.
 • दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
 • केळी, डाळींब ही फळे खावीत.
 • रोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात एक छोटा चमचा जिरे व धणे घालून ठेवावेत व सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्यावे.

अंगावर पित्त झाल्यावर काय खाऊ नये ..?

 • पित्त वाढवणारे पदार्थ जसे आंबलेले दही, चहा-कॅाफी, बेसन, पापड, ब्रेड, लोणचे, जास्त खारट-तिखट पदार्थ खाऊ नये.
 • ‎मद्यपान, तंबाखू व धुम्रपान पूर्णपणे बंद करावे.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..

4 Sources

In this article information about Urticaria Causes, Symptoms, Treatments, Ayurvedic medicine and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...