पोटात जंत होणे – Intestinal Worms :
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 241 दशलक्ष (68 टक्के) बालकांना दरवर्षी जंत व कृमींची लागण होत असते. अस्वच्छता, माती, दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून जंत-कृमींचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांप्रमाणे प्रौढ व्यक्तींमध्येही कृमीचा त्रास होत असतो.
जंत हे आतड्यात राहून त्यांची संख्या वाढवतात आणि आपल्या शरीरातील आहाररस, महत्वाची पोषकद्रव्ये, खनिजतत्वे, व्हिटॅमिन्स शोषून घेतात. परिणामी जंतामुळे ऍनिमिया (रक्तक्षय), जीवनसत्त्वाचा अभाव, कुपोषण व रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची समस्या निर्माण होते. कृमींमुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुटते व त्यामुळे कृमी व जंताच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत.
पोटात जंत झाल्याची लक्षणे :
कृमी किंवा जंत पोटात असल्यास खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.
• पोटात दुखणे,
• जुलाब, उलटी व मळमळ होणे,
• पोट साफ न होणे,
• भूक मंदावणे,
• अशक्तपणा येणे,
• वजन कमी होणे,
• अंगावर आणि चेहऱ्यावर पुरळ, पांढरे चट्टे येणे,
• संपूर्ण शरीराची खाज होणे,
• गुदाभोवती खाज येणे, शौचातून रक्त पडणे व शौचातून जंत पडणे.
पोटातील जंतावर गोळ्या आणि औषधे :
कृमीच्या प्रकारानुसार वेगवेगळी औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार देण्यात येतात. मबॅडॉझॉल, अलबेन्डॅझॉल इ. कृमिनाशक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत केंद्र शासनामार्फत ‘अलबेन्डॅझॉल’ जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते. शासनस्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंगणवाडी, आरोग्य संस्था व शाळेमध्ये वर्षातून दोनवेळा बालकांना व लहान मुलामुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.
पोटात कृमी होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय :
• वैयक्तिक स्वच्छता राखावी.
• नखे आठवड्यातून एकदा कमी करावीत.
• जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
• दूषित अन्न, उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
• पालेभाज्या, फळे व कंदमुळे स्वच्छ धुऊनचं खावीत.
• दूषित पाणी पिऊ नये.
• बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे अशा साध्यासोप्या गोष्टीतून जंताचा त्रास होण्यापासून दूर राहता येते.
पोटात जंत झाले असल्यास हे करा घरगुती उपाय :
ओवा –
दिवासातून दोन वेळा अर्धा चमचा ओवा खाल्यामुळे पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते.
वावडिंग –
आयुर्वेदानुसार विडंग किंवा वावडिंग हे उत्तम कृमिनाशक आहे. कृमीचा त्रास असल्यास विडंग असणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. याशिवाय पाव चमचा ओवा आणि चमचा वावडिंग एकत्र करून चावून खाल्याने जंत कमी होण्यास मदत होते.
कडुनिंबाची पाने –
कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्यात मध घालून उपाशीपोटी खावे. कडुनिंब अँटीबायोटिक गुणांचे असून यामुळे पोटातील कृमी कमी होण्यास मदत होते.
लसूण –
कृमीचा त्रास असल्यास आहारात लसूणचा वापर करावा. सैंधव मीठ घालून लसूणची चटणी तयार करून खावी. यामुळेही कृमी कमी होतात.
हळद –
रोज सकाळी पाव चमचा हळद, पाव चमचा वावडिंग एकत्रित करून 2 महिने घेतल्यास पोटातील जंत कमी होतील.
लवंग किंवा दालचिनी –
वारंवार जंत होण्याची समस्या असल्यास जेवणानंतर एक-दोन लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चावून खावा.
योग्य आहार –
आहारात गाजर, कच्ची पपई, डाळिंब, लसूण, भोपळ्याच्या बिया, कारल्याचा रस, हळद यांचा समावेश करावा यामुळे कृमी कमी होण्यास मदत होते.
दररोज पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.