उलटी होणे – Vomiting :
उलटी होण्याचा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, दारू सारखे व्यसन अशा अनेक कारणांमुळे उलटी होऊ शकते. तसेच उलटी होणे हे अनेक आजारांमधील एक लक्षण ही असू शकते.
उलटी होण्याची कारणे – Vomiting causes :
• पचनसंस्थेतील गडबडी,
• जास्त प्रमाणात जेवल्यामुळे,
• अपचन झाल्यामुळे,
• अन्न विषबाधा झाल्याने (Food poisoning),
• पोटातील इन्फेक्शनमुळे विशेषतः पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे इन्फेक्शन होऊन जुलाब, अतिसार व उलट्या होत असतात,
• मायग्रेन डोकेदुखी, अल्सर किंवा पित्ताशयाच्या आजारांमुळे,
• काही औषधांच्या दुष्परिणामामुळे,
• दारूच्या व्यसनामुळे,
• अपुरी झोप, मानसिक ताणामुळे,
• गरोदरपणात सुरवातीच्या काही दिवसात मळमळ व उलट्या होत असतात,
• याशिवाय डोक्याला मार लागणे, ब्रेन ट्यूमर आणि अनेक प्रकारच्या कँसरमुळेही उलट्या होऊ शकतात.
उलटी कमी करण्याचे हे आहेत उपाय :
उलट्या सारख्या होत असल्यास शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी उलट्या होत असताना त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. यासाठी उलटी थांबवण्यासाठी घरगुती उपाय खाली दिले आहेत.
आले (अद्रक) –
एक चमचा आल्याचा रसात एक चमचा लिंबू रस मिसळावे. हे मिश्रण दिवसभरात वरचेवर प्यावे यामुळे उलटी होणे, मळमळणे कमी होते. याशिवाय आल्याचा तुकडा मधाबरोबर खाल्यानेही उलटी कमी होण्यास मदत होते.
कांद्याचा रस –
एक चमचा कांद्याच्या रसात एक चमचा आल्याचा रस मिसळावे. हे मिश्रण दिवसभरात वरचेवर प्यावे यामुळेही उलटी होणे, मळमळणे कमी होते. याशिवाय अर्धाकप कांदा रसात दोन चमचे मध मिसळून पिल्याने उलट्या कमी होतात.
लिंबू रस –
एक चमचा लिंबू रसात एक चमचा मध मिसळावे. ह्या मिश्रणाचे वरचेवर चाटण केल्यास मळमळ व उलटी होणे दूर होते.
दालचिनी –
एक कप उकळत्या पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर (cinnamon powder) घालून मिश्रण उकळून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात थोडे मध घालून प्यावे यामुळे उलटी थांबण्यास मदत होते.
लवंग –
मळमळ किंवा उलटी होत असल्यास काही लवंग दाढेत धरून चावत राहावे. पचनक्रियेस लवंग खूप उपयुक्त ठरते त्यामुळे उलटीचा त्रास यामुळे कमी होतो.
उलटीवरील औषधे :
उलट्या सतत होत असल्यास शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी सोडियम, पोटॅशियम ह्या क्षार घटकांचे शरीरातील प्रमाण कमी होते. यासाठी गरम करून थंड केलेले 1 लिटर पाण्यात 6 चमचे साखर व अर्धा चमचा मीठ मिसळून मिश्रण तयार करावे. यानंतर जेंव्हाजेंव्हा उलटी होईल तेंव्हातेंव्हा यातील थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होण्याचा धोका टाळतो.
याशिवाय यासाठी आपण पुरेसे पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडरही वापरू शकता. उलटीवर emeset (ondansetron) किंवा antacids ह्या औषध गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतील.
उलटी झाल्यावर असा घ्यावा आहार :
उलटीनंतर कोणता आहार घ्यावा, काय खावे, काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.
उलट्या झाल्यावर हलका, सहज पचणारा आहार घ्यावा. यासाठी वरणभात, सूप, चिरमोरे, लाह्या खाव्यात. संत्री, केळे, सफरचंद यासारखी फळे खावीत. पुरेसे पाणीही प्यावे. शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी पिऊ शकता.
तेलकट पदार्थ, तिखट, मसालेदार आणि पचनास जड पदार्थ खाऊ नयेत तसेच दारू पिणे टाळावे.
उलट्या होत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
उलट्या होणे हे एक साधारण लक्षण असले तरीही अनेकवेळा ते गंभीरही असू शकते. त्यामुळे उलट्या होण्याबरोबरच खालील लक्षणे असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जावे.
• एक दिवसाहून अधिक दिवस सतत उलटी होत असल्यास,
• वरील घरगुती उपाय करून उलट्या थांबत नसल्यास,
• अन्न विषबाधा झाल्याची शंका असल्यास,
• उलट्या होण्याबरोबरच जुलाब, अतिसार असल्यास,
• उलट्या होण्याबरोबरच पोटात जास्त दुखत असल्यास,
• लहान मुले, गरोदर स्त्रिया यामध्ये जास्त उलट्या होत असल्यास,
• रक्ताच्या उलट्या होत असल्यास वेळ वाया न घालता आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व उपचार करून घ्यावेत.
हे सुद्धा वाचा :
• मळमळ होण्याची कारणे व उपाय
• मायग्रेन डोकेदुखीमुळे होणाऱ्या उलट्यावरील उपाय