मूळव्याध होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार – Piles in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मूळव्याध – Piles in Marathi :

अनेकजणांना मूळव्याधचा त्रास होत असतो. मूळव्याध हा गुदभागाचा आजार आहे. मूळव्याधीला पाईल्स (piles) किंवा hemorrhoids असेही म्हणतात. मुळव्याधीच्या समस्येत गुदभागातील शिरा सुजतात, त्याठिकाणी वेदना, खाज व जळजळ होत असते. तसेच काहीवेळेस मूळव्याधीत शौचावाटे रक्तही पडत असते.

मूळव्याध होण्याची कारणे – Piles causes :

वेळी अवेळी जेवणे, पचनास जड असणारे पदार्थ सतत खाणे, बद्धकोष्ठता, तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बैठे काम, अनुवंशिकता, वाढलेले वजन ही मूळव्याधची प्रमुख कारणे आहेत.

बद्धकोष्ठता (constipation) होणाऱ्या व्यक्तींना शौचाला खडा धरण्याचा त्रास असल्यास मूळव्याध होण्याची शक्यता अधिक असते. कारण शौचाला खडा होण्यामुळे शौचाच्या वेळी गुदाच्या ठिकाणी अधिक ताण येतो. त्याचप्रमाणे प्रेग्नसीमध्येही काही स्त्रियांना मुळव्याध होण्याची अधिक शक्यता असते. गरोदरपणात होणाऱ्या बद्धकोष्ठतामुळे तसेच डिलिव्हरीच्या वेळेस जास्त जोर द्यावा लागल्यामुळे प्रेग्नन्सीत पाईल्स होण्याची शक्यता असते.

आहारातील तंतुमय पदार्थांच्या कमतरतेमुळे व चुकीचा आहार घेण्याची सवय असल्यास हा त्रास अधिक प्रमाणात होतो. चुकीचा आहार म्हणजे, जास्त तिखट, खारट व मसालेदार पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, चिकन, अंडी, फास्टफूड, जंकफूड असे पदार्थ सतत खाण्याच्या सवयी मूळव्याध होण्यास कारणीभूत ठरतात.

मुळव्याधची लक्षणे – Symptoms of piles :

मूळव्याध हा गुदभागाचा आजार असल्याने गुदभागी मुळव्याधची लक्षणे जाणवतात. यामध्ये गुदाच्या ठिकाणी कोंब येणे व मांसल गाठ येणे, त्याठिकाणी वेदना होणे. गुदाच्या ठिकाणी खाज, आग आणि जळजळ होणे तसेच काहीवेळा गुदावाटे रक्त पडणे अशी लक्षणे मूळव्याधीत असतात.

मूळव्याधचे प्रकार – Piles types :

मुळव्याधचे अंतर्गत मुळव्याध आणि बाह्य मुळव्याध असे मूळव्याधीचे दोन मुख्य प्रकार असतात.

अंतर्गत मुळव्याध –
अंतर्गत मुळव्याध (internal hemorrhoids) या प्रकारात गुदाच्या आतील बाजूस मुळव्याध कोंब येतात व आतील शिरा सूजलेल्या असतात. या प्रकरच्या मुळव्याधचे पुन्हा 4 स्टेजमध्ये वर्गीकरण केले जाते.

1) पहिली स्टेज –
यामध्ये गुदाच्या आत असणारे कोंब बाहेर येत नाहीत. तसेच यात रक्त येऊ शकते.

2) दुसरी स्टेज –
यामध्ये शौचाच्यावेळी गुदाच्या आत असणारे कोंब बाहेर येतात आणि आपोआप पुन्हा आत जातात.

3) तिसरी स्टेज –
यामध्ये शौचाच्यावेळी कोंब बाहेर येतात मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.

4) चौथी स्टेज –
यामध्ये आतील कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाहीत. तसेच ते कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात.

बाह्य मुळव्याध :
बाह्य मुळव्याध (external hemorrhoids) ह्या प्रकारात मूळव्याधचे कोंब गुदाच्या बाहेरच्या बाजूस येतात. तसेच हे कोंब सुजलेले व वेदनादायक असतात.

आयुर्वेदमध्येही मूळव्याधचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. ज्या मूळव्याधमध्ये कोंब येणे, खाज, आग व वेदना होणे अशी लक्षणे असतात मात्र त्यातून रक्त पडत नाही त्या मूळव्याध प्रकाराला ‘शुष्क अर्श’ असे म्हणतात. तर मूळव्याधच्या त्रासात जेंव्हा गुदावाटे रक्त जात असते तेंव्हा त्या प्रकाराला ‘रक्तार्श’ किंवा रक्ती मुळव्याध असे म्हणतात.

मूळव्याधीत शौचातून रक्त पडण्याची कारणे – Bleeding piles :

पाईल्समध्ये गुदाच्या शिरांना सूज आलेली असते. तसेच त्याठिकाणी खाज व जळजळ होत असते. अशावेळी शौचाच्याठिकाणी खाजवल्यास त्या शिरांमधून रक्त येत असते. तसेच मूळव्याधीत बद्धकोष्ठता किंवा मलाचा खडा धरत असल्यास शौचाच्यावेळी मल पुढे सरकताना त्याठिकाणी सूज आलेल्या शिरांवर जास्त दाब पडतो त्यामुळेही मूळव्याधमध्ये रक्त पडत असते.

मुळव्याधवरील सोपे घरगुती उपाय – Piles home remedies :

लिंबू आणि सैंधव मीठ –
सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणेही मूळव्याधवर चांगला घरेलू उपाय आहे. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा मूळव्याधसाठी घरगुती उपाय केल्यास त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल.

दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याधवर हा नसर्गिक घरगुती उपायही लाभदायक ठरतो.

जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये.

कोरपड –
कोरपडीच्या गरात सूज कमी करणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे मुळव्याधमध्ये गुदाच्या ठिकाणी आलेली सूज व जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी गुदाच्या ठिकाणी थोडासा कोरपडीचा गर लावून हळूवारपणे मालिश करावी.

सुरण कंदमुळ –
पाईल्सवर सुरण हे कंदमुळ अत्यंत उपयुक्त ठरते. यासाठी सुरण वाफवून त्याची भाजी व ताक असा आहार काही दिवस घ्यावा.

साजूक तूप –
पाईल्स असल्यास व पोट साफ होत नसल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल.

ताक –
जिरेपूड घालून ताक पिण्यामुळेही पाईल्सचा त्रास लवकर कमी होतो.

मूळव्याध कोंब असल्यास हे करा उपाय :

कच्चा मुळा –
किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याधच्या कोंब किंवा मोडांवर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
कच्चा मुळा खाणेही हा मूळव्याधवर उपयुक्त असतो. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे.

तीळ –
तीळ कुटून त्याची पेस्ट मूळव्याधचे मोड लवकर बरे होतात. तसेच अर्धा चमचाभर तिळ लोण्यामध्ये एकत्र करून खाणेही यासाठी उपयुक्त ठरते.

मोहरी –
मुळव्याध कोंब बरे होण्यासाठी 1 चमचा मोहरी आणि 2 चमचे दूध यांची बारीक पेस्ट करावी आणि ती दिवसातून 3-4 वेळा मोडावर लावावी, 15 ते 20 दिवसात मूळव्याधचे कोंब पूर्ण बरे होतात.

बर्फाचा शेक –
मूळव्याधमध्ये गुदद्वाराजवळ कोंब येऊन सूज व वेदना होत असल्यास त्यावर बर्फाचा शेक घेतल्यास आराम पडतो व तेथील वेदनाही कमी होतात.

रक्ती मूळव्याधवर हे करा उपाय :

लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून तीन वेळा खावी. रक्ती मुळव्याधवर हा उपाय खूप उपयोगी ठरतो.

कांदा –
रक्ती मूळव्याध असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व 60 ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे. ह्या घरगुती उपायाने मूळव्याधमध्ये शौचातून रक्त पडणे थांबते.

मूळव्याधवर हे आहेत आयुर्वेदिक उपचार – Piles Ayurvedic treatment :

मूळव्याधचा त्रास हा अतिशय वेदना देणारा असतो. मूळव्याध सहजासहजी बरी होत नाही. यावर योग्य औषधे, पथ्य सांभाळणे गरजेचे असते. मूळव्याधवर आयुर्वेदात अनेक प्रभावी औषधे आहेत. या आयुर्वेदिक औषध उपचारामुळे मुळव्याधची समस्या लवकर कमी होण्यासाठी मदत होते.

आमच्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी ‘मुळव्याध उपचार मार्गदर्शन पुस्तिका’ यामध्ये मूळव्याधवरील आयुर्वेदिक औषध उपचार, पथ्य आणि मूळव्याधीच्या रुग्णांनी काळजी कशी घ्यावी यांची सविस्तर माहिती दिली आहे. ही उपयुक्त पुस्तिका pdf file मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

Treatment of piles in Marathi

नियमित पोट साफ होण्यासाठी कोणते उपास्य करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Information about Piles symptoms, causes, types and treatments in Marathi language.