मूळव्याध (Piles) :
पचनास जड असणारे पदार्थ, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे, बैठे काम, सततचा प्रवास, बद्धकोष्ठता यासारख्या विविध कारणांमुळे आजकाल मूळव्याधीची समस्या अनेकांना भेडसावत आहे. मूळव्याधच्या त्रासात शौचाच्या ठिकाणी सूज, खाज व अतिशय वेदना होत असतात.
याशिवाय मूळव्याधीचा त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे या त्रासावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते.
मूळव्याधवरील घरगुती उपाय :
1) कच्चा मुळा –
कच्चा मुळा खाणे हा मूळव्याध समस्येवरील एक उपयुक्त असा घरगुती उपाय आहे. यासाठी मुळ्याचा रस काढून त्यात थोडेसे सैंधव मीठ घालून ते मिश्रण दिवसातून दोन वेळेस प्यावे. तसेच किसलेला मुळा आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट मूळव्याधवर लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
2) मोहरी –
मुळव्याध कोंब किंवा मोडाचा त्रास होत असल्यास, 1 चमचा मोहरी आणि 2 चमचे दूध यांची बारीक पेस्ट करायची आणि ती दिवसातून 3-4 वेळा मोडावर लावायची, या घरगुती उपायाने 15 ते 20 दिवसात मुळव्याध कोंब पूर्ण कमी होतात.
3) लिंबू आणि सैंधव मीठ –
सकाळ व सायंकाळी जेवणापूर्वी सैंधव मीठ लावून लिंबू चोखून खाणेही मूळव्याधवर चांगला घरेलू उपाय आहे. याशिवाय ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकून ते मिश्रण सकाळी उटल्यावर उपाशीपोटी प्यावे. 15 दिवस हा घरगुती उपाय केल्यास त्रास लवकर कमी होण्यास मदत होईल.
4) खोबरेल तेल –
खोबरेल तेलामध्ये वेदनाशामक व बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतात. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी खोबरेल तेल लावल्यास मुळव्याध मधील सूज, वेदना कमी होण्यास मदत होते.
5) कोल्ड कॉम्प्रेस –
वेदनादायक मूळव्याधवर आईस पॅक वापरणे हा एक चांगला घरगुती उपाय आहे. यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते. यासाठी बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून त्याचा थंड शेक मुळव्याधवर द्यावा.
6) जिरेपूड –
जिरे भाजून त्याची बारीक पूड करावी. एक चमचा बारीक केलेली जिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. सकाळी हे मिश्रण पिल्यानंतर कमीत कमी एक तास तरी काही खाऊ नये.
हे सुध्दा वाचा – मूळव्याधमध्ये घ्यायचा आहार जाणून घ्या.
7) दुर्वा –
दुर्वा बारीक कुटून त्या गायीच्या एक कप दुधात उकळाव्यात. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन थोडे थंड झाल्यावर प्यावे. मूळव्याधवरील हा घरगुती उपायही लाभदायक ठरतो.
8) नारळाची शेंडी –
नारळाची शेंडी जाळून त्याची राख बनवावी. ही राख दररोज सकाळी उपाशीपोटी ताकातून प्यावी. या उपयाने मुळव्याध समस्या दूर होण्यास मदत होते.
9) ताक आणि जिरेपूड –
मूळव्याधसाठी ताक हे अमृतच आहे. मुळव्याध असल्यास ताकात जिरेपूड मिसळून ते ताक रोजच्या आहारात समावेश करावे. हा अत्यंत उपयुक्त असा मूळव्याधीवरील घरगुती उपाय आहे.
10) ऑलिव्ह ऑइल व बदाम तेल –
मुळव्याध कोंब असल्यास त्याठिकाणी ऑलिव्ह तेल लावावे. यामुळे कोंबातील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच मुळव्याध कोंब असल्यास तेथे बदाम तेल लावणेही उपयुक्त असते. यामुळे कोंबातील सूज व आग कमी होण्यास मदत होते.
वरील घरगुती उपाय कशी दिवस केल्यास निश्चितच मूळव्याध समस्या दूर होण्यास मदत होईल.
हे सुध्दा वाचा – मूळव्याधची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Piles causes and home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.