शौचातून रक्त पडणे (Rectal Bleeding) :

अनेक कारणांमुळे शौचातून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस शौचामधून रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

शौचावाटे रक्त पडण्याची कारणे (Rectal bleeding causes) :

मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, पॉलिप्स, जंताचा त्रास, इन्फेक्शन, अल्सर ह्यासारख्या सामान्य कारणांमुळे शौचातुन रक्त येऊ शकते. तर विविध प्रकारचे कँसर जसे मलाशयाचा कर्करोग, गुदाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग यासारख्या गंभीर कारणांमुळेही शौचावाटे रक्त येऊ शकते.

गुदासंबंधित कारण –
मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता यांमुळे गुदभागातून रक्त येऊ शकते. मलत्याग करताना गुदभागी रक्त येते. यामध्ये येणारे रक्त हे लाल रंगाचे असते. नियमित पोट साफ होण्याचे उपाय जाणून घ्या..

मोठ्या आतड्यांसंबंधित कारण –
यामध्ये रक्त हे मलाबरोबर मिसळलेले असते. रक्तामुळे अधिक लाल रंग मिसळलेले मल असते. यामध्ये रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ शकतो. प्रामुख्याने आतड्याचा कर्करोग, आतड्यातील इन्फेक्शन, जंताचा त्रास या कारणांमुळे रक्त येत असते.

पोट व लहान आतडे संबंधित कारण –
पोट किंवा लहान आतडे यामधून रक्तस्राव होत असल्यास ते रक्त शौचात मिसळत असते. अशाप्रकारामध्ये रक्त मिसळलेले मल हे काळसर रंगाचे दिसत असते. अल्सर, इन्फेक्शन, विविध कँसर यासारखी कारणे यात असू शकतात.

शौचामधून रक्त जात असल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?

• बरेच दिवस शौचातून रक्त पडत असल्यास,
• अधिक प्रमाणात शौचामधून रक्त पडत असल्यास,
• रक्त पडण्याबरोबरच पोटामध्ये दुखत असल्यास,
• अतिसार, जुलाब, उलट्या होत असल्यास,
• अशक्तपणा, वजन कमी होत असल्यास,
• गुदाच्या ठिकाणी वेदना होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन निदान व उपचार करणे आवश्यक असते.

निदान व टेस्ट –

आपले डॉक्टर शारीरिक तपासणी व लॅब टेस्ट याद्वारे होणाऱ्या त्रासाचे निदान करू शकतात. याशिवाय निदानासाठी सिग्मोडीस्कोपी, कोलोनोस्कोपी, वर्चुअल कॉलोनोस्कोपी (सीटी कॉलोनोग्राफी) यांचाही वापर केला जातो.

शौचातून रक्त पडणे यावरील उपचार (Rectal bleeding treatments) :

शौचातुन रक्त कशामुळे पडत आहे याचे नेमके निदान झाल्यानंतरचं त्यावरील उपचार ठरतात.

शौचावाटे रक्त पडणे यावर हे आहेत उपाय :

मूळव्याध, फिशर किंवा बद्धकोष्ठता यासारख्या कारणांमुळे जर शौचामधून रक्त येत असल्यास खालील उपाय उपयोगी ठरतात. मात्र याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे रक्तस्राव होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ निदान करणे गरजेचे आहे.

लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये गुदातून रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून तीन वेळा खावी.

कांदा –
मूळव्याधमध्ये शौचावाटे रक्त पडत असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व 60 ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे.

साजूक तूप –
बद्धकोष्ठताचा त्रास होत असल्यास व त्यामुळे शौचाच्यावेळी रक्त जात असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होईल.

त्रिफळा चूर्ण –
बद्धकोष्ठतेमुळे शौचातून रक्त जात असल्यास गुदभागी त्रास न होता पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

एरंडेल तेल –
पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेलही उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे.

Read Marathi language article about Rectal Bleeding causes, treatment & remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.