पोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Stomach cancer in Marathi information, Stomach cancer Symptoms, Causes, Diagnosis & Treatments in Marathi.

पोटाचा कॅन्सर म्हणजे काय..?

पोटाच्या कर्करोगाला जठराचा कर्करोग किंवा Stomach Cancer असेही म्हणतात. आपल्या पोटाची रचना ही एखाद्या पिशवीसारखी असते. घेतलेला आहार हा अन्ननालिकेतून पोटात येत असतो. पोटाच्या कर्करोगाची सुरवात अगदी हळूहळू होत असते. पोटाच्या कर्करोगाची वाढ होत असताना कोणतीही लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय पोटाचा कर्करोग अधिक वाढलेला असतो, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कर्करोगाचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते.

पोटाच्या कॅन्सरची कारणे व पोटाचा कॅन्सर कशामुळे होतो..?

Stomach cancer Causes in Marathi
• अनुवंशिक कारणामुळे, रक्तातील नात्यामध्ये वडील, आई, भाऊ यांच्यापैकी कोणास पोटाचा कर्करोग झालेला असल्यास.
• ‎जुनाट पेप्टिक अल्सर, Pernicious anemia (B-12 Vitamin च्या कमतरतेने होणारा अनेमिया) या रोगांच्या दुष्परिणामातून पोटाचा कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.
‎धुम्रपान, तंबाखू आणि मद्यपान यांच्या व्यसनामुळे.
• ‎पोटाचा क्रोनिक इरिटेशन झाल्याने, मुख्यतः अत्यधिक मद्यपान, वेदनाशामक औषधांचा अतिवापर, अतिगरम, तीक्ष्ण पदार्थांच्या सेवनाने पोटाचा Irritation होत असते.
• ‎Helicobactor Pylcri या बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळे पोटाला सूज येते व कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
• ‎अतिखारट पदार्थ, अतितिखट, मसालेदार आहाराच्या अधिक सेवनाने पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.
• ‎आहारातील तंतुमय पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांच्या कमतरतेमुळे पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.
तसेच पोटाचा कैन्सर होण्याचे प्रमाण ‘A’ रक्तगटाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आढळते. वयाचा विचार केल्यास वयाच्या 40शी नंतर हा कैन्सर अधिक होण्याची शक्यता असते. तर स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात पोटाचा कर्करोग आढळतो.

पोटाचा कर्करोग कसा पसरतो..?

पोटाच्या कॅन्सरची शरीरात सुरवात हळूहळू होते. त्याचवेळीच म्हणजे कैन्सरच्या पहिल्या स्टेजमध्येच त्याचे निदान करुन, वेळीच उपचारांनी कॅन्सरचा अटकाव करणे आवश्यक असते. अन्यथा पोटाचा कॅन्सर गंभीर बनून संपुर्ण पोटाला बाधीत करतो, रक्ताद्वारे हा कैन्सर यकृत, फुफ्फुसे, मेंदु, किडन्या आणि हाडांमध्ये पसरतो व पोटाचा कर्करोग दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचतो. ह्या स्टेजमधील कॅन्सरला उपचार करून बरा करणे अवघड होऊन जाते.

पोटाचा कॅन्सर लक्षणे :

Stomach cancer symptoms in Marathi
पोटाच्या कर्करोगाची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कर्करोगामध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात.
• पोट दुखणे.
• ‎भुक कमी होणे व अपचनाच्या तक्रारी उद्भवणे.
• ‎जेवणानंतर बैचेनी वाटणे, अस्वस्थ होणे.
• ‎मळमळणे, उलटी होणे.
• ‎उलटीमध्ये रक्त आढळणे.
• ‎शौचामधून रक्त पडणे.
• ‎वजन कमी होणे.
• ‎अशक्तपणा जाणविणे यासारखी लक्षणे पोटाच्या कर्करोगामध्ये जाणवू शकतात. पोटाच्या कैन्सरची बहुतांश लक्षणे ही सेकंड स्टेजमध्येच आढळतात.

पोटाच्या कॅन्सरचे निदान कसे करतात..?

Stomach cancer Diagnosis test in Marathi
असलेली लक्षणे, पेशंट हिस्ट्री, रुग्णाची शारीरिक तपासणी करून डॉक्टर यांच्या निदानास सुरवात करतील. शारीरिक तपासणीमध्ये पोट तपासून त्यावर सूज किंवा गाठ लागते का ते पाहतील. उलटीतुन रक्त येणे, मलातून रक्त येणे यासारख्या लक्षणांद्वारे आपल्या डॉक्टरांना पोटाच्या कर्करोगाची आशंका येते. तसेच अचूक निदानासाठी खालील चाचण्याही करायला सांगतील.
एन्डोस्कोपी – यामध्ये दुर्बणिीद्वारे पोटाच्या आतील भागाचे निरीक्षण करून कॅन्सरची गाठ आहे का ते पाहिले जाते.
लॅप्रोस्कोपी – यामध्ये पोटाला छोटेसे छिद्र पाडून लॅप्रोस्कोप आत घातला जातो व आजूबाजूला गाठी असल्यास त्यांचा तुकडा बायोप्सी परीक्षणासाठी काढून घेतला जातो.
तसेच रक्त तपासणी, पोटाचा सीटी स्कॅन याद्वारे पोटाच्या कर्करोगाचे निदान केले जाते.

पोटाचा कर्करोग उपचार माहिती :

Stomach cancer Treatments in Marathi
पोटाच्या कर्करोगाचा उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. शस्त्रक्रिया ही पोटाच्या कैन्सरची प्रमुख चिकित्सा आहे.
जर गाठ कमी प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा भाग गाठीसकट काढला जातो. जर गाठ थोड्या जास्त प्रमाणात असेल तर ऑपरेशन करून पोटाचा भाग गाठीसकट काढला जातो व राहिलेले पोट आतड्याशी जोडले जाते.
जर संपूर्ण पोटात कॅन्सर पसरला असेल तर ऑपरेशन करून संपूर्ण पोट काढले जाते व त्यानंतर आतडे हे डायरेक्ट अन्ननलिकेशी जोडले जाते. तसेच ऑपरेशन करण्याआधी आणि ऑपरेशन झाल्यानंतर ही केमोथेरपी दिली जाते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पोटाचा कर्करोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी..?

Stomach cancer Prevention in Marathi
• धुम्रपान, मद्यपान, तंबाखू इ. व्यसनांपासून दूर रहावे.
• ‎अतिखारट पदार्थ, अतितिखट, जास्त मसालेदार आहाराचे सेवन मर्यादित करावे.
• ‎हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात अधिक समावेश करावा.
• ‎उघड्यावरील आहार, दुषित आहारांचे सेवन करु नये.
• ‎दुषित पाण्याचे सेवन करु नये.
• ‎डॉक्टरांच्या सुचनेशिवाय परस्पर औषोधोपचार करणे टाळावे. उठसुठ वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
• ‎आणि नियमित वैद्यकिय तपासणी करुन घ्या.

खालील कॅन्सरचीही मराठीत माहिती वाचा..
तोंडाचा कँसर
यकृताचा कर्करोग – लिव्हर कॅन्सर
स्तनाचा कर्करोग
सर्वायकल कँसर

Stomach cancer information in marathi, potacha cancer mahiti karne, lakshne, test, gharguti upay, upchar marathi.