पित्ताचा त्रास होणे –
चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात.
पित्त वाढण्याची कारणे –
पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते.
- वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे,
- वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे,
- उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे,
- तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे,
- मानसिक तणाव, राग यांमुळे,
- वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे,
- अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.
पित्त झाल्याची लक्षणे –
पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात. यामध्ये,
- ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे,
- पित्तामुळे आंबट ढेकर येणे,
- मळमळणे, उलट्या होणे,
- छातीत व पोटात जळजळ होणे,
- अल्सर होणे,
- पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),
- डोळ्यांची आग होणे,
- त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात.
पित्त कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय –
- पित्त कमी होण्यासाठी केळे खावे.
- पित्त वाढल्यास सफरचंद, डाळींब, टरबूज यासारखे फळ खावे.
- पंचामृत देखील पित्त कमी करते. दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत बनते. पित्त कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा पंचामृत खावे.
- गरम भाताबरोबर तूप खाल्याने देखील पित्त कमी होते.
- पित्ताचा त्रास सारखा होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे.
- दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे. यामुळेही पित्त कमी होते.
शरीरातील पित्त कमी करण्यासाठी काय करावे..?
पित्त वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे..
चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, मांसाहार, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, कच्चे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, चहा-कॉफी हे पदार्थ वारंवार खाणेपिणे टाळावे.
हिरव्या पालेभाज्या खाव्यात..
हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आहारात असाव्यात. विविध फळे खावीत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन्स, खनिजतत्वे असतात. फायबर्समुळे नियमित पोट साफ होऊन पित्त कमी होते. आहारात आले, वेलदोडे, मिरी, मनुका, केळी, कारले, आवळा यांचा प्रामुख्याने समावेश करावा.
लाइफस्टाइलमध्ये बदल करा..
चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली यांमुळे पित्ताचा त्रास होत असतो. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारल्यास म्हणजे योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तणावापासून आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास पित्त तर कमी होईलच शिवाय आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घ्यायची काळजी –
- उपाशीपोटी फार वेळ न राहू नये.
- वेळेवर जेवण घ्यावे.
- योग्य आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश असावा.
- तेलकट, तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
- वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
- पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- रोज पोट साफ झाल्याने पित्त कमी होण्यास मदत होत असते. यासाठी पोट साफ राहील याची काळजी घ्यावी. नइयमित पोट साफ होण्यासाठीचे उपाय जाणून घ्या..
- नियमित व्यायाम व योगासने करावे.
- राग-चिंता-काळजी यावर नियंत्रण आणावे. ताण घेऊ नये.
- जागरण करणे टाळावे, दिवसा झोपू नये.
- स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
वारंवार डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या खाणे टाळावे. यासारखी काळजी घेतल्यास पित्त विकार होण्यापासून दूर राहता येते.
हे सुद्धा वाचा :
पित्तामुळे छातीत किंवा पोटात जळजळ होत असल्यास काय करावे ते जाणून घ्या..
पित्तामुळे अंगावर पित्ताच्या गांधी उठत असल्यास त्यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Pitta Causes, Symptoms, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.
Mala pittachay gathi yetat tay sathi ksy karu
या त्रासाला शितपित्त असे म्हणतात. अंगावर पित्ताच्या गाठी येणे यावरील उपाय व आयुर्वेदिक उपचार यांची माहिती खालील लिंकमध्ये दिलेली आहे.
लिंक – https://healthmarathi.com/urticaria-marathi-information/