पोट साफ न होणे – Constipation :

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ (Constipation) असेही म्हणतात.

बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौचावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास होत असतात. शौचाचा खडा धरत असल्याने मल बाहेर येताना गुदाच्या ठिकाणी जास्त ताण व त्रास होत असतो. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी जखमा होणे, मूळव्याध होणे असे त्रासही नियमित पोट साफ होत नसल्यास होऊ शकतात.

रोज पोट साफ न झाल्यास हे होतात त्रास :

• ‎शौचास होताना त्रास होणे,
• कधी कधी खडा तयार होऊन शौचास जोर द्यावा लागणे, यामुळे मूळव्याध होणे,
• ‎पोट गच्च होणे, ढेकर येणे, पोटात गॅस होणे, तोंडाचा उग्र वास येणे, डोके दुखणे, अस्वस्थता, भूक मंदावणे, रक्तदाब वाढणे,
• ‎चिडचिड होणे, कंटाळा येणे अशा अनेक तक्रारी नियमित पोट साफ न झाल्यास होत असतात.

दररोज पोट साफ न होण्याची कारणे :

अयोग्य आहार घेणे हे बद्धकोष्ठता होण्याचे प्रमुख कारण आहे. अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार असा आहार खात असल्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार सुरू होते. कारण अशा पदार्थात फायबर्सचे प्रमाण खुपचं कमी असते त्यामुळे बद्धकोष्ठता होत असते.

याशिवाय पोटाचा व आतड्यांचा व्यायाम न झाल्यानेही बद्धकोष्ठता होत असते. विशेषतः बैठे काम व आरामदायी जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींमध्ये व्यायामाच्या अभावामुळे पोट वेळच्यावेळी साफ होत नाही. तसेच कमी पाणी पिण्याची सवय असल्यामुळेही मल खड्यासारखे घट्ट बनून कॉन्स्टिपेशन होत असते.

रोज पोट साफ होत नसल्यास गोळ्या व औषधे घ्यावीत का..?

पोट साफ होत नाही म्हणून त्यासाठी गोळ्या किंवा औषधे वारंवार घेणे टाळले पाहिजे. कारण या औषधांमुळे आतड्याच्या नैसर्गिक कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता अधिक बळावते.

औषधांची सवय झाल्याने औषधे घेतल्याशिवाय आतडे आपली नैसर्गिक कार्ये पार पाडत नाहीत. यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि काही घरगुती उपाय याद्वारे ही समस्या दूर केली पाहिजे. खाली दाररोज पोट साफ होण्याकरिता उपयुक्त असणाऱ्या उपायांची माहिती दिली आहे.

नियमित पोट साफ होण्यासाठी हे करावे घरगुती उपाय :

एरंडेल तेल
आयुर्वेदानुसार एरंडेल तेल हे सारक गुणांचे असून बद्धकोष्ठतेवर उपयुक्त असते. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा एरंडेल तेल घेऊ शकता. यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते.

कोमट पाणी व लिंबू –
रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात एक लिंबू पिळावे. या पाण्यात चमचाभर एरंडेल तेल घालूनही ते पाणी पिऊ शकता. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांत प्रेशर येऊन पोट व्यवस्थित साफ होते.

त्रिफळा चूर्ण –
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात 2 चमचे त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णात हिरडा, बेहडा आणि आवळा ही आयुर्वेदिक घटक असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते, आतड्यांच्या मांसपेशींचे कार्यही सुधारते. बद्धकोष्ठता उपचारात त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी असते.

अळशीच्या बिया –
रात्रभर अळशीच्या बिया भिजत घालाव्यात. सकाळी उपाशीपोटी भिजवलेली अळशी चाऊन खावी तसेच उरलेले अळशीचे पाणीदेखील प्यावे. यामुळेही पोट साफ होण्यास मदत होते.

मनुका –
काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी उपाशीपोटी भिजवलेल्या मनुक्याचं पाणी प्यावे आणि भिजलेल्या मनुकाही चावून खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. 

बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी ह्या कराव्या उपाययोजना :

• वेळीअवेळी जेवणे टाळावे.
• जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. ‎गडबडीत, पटपट खाणे टाळावे.
• जेवणानंतर लगेच झोपू नये.
• आहारात हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
• नियमित व्यायाम करावा.
• प्राणायाम व योगासने करावीत.
• बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो व बद्धकोष्ठता दूर होते.

हे सुद्धा वाचा :
नियमित पोट साफ न झाल्याने पोटात गॅस होण्याची समस्याही अनेकांना असते. पोटात गॅस होण्याची कारणे आणि पोटातील गॅस कमी करण्याचे उपाय यांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

आरोग्याचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटन क्लिक करा व आमचे YouTube चॅनल Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.