जुलाब होण्याची कारणे व जुलाब थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय – Loose motion solution in Marathi

जुलाब होणे – Loose motion :

जुलाब लागल्यास वारंवार पातळ शौचाला होत असते. जुलाब होण्याची कारणे अनेक असून, प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे वारंवार पातळ शौचास होत असते. वारंवार पातळ शौचाला लागल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते.

यासाठी जुलाब वर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. दिवसातून 5 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा पातळ शौचास होणे चिंताजनक ठरू शकते. यासाठी जुलाब कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत.

जुलाब होण्याची कारणे :

दूषित आहार, उघड्यावरील पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्यामुळे, विषाणूमुळे (व्हायरल इन्फेक्शनमुळे), अमिबासारख्या जंतूमुळे तसेच तेलकट, मसालेदार, तिखट पदार्थ जास्त खासल्याने अपचन होऊनही पातळ संडासला होत असते.

जुलाबाची लक्षणे :

• वारंवार शौचास होणे, पातळ शौचास होणे,
• पोटात दुखणे, पोटात मुरडा मारून येणे,
उलट्या होणे,
मळमळणे,
• ताप येणे, अशक्तपणा, भूक मंदावणे अशी लक्षणे जुलाब झाल्यावर असू शकतात.

जुलाबवर हे करा घरगुती उपाय :

ओआरएस मिश्रण –
सतत पातळ जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी सोडियम, पोटॅशियम ह्या क्षार घटकांचे शरीरातील प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन झाल्याने गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

यासाठी जुलाब होत असल्यास गरम करून थंड केलेल्या एक लिटर पाण्यात 6 चमचे साखर व अर्धा चमचा मीठ मिसळून मिश्रण तयार करावे. जेंव्हाजेंव्हा जुलाब होईल तेंव्हातेंव्हा यातील थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका टाळतो.

याशिवाय यासाठी आपण पुरेसे पाणी, फळांचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी किंवा ओआरएस इलेक्ट्रॉल पावडरही वापरू शकता.

आले –
जुलाब कमी करण्यासाठी आल्याचा रस, लिंबू रस आणि मिरी पावडर कपभर पाण्यात एकत्रित करून प्यावे. आले घालून केलेला चहा पिण्यामुळेही जुलाब थांबण्यास मदत होईल.

जिरे –
जुलाब होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे घालून ते पाणी चांगले उकळवून घ्यावे. पाणी कोमट करून वरचेवर प्यावे. यामुळे पोटदुखी कमी होते व पातळ शौचास होणेही थांबते.

मेथीचे दाणे –
दोन चमचे मेथीचे दाणे ग्लासभर पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवावेत. त्यानंतर भिजलेले दाणे बारीक वाटून ते पाण्यात घालून प्यावे. यामुळेही पातळ जुलाब होणे कमी होईल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

जुलाब होत असल्यास असा घ्यावा आहार :

पातळ जुलाब लागल्यास काय खावे व काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.
• जुलाब झाल्यावर पचनास हलका आहार घ्यावा.
• वरणभात, मुगाची खिचडी यांचा समावेश करा.
• जुलाब होत असल्यास तळलेले पदार्थ, तिखट, मसालेदार पदार्थ, मांसाहार खाणे टाळावे.
• बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
• पाणी उकळवून थंड करून प्यावे.
• डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाण्यासारखे द्रव्य पदार्थ, ओआरएस मिश्रण, नारळपाणी पुरेसे प्यावे.
• उन्हाळ्यात जुलाब झाल्यास आंबा, फणस खाणे टाळावे.

जुलाब लागल्यास ही घ्यावी काळजी :

• घरगुती उपाय करूनही जुलाब थांबत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
• जुलाब प्रामुख्याने जिवाणू किंवा विषाणूंच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. घरगुती उपायांनी इन्फेक्शन आटोक्यात आणता येत नाही. यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
• जुलाब लागल्यास शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते यासाठी तरल पदार्थ, पाणी किंवा ओआरएस मिश्रण वरचेवर पीत राहावे.
• जुलाबमुळे अशक्तपणा येत असतो तेंव्हा अशावेळी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
• आहारातून इन्फेक्शन होऊ नये यासाठी घरात पुरेशी स्वच्छता ठेवावी.

जुलाबवरील औषध उपचार :

जुलाबवर आपले डॉक्टर, anti-diarrheal, अँटी-बायोटिक्स व पोटातील वेदना कमी होण्यासाठी antispasmodic गोळ्या व औषधे देतील.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.