Dr Satish Upalkar’s article about Cycling benefits in Marathi.

सायकलचा व्यायाम :

सायकलिंग हा एक एरोबिक व्यायाम प्रकार असून सायकल चालवण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. नियमितपणे सायकलिंगच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफ्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

यासाठी रोजच्या व्यायामासाठी नियमित सायकल चालवावी. जर काही कारणाने सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास घरच्याघरी किंवा जिममध्ये आपण व्यायामाची सायकल वापरूनही वर्कआऊट करू शकता. रेग्युलर सायकल आणि जिम सायकल यांच्यापासून होणारे फायदे एकसारखेच असतात.

सायकल चालवण्याचे फायदे :

दररोज सायकल चालवण्याचा व्यायाम केल्याने शरीराच्या मांसपेशी, सांधे आणि हाडे मजबूत होतात. वजन आटोक्यात राहते. शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हृदय विकार, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात, डायबेटिस अशा गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. असे आरोग्यासाठी अनेक उपयुक्त फायदे सायकल चालवण्यामुळे होतात.

1) स्नायू बळकट होतात..
सायकलिंगमुळे शरीराच्या मांसपेशी, सांधे आणि हाडांची हालचाल होते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही यामुळे मदत मिळते. शरीराच्या फिटनेससाठी सायकलिंगच्या व्यायामाचा फायदा होतो.

2) वजन नियंत्रित राहते..
सायकल चालवण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी (Weight loss) एक उत्तम पर्याय आहे. कारण सायकलिंगमध्ये आपल्या शरीराच्या अनेक स्नायूंचा (Muscles) व्यायाम होतो. फक्त अर्धा ते एक तास सायकलिंगमुळे तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून 500 ते 800 कॅलरीज बर्न करता येतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास सायकल चालवण्याने मदत होते. सायकलिंगमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

3) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर..
नियमित सायकल चालवल्यामुळे ह्रदय आणि फुफ्फुस यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते. एलडीएल या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब नियंत्रित होतो, रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे सायकलिंगमुळे हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात, डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

4) मधुमेह आणि कॅन्सरला दूर ठेवतो..
वाढलेले वजन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यांमुळे होणाऱ्या टाईप 2 मधुमेहाचा धोका दररोज सायकलच्या व्यायामाने कमी होतो. याशिवाय नियमित सायकलिंगमुळे आतड्याचा कँसर, स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो.

5) मानसिक स्वास्थ्य सुधारते..
सायकलिंगमुळे मानसिक तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरीत्या काम करतो. मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा येणे हे सर्व सायकलिंगने कमी होते. सायकल चालवल्यामुळे शरीराची एक्सरसाईज होते त्यामुळे झोप निवांत लागून सकाळी ताजेतवाने वाटते.

6) दुखापत होण्याचा धोका कमी असतो..
वजन उचलणे, जॉगिंग अशा अनेक वर्कआऊटमध्ये दुखापत किंवा इंज्युरी होण्याची शक्यता असते. मात्र सायकलिंगमुळे दुखापत होण्याचा धोका फारसा नसतो. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते.

सायकल चालवण्याचे सामाजिक व राष्ट्रीय फायदे :

वाहन म्हणून सायकल चालवण्याचे इतर मोटार वाहनांच्या तुलनेत असंख्य फायदे आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत..

  • सायकलिंगमुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षघात यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने निरोगी राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते.
  • सायकल चालवणे सोपे असते, सायकलिंगमुळे पार्किंग समस्या होत नाहीत, वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक) होत नाही, जीवघेणे अपघातही होत नाहीत.
  • सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो.
  • सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते.
  • सायकलिंगसाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती देशात जाणारा इंधनासाठी जाणारा राष्ट्रीय पैसा वाचण्यास मदत होते.
  • सायकल चालवण्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होते.
  • इतर वाहनांच्या तुलनेत सायकल चालवण्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण कमी असून त्यामुळे एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीची काटकसरचं होते.

अशाप्रकारे सर्व वयोगटातील लोकांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी सायकल चालवणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायाम प्रकार आणि वाहतुकीचे एक साधनही आहे.

सायकलचा व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी..?

  • शरीराची उंची विचारात घेऊन सायकल खरेदी करावी.
  • सायकलची सीट मऊ आणि आरामदायी असावी.
  • सायकल रस्त्यावर चालवत असल्यास हेल्मेट, knee pads, एल्बो पॅड वापरावे आणि वाहतुकीचे नियम पाळावेत.
  • बाहेर सायकल चालविणे शक्य नसल्यास घरातील व्यायामाची सायकल घ्यावी किंवा जिममध्ये जाऊन अपराईट बाईक, Recumbent बाईक किंवा स्टेशनरी बाईकचा वापर करावा.
  • पाठीचा त्रास असणाऱ्यांनी जिम किंवा घरामध्ये Recumbent सायकलचा वापर करावा. ज्यामुळे पाठीला आधार मिळतो व पाठीला त्रास होत नाही.

हे सुद्धा वाचा..

In this article information about Cycling Exercise tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube