भूक न लागण्याची कारणे व भूक वाढवण्यासाठी उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Anorexia in Marathi, Loss of appetite Causes, symptoms, and treatment in Marathi

भूक न लागणे म्हणजे काय..?

भूक न लागणे किंवा तोंडाला चव नसणे ही समस्या अनेकांना होत असते. भूक न लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक न लागणे हे सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. कारण घेतलेल्या आहारातूनच शरीराचे पोषण होत असते, शरीराची झीज भरून काढली जाते.

अशावेळी भूक न लागण्याच्या समस्येमुळे पुरेसे अन्न आणि व्हिटॅमिन, खनिजे यासारखी पोषकतत्वे शरीरास न मिळाल्यास याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणूनच भूक न लागण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.

भूक न लागण्याची कारणे :

Anorexia Causes in Marathi
भूक न लागण्यामागे किंवा भूक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक कारणांपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होत असतो. 
• शारीरिक कारणांमध्ये विविध आजारांमुळे भूक कमी होते. सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, कृमींचा त्रास, पोटात गॅस होणे, पित्ताशयात खडे होणे (gallstone), मधुमेह अशा अनेक आजारांत भूक कमी होते.
• महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, प्रेग्नन्सीमध्ये किंवा रजोनिवृत्तीमध्येही भूक कमी होऊ शकते.
• वढत्या वयाबरोबर भूकदेखील मंदावते. वाढत्या वयाबरोबर पचनक्रीया मंदावल्याने थोडेसे खाल्ले तरी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वाढत्या वयाबरोबर भूक मंदावते.
• अनेक औषधांमुळेही भूक कमी होते. विशेषतः अॅण्टीबायोटिक्स, अॅण्टीफंगल्स, आणि Muscle relaxant औषधांमुळे भूक कमी होते.
• जर डिप्रेशन, मायग्रेन, उच्च रक्तदाब, क्रॉनिक आजार आणि कंपवात (पार्किन्सन) या आजारावरील औषधे सुरू असल्यास भूक कमी होऊ शकते.
• मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, भीती, डिप्रेशन यांमुळे भूक कमी होत असते. कामाच्या ताणामुळे किंवा परीक्षेच्या तणावामुळे भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.
• अपुरी झोप झाल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो परिणामी भूक न लागण्याची तक्रार सुरू होते. 
• अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, भरपूर चहा-कॉपी पिण्यामुळेही ‘अन्न जेवताना’ भूक न लागण्याची तक्रार सुरू होते. 
• दारू, मद्यपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांमुळेही भूक कमी होत असते.

लहान मुलांमधील भूक न लागण्याची समस्या व कारणे :

आपली मुले पुरेसे जेवत नाहीत अशी अनेक पालकांची तक्रार असते. लहान मुलांमध्ये अतिगोड खाणं किंवा कृमी यामुळे भूक न लागण्याच्या तक्रारी दिसतात. याशिवाय फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स यासारख्या अयोग्य आहारामुळे लहान मुलांमध्ये जेवण करताना भूक न लागण्याच्या तक्रारी दिसतात. कारण वरील आहारात फायबर्स आणि इतर पोषकतत्वे नसतात त्यामुळे नियमित पोट साफ न होण्याच्या तक्रारी निर्माण होतात. परिणामी पचनसंस्थेचे आरोग्य धोक्यात येऊन लहान मुलांची भूक कमी होते.

काळजीचे कारण केंव्हा असते..?

काही दिवसांसाठी भूक न लागणे हे सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो काळजीचा विषय आहे. अनेक दिवस भूक न लागणे व एकाएकी वजन कमी होणे ही लक्षणे कॅन्सरसारख्या काही गंभीर आजाराचीही असू शकतात. त्यामुळे अनेक दिवस भूक लागत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावे.

भूक न लागणे यावर उपचार :

योग्य आहार, व्यायाम आणि औषधे याद्वारे भूक न लागण्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येते. 

योग्य आहार घ्यावा..
सहज पचणारा योग्य आहार घ्यावा. फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहावे. पोट नियमित साफ राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आहारात फायबर्सचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यावे. तसेच विविध व्यसनांपासून दूर राहावे.

नियमित व्यायाम करावा..
व्यायामामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते याशिवाय व्यायामामुळे कॅलरीज कमी झाल्याने भूक लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होण्यास मदत होते. नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा करावी त्यामुळे मानसिक ताणतणावही दूर होण्यास मदत होते.

भूक वाढीसाठी औषधे..
हिंगापासून बनवलेलं ‘हिंगाष्टक चूर्ण’ हे आयुर्वेदिक औषध पचनाच्या समस्येसाठी खूप उपयोगी आहे. आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये ‘हिंगाष्टक चूर्ण’ उपलब्ध असते. जेवताना तूप आणि हिंगाष्टक चूर्ण घालून भात खाल्यास भूक चांगली लागून अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.

याशिवाय झंडू पंचारिष्ट वैगरे टॉनिक घेण्याचाही भूक न लागण्याच्या समस्येत उपयोग होतो. तसेच कृमींमुळेही भूक न लागण्याच्या तक्रारी होत असतात यासाठी कृमींवरील औषधेही वेळोवेळी घ्यावीत.

भूक वाढण्यासाठी उपाय :

भूक न लागण्याची समस्या असेल तर भूक वाढीसाठी उपाय खाली दिले आहेत..
(1) दोन ते तीन काळी मिरी आणि लवंग यांचे एकत्र चूर्ण घ्यावे त्यात मध मिसळून चाटण करून खावे. यामुळे भूक लागण्यास व अन्न पचण्यास मदत होते.

(2) लवंग, लेंड पिंपळी समप्रमाणात घेऊन त्यांचे बारीक चूर्ण करावे. एक ते दीड ग्रॅम चूर्ण घेऊन अर्धा चमचा मध मिसळून मिश्रणाचे सकाळ व संध्याकाळी चाटण करावे.

(3) जेवण झाल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करून अर्धा किंवा एक चमचा खाल्ल्यास भूक चांगली लागते अन् पोट साफ राहते. गॅसेस होत नाहीत. 

(4) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण  कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

(5) काळ्या मनुका किंवा सुखे अंजीर रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी खाल्यास नियमित पोट साफ होते आणि भूक वाढते.

हे सुद्धा वाचा..
पोट साफ न होण्याची कारणे व उपाय
अपचन कशामुळे होते
पित्ताचा त्रास आणि त्यावरील उपाय

Loss of appetite treatment in Marathi information, sudden loss of appetite causes, loss of appetite and tiredness.