कावीळ (Jaundice) :
कावीळ हे यकृतासंबधित आजारांचे एक लक्षण असू शकते. काविळला इंग्लिशमध्ये ‘Jaundice’ असे म्हणतात तर आयुर्वेदात ‘कामला’ या नावाने ओळखले जाते. कावीळ मध्ये त्वचा व डोळ्यांचा रंग पिवळा झालेला असतो.
कावीळ म्हणजे काय?
काविळमध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. रक्तामध्ये बिलीरुबीन (Bilirubin) चे प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते. बिलीरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा घटक पदार्थ असतो. यकृताद्वारे हा पदार्थ रक्तातून काढून टाकला जातो. त्यानंतर Bilirubin पित्ताशयत पाठवला जातो. त्यानंतर तो पदार्थ मलावाटे बाहेर टाकला जातो. जर हा पदार्थ मलावाटे बाहेर टाकला गेला नाही तर त्याची रक्तामध्ये Bilirubin ची अधिक वाढ होते त्यामुळे त्वचा, नखे, डोळे पिवळ्या रंगाची होतात.
कावीळ कशामुळे होते?
कावीळ हा आजार नसून ते एक लक्षण असते. विविध आजारांमुळे कावीळ होत असते. प्रामुख्याने हिपॅटायटीस (Hepatitis), पित्ताशयातील खडे, थॅलेसेमिया, स्वादुपिंडाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, लिवर सिरोसिस, स्वादुपिंडाला सूज येणे, सिकलसेल अनिमिया, Weil’s डीसिज, Yellow fever अशा अनेक आजारात कावीळ होत असते.
काविळ होण्याची कारणे (Causes of Jaundice) :
कावीळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे,
- कावीळ ही प्रामुख्याने हिपॅटायटीस ह्या यकृताच्या आजारामुळे होत असते.
- दूषित अन्न व पाण्यातून इन्फेक्शन होऊन काविळ होऊ शकते.
- अत्यधिक मद्यपानामुळे कावीळ होऊ शकते. दारूच्या व्यसनामुळे यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते.
- पित्ताशयाच्या विकारांमुळे जसे, पित्ताशयात खडे झाल्यामुळे, पित्ताशयाला सूज येणे यांमुळे ही कावीळ उद्भवू शकते.
- पित्ताशय नलिकेमध्ये पित्त निघण्याच्या मार्गात अडथळा झाल्याने काविळ उद्भवते. जसे, पित्ताशयात खडे झाल्याने अडथळा निर्माण होतो. याला अवरोधक कावीळ (Obstructive jaundice) असे म्हणतात.
- यकृत कॅन्सर, लिव्हर सिरोसिस यासारख्या यकृताच्या आजारांमुळेही काविळ उद्भवू शकते.
- स्वादुपिंड अवयवाला सूज आल्याने किंवा स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळेही कावीळ येऊ शकते.
काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही कावीळ होऊ शकते. - तसेच नवजात बालकांना सुरवातीचे काही दिवस कावीळ येऊ शकते. याला Newborn jaundice असे म्हणतात.
काविळीचे प्रकार (Jaundice types) :
हिपॅटायटीस (Hepatitis) हा यकृताचा एक आजार असून यात यकृतात व्हायरल इन्फेक्शन होऊन यकृताला सूज येत असते. हिपॅटायटीस आजार झाल्यास त्यात काविळ हे प्रमुख लक्षण असते. हिपॅटायटीसचे A, B, C, D आणि E असे पाच प्रकार आहेत. या हिपॅटायटीसच्या पाच प्रकाराणांच काविळीचे प्रकार असेही म्हणतात. त्यामुळे काविळीचे कावीळ अ, ब, क, ड आणि कावीळ ई असे प्रकार केले जातात.
हिपॅटायटीस A आणि E ची लागण ही विषाणू दूषित अन्न, दूषित पाणी यातून होते. हिपॅटायटीस B अणि C ची लागण ही विषाणू दूषित रक्त चढविल्याने, व्हायरस दूषित इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे, हिपॅटायटीस B किंवा C बाधित रुग्णाशी लैंगिक संबंधातून, बाधित रुग्णाच्या रक्त, थुंकी, मल, मुत्र, दूषित कपडे, रेजर्स, टूथब्रश याच्या संपर्कात आल्यास लागण होते व कावीळ निर्माण होत असते. हिपॅटायटीस आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
काविळ झाल्याची लक्षणे (Jaundice Symptoms) :
- डोळे, त्वचा, नखे पिवळ्या रंगाची होणे,
- भूक मंदावणे,
- मळमळणे व उलट्या होणे,
- त्वचेला खाज सुटणे,
- ताप येणे,
- अंग मोडून जाणे,
- पोटामध्ये वेदना होणे,
- लघवी पिवळीजर्द आणि गडद होणे अशी काविळ ची लक्षणे असतात.
काविळ आणि निदान (diagnosis) :
रुग्णाची त्वचा, डोळे, नखे तपासणीद्वारे कावीळचे निदान केले जाते. याशिवाय खालील वैद्यकीय चाचण्यांचा कावीळच्या निदानासाठी आधार घ्यावा लागतो. रक्त व लघवीची तपासणी करून Bilirubin चे प्रमाण तपासले जाते. तसेच ब्लड टेस्ट करून कावीळ कोणत्या प्रकारची आहे, कावीळची तीव्रता काय आहे ते कळते.
अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआयद्वारे तपासणी करून लीवरची सूज, लीवरचा आकार, पित्ताशयाची स्थिती, पित्तानलिकाची तपासणी केली जाते. अधिक निदानासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट, CBC टेस्ट, लिव्हर बायोप्सी ह्यासारख्या चाचण्या कराव्या लागतात.
कावीळ आणि उपलब्ध उपचार (Jaundice treatment) :
कावीळ नेमकी कशामुळे झाली आहे, कोणत्या प्रकारची कावीळ आहे यानुसार कावीळवर उपचार ठरवले जातात.
- कावीळ झाल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावेत.
- काविळ रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेलीच औषधे घ्यावीत. स्वतःहून औषधे आणून प्रयोग करू नका. कारण चुकीच्या औषधांमुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
- कावीळ झाल्यावर घरगुती उपाय करीत बसू नये कारण सामान्य वाटणारी कावीळ ही स्वादुपिंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असू शकते.
- काविळ झालेल्या रुग्णांनी विश्रांती घ्यावी.
- सहज पचणारे अन्न घ्यावे. कावीळ मध्ये कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घ्या .
- रुग्णाने मद्यपान, धूम्रपान करू नये.
- डिहायड्रेशनची स्थिती उद्भवू नये यासाठी तरल पदार्थांचे अधिक सेवन करावे.
कावीळसाठी आयुर्वेदिक उपचार –
सामान्य काविळ असल्यास त्यावर आरोग्यवर्धिनी वटी, कुमारी आसव यासारखी अनेक आयुर्वेदिक औषधे प्रभावी ठरू शकतात. अशावेळी आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने काविळवर आयुर्वेदिक उपचार करून घेऊ शकता.
कावीळ आणि प्रतिबंधात्मक उपाय (Prevention) :
काविळ होऊ नये यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.
- हिपॅटायटीसमुळे काविळ होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.
- हिपॅटायटीस A आणि B होण्यापासून रक्षण होण्यासाठी लस उपलब्ध आहेत त्या घ्याव्यात.
- स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात.
- बाहेरुन आल्यावर, शौचास-लघवीस जाऊन आल्यावर हात, पाय, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावेत.
- उघड्यावरील पदार्थ, दुषित अन्नपदार्थ, शिळे पदार्थ, कच्चे मांस-मासे टाळा.
- दुषित पाणी पिणे टाळावेत. पाणी गरम करुन, निर्जंतुक करुन वापरावे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी.
- दुसऱ्याच्या स्वच्छता साधनांचा वापर करु नये. उदा. दुसऱ्याचा साबण, कपडे, टुथब्रश, रेझर्स इ. वस्तु वापरु नये.
- मद्यपान, धुम्रपान करणे टाळावे. व्यसनांमुळे विविध विषारी घटक शरीरात जात असतात.
- असुरक्षीत लैंगिक संबंध टाळावेत.
- रक्त घेताना किंवा अवयव प्रत्यारोपनावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी विशेष दक्ष रहावे. रक्त, अवयव हे हिपॅटायटीस बाधीत नसल्याची खात्री करुन घ्यावी.
- वापरलेल्या सलाइन्स, इंजेक्शन. सुया यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. वैद्यकीय कचऱ्यापासून दुर रहावे.
निष्कर्ष (Conclusion) –
कावीळ हे प्रमुख लक्षण यकृत कॅन्सर, यकृताचा सिरॉसिस आणि स्वादुपिंडाचा कर्करोग अशा अनेक गंभीर आजारातसुध्दा असते. त्यातही स्वादुपिंडाच्या कँसरवर सुरवातीच्या अवस्थेत उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण सुरवातीला स्वादुपिंडाच्या कँसरची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. मात्र कँसर जसजसा गंभीर स्टेजमध्ये पोहचतो तेंव्हाच त्याची लक्षणे दिसू लागतात म्हणून स्वादुपिंडाच्या कॅन्सरला ‘सायलेंट किलर’ असेही ओळखले जाते.
अशा ह्या जीवघेण्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्येही कावीळ होत असते. त्यामुळे कावीळ झालेली असल्यास कोणतेही घरगुती उपाय करीत न बसता आपल्या डॉक्टरांकडून कावीळीचे वेळीच निदान करून त्यांच्याकडून कावीळवर योग्य उपचार करून घ्यावेत.
Read Marathi language article about Jaundice causes, symptoms, types, prevention & treatments. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.