Dr Satish Upalkar’s article about Hepatitis in Marathi information.

Hepatitis causes, symptoms, types, treatment and prevention in Marathi

हिपॅटायटीस – Hepatitis :

हिपॅटायटीस हा यकृताचा एक महत्वाचा असा आजार आहे. हिपॅटायटीस या आजारात लिव्हरला सूज येते. हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे (विषांणूद्वारा) पसरणारा आजार आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे यकृत संक्रमित होऊन त्याला सुज येते त्यामुळे यकृताची सामान्य कार्ये होण्यास अडथळा निर्माण होतो. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी आणि इ असे पाच प्रकार आहेत.

यकृताची कार्ये –
यकृत हा शरीरातील एक अतिमहत्वाचा असा अवयव आहे. रक्ताचे शुद्धिकरण करण्यास यकृत महत्वाची भुमिका असते. यकृतामुळे रक्तातील अपायकारक अशुद्ध घटकांचा निचरा केला जातो. पचनक्रियेमध्ये सुद्धा यकृताचे महत्वाचे कार्य असते. आहाराचे पचन करणाऱया पित्ताची (Bile) ची निर्मिती यकृताद्वारेच होत असते.

तसेच ब्लड क्लॉटिंग करणाऱ्या महत्वाच्या प्रथिनांची निर्मिती यकृतातूनच होत असते. यांमुळे जखमेसारख्या रक्तस्त्रावामध्ये रक्त थांबवण्याचे कार्य होण्यास मदत होते. स्निग्ध पदार्थ आणि ग्लुकोजवर प्रक्रिया करुन शरीरासाठी उपयुक्त उर्जा यकृतातच साठवली जाते. विटामिन A, B12 आणि D या जीवनसत्वांचे तसेच लोह आणि कॉपर या खनिजतत्वांचा संचय यकृतातच होत असतो. ही प्रमुख कार्ये सामान्यतः आपल्या यकृतामार्फत होत असतात.

मात्र जेंव्हा यकृत व्हायरल इंफेक्शनमुळे संक्रमित होते त्याला सुज येते तेंव्हा वरील महत्वाची कार्ये यकृतापासून योग्यरित्या होत नाही. त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते, रक्तातील अशुद्धींचा निचरा होत नाही पर्यायाने अपायकारक विषारी घटकांची रक्तात, शरीरात वाढ होऊ लागते. यासाठी येथे हिपॅटायटीस या यकृताच्या महत्वाच्या अशा आजाराची माहिती खाली दिली आहे.

हिपॅटायटीस आजाराची कारणे – Hepatitis Causes in Marathi :

हिपॅटायटीसच्या प्रकारानुसार या आजाराची वेगवेगळी कारणे असतात. व्हायरल इन्फेक्शन हे हिपॅटायटीस होण्यामागचे प्रमुख कारण आहे याशिवाय अतिमद्यपान, वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामामुळे यकृताच्या पेशींवर परिणाम होऊन हिपॅटायटीस होऊ शकतो. अत्यधिक प्रमाणात दारू पिण्याच्या व्यसनामुळे ‘अल्कोहोलिक हिपॅटायटीस’ होण्याचा धोका निर्माण होतो.

हिपॅटायटीस आजार कसा पसरतो..?

हिपॅटायटीस हा संसर्गजन्य विकार आहे. या रोगाचे इन्फेक्शन (संक्रमण) हिपॅटायटीस बाधीत व्यक्तीकडून दुसऱ्या स्वस्थ व्यक्तीमध्ये होत असते.

  • बाधीत रुग्णाच्या रक्त, थुंकी, वीर्य, मल, मुत्र यांमध्ये हिपाटायटिसचे विषाणू असतात. त्यांद्वारे हिपाटायटिसचा प्रसार होत असतो.
  • ‎बाधित व्यक्तीशी लैंगिक संबधातून, रक्तदानातून, अवयव प्रत्यारोपनातून हिपॅटायटीसचा प्रसार होत असतो.
  • ‎हिपॅटायटीस रुग्णाच्या वापरलेल्या IV सलाईन, सुया आणि इंजेक्शनद्वारेही याचा संसर्ग होत असतो.
  • ‎हिपॅटायटीस बाधित रुग्णाच्या वैयक्तिक स्वच्छता साधनांचा जसे रेझर्स, कपडे, टुथब्रश, साबण इ. साधनांचा दुसऱ्या व्यक्तीने वापर केल्यास त्या संदुषित साधनांद्वारे हिपाटायटिसचा प्रसार होतो.
  • ‎हिपॅटायटीसचे विषाणू हे आहार, पाणी यांमध्ये मिसळतात त्यांना दुषित करतात. अशा दुषित आहार-पाण्याचे सेवनाने हिपॅटायटीसची लागण होते.

हिपॅटायटीसचे प्रकार – Hepatitis types in Marathi :

हिपॅटायटीसचे पाच प्रकार आहेत. हिपॅटायटीसचे प्रकार हे यकृताला संक्रमित करणाऱ्या व्हायरसच्या नावाने ओळखले जातात. हिपॅटायटीसचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
(1) हिपॅटायटीस A
(2) हिपॅटायटीस B
(3) हिपॅटायटीस C
(4) हिपॅटायटीस D
(5) हिपॅटायटीस E

(1) हिपॅटायटीस A –
हा प्रकार Hepatitis A virus च्या संक्रमणामुळे होतो. Hepatitis A virus मुळे दुषित झालेल्या आहार, पाण्यातून हिपॅटायटीस A ची लागण होते.

(2) हिपॅटायटीस B –
हा प्रकार Hepatitis B virus (HBV) च्या संक्रमणामुळे होतो. Hepatitis B virus बाधीत झालेल्या रुगणाच्या रक्त, थुंकी, लाळ, मल, मुत्र, वीर्य, लैंगिक संबंधातून याचा प्रसार होत असतो. ‘हिपॅटायटीस ब’ बाधीत गरोदर स्त्रीकडून तिच्या नवजात बालकामध्येही याचा प्रसार होत असतो. हिपॅटायटीस B हा प्रकार सर्वात घातक असतो.

(3) हिपॅटायटीस C –
हा प्रकार Hepatitis C virus (HCV) च्या संक्रमणातुन होतो. हिपॅटायटीस C virus बाधीत झालेल्या रुगणाच्या रक्तदानातून किंवा अवयव प्रत्यारोपन, दूषित सुया यांमुळे याची लागण होत असते.

(4) हिपॅटायटीस D –
हा प्रकार Hepatitis D virus (HDV) च्या संक्रमणामुळे होतो. ज्यांना ‘हिपॅटायटीस B’ ची लागण झाली आहे अशाच रुग्णांना हिपॅटायटिस D होतो. मात्र एकाचवेळी हिपॅटायटीस B व D झाल्याने गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

(5) हिपॅटायटीस E –
हा प्रकार Hepatitis E virus च्या संक्रमणामुळे होतो. दुषित आहार, दुषित पाणी, कच्चे मांस खाल्याने, स्वच्छतेचा अभाव यातून हिपॅटायटीस E चा प्रसार होत असतो. [1]

भारतामध्ये हिपॅटायटीस B, C आणि अल्कोहोलिक हिपॅटायटीसचे प्रमाण जास्त आहे. भारतात तब्बल 4 कोटी रुग्ण हिपॅटायटीस B मुळे त्रस्त आहेत आणि हिपॅटायटीस B मुळे सहा लाखापेक्षा जास्त रुग्ण दरवर्षी मरण पावतात. तर 80 लाखापेक्षा जास्त रुग्ण हे हिपॅटायटीस C मुळे त्रस्त आहेत.

हिपॅटायटीसची लक्षणे – Symptoms of Hepatitis in Marathi :

हिपॅटायटीसची लक्षणे ही आजाराच्या प्रकारावर अवलंबून असतात. हिपॅटायटीसमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.

  • कावीळ होणे, काविळ (Jaundice) हे हिपॅटायटीसचे प्रमुख लक्षण असते.
  • ‎त्वचा, डोळे, नखे पिवळी होतात,
  • ‎लघवीला गडद होणे,
  • ‎शरीरावर खाज सुटणे,
  • ‎भुक मंदावणे,
  • ‎मळमळणे व उलटी होणे,
  • ‎अतिसार होणे, शौचाचा रंग पांढरट असणे,
  • ‎उजव्या कुशीत दुखणे,
  • ‎अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, ताप येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे हिपॅटायटीसमध्ये आसतात. [2]

हिपॅटायटीस आणि कावीळ :

कावीळ म्हणजे Jaundice तर यकृताला सूज येणे म्हणजे हिपॅटायटीस. काविळ हे एक लक्षण आहे तर हिपॅटायटीस हा एक आजार असून या आजारातही कावीळ होत असते. आपण जी कावीळ म्हणतो ती हिपॅटायटीस A आणि E या प्रकारची असते. हिपॅटायटीस A आणि E ची लागण ही विषाणू दूषित अन्न, दूषित पाणी यातून होते. काविळ विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

हिपॅटायटीसचे निदान असे केले जाते :

पेशंट हिस्ट्री, रुग्णामध्ये असलेली लक्षणे आणि शारीरीक तपासणीद्वारे हिपॅटायटीसच्या निदानास डॉक्टरांकडून सुरवात होते. तसेच निदान स्पष्ट होण्यासाठी खालील वैद्यकिय चाचण्यांचा आधारही घ्यावा लागतो.

  • ‎रक्त व लघवीची चाचणी,
  • लीवर फंक्शन टेस्ट,
  • ‎लिव्हर बायोप्सी,
  • ‎लिव्हर एक्स-रे परिक्षण,
  • ‎अल्ट्रासाउंड,
  • ‎Autoimmune ब्लड मार्कर इत्यादी चाचण्या हिपॅटायटीसच्या निदानासाठी केल्या जातील.

हिपॅटायटीसमुळे होणारे दुष्परीणाम – Hepatitis Complications :

हिपॅटायटीस हा यकृताचा एक गंभीर असा आजार असून त्यावर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे आहे. हिपॅटायटीसवर वेळीच योग्य उपचार न केल्यास खालील आरोग्यविषयक दुष्परिणाम उत्पन्न होतात.

  • यकृताचे विविध आजार उद्भवतात,
  • ‎लिव्हर सिरोसिस हा विकार होणे,
  • ‎लिव्हर कॅन्सर होणे,
  • ‎लिव्हर फेल्युअर (यकृत निकामी होणे),
  • ‎किडन्या निकामी होणे,
  • ‎हिपॅटायटीसमुळे रुग्ण दगावण्याचीसुद्धा अधिक शक्यता असते. भारतामध्ये हिपॅटायटीसमुळे दरवर्षी सुमारे 25 लाख रुग्ण मरण पावतात.

हिपॅटायटीस आजारावरील उपचार – Hepatitis Treatments in Marathi :

हिपॅटायटीसच्या प्रकारानुसार उपचारांचे स्वरुप असते. औषधांमध्ये Antiviral औषधांचा समावेश करण्यात येईल.

  • या आजारात रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असते.
  • ‎डिहायड्रेशनची स्थिती उद्भवू नये यासाठी तरल पदार्थांचे अधिक सेवन करावे.
  • ‎हिपॅटायटीसच्या रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेलीच औषधे घ्यावीत. स्वतःहून औषधे आणून प्रयोग करू नका. कारण चुकीच्या औषधांमुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
  • ‎हिपॅटायटीसच्या रुग्णांनी मद्यपान, धूम्रपान करु नये.
  • ‎यकृताचे आरोग्य टिकवणाऱ्या आहाराचा समावेश करावा. तेलकट, चरबीजन्य, मसालेदार आहार घेऊ नये.
  • ‎हिपॅटायटीसवर उपचारासाठी काहीवेळा यकृत प्रत्यारोपनाची (Liver Transplant) शस्त्रक्रियेचीही आवश्यकता पडू शकते. [3]

हिपॅटायटीस प्रतिबंधात्मक उपाययोजना – Hepatitis Prevention tips in Marathi :

हिपॅटायटीस होऊ नये यासाठी काय करावे, हिपॅटायटीस आजारापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती खाली दिली आहे.

  • स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात.
  • ‎बाहेरुन आल्यावर, शौचास-लघवीस जाऊन आल्यावर हात, पाय, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावेत.
  • ‎उघड्यावरील पदार्थ, दुषित आहार, शिळे पदार्थ, कच्चे मांस-मासे खाऊ नयेत.
  • ‎दुषित पाणी पिणे टाळावेत. पाणी गरम करुन, निर्जंतुक करुन प्यावे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी.
  • ‎दुसऱ्याच्या स्वच्छता साधनांचा वापर करु नये. उदा. दुसऱ्याचा साबण, कपडे, टुथब्रश, रेझर्स इ. वस्तु वापरु नये.
  • ‎मद्यपान, धुम्रपान करणे टाळावे. व्यसनांमुळे विविध विषारी घटक शरीरात जात असतात.
  • ‎असुरक्षीत लैंगिक संबंध टाळावेत. वेश्यागमन, गुदामैथुन यासरख्या विकृत-अनैतिक गोष्टींपासून दूर रहावे.
  • ‎रक्त घेताना किंवा अवयव प्रत्यारोपनावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी विशेष दक्ष रहावे. रक्त, अवयव हे हिपॅटायटीस बाधीत नसल्याची खात्री करुन घ्यावी.
  • ‎वापरलेल्या सलाइन्स, इंजेक्शन. सुया यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. वैद्यकीय कचऱ्यापासून दुर रहावे. हिपॅटायटीस रुग्णांची सुश्रृषा करणाऱयांनी, नर्स इ. विशेष दक्षता घ्यावी.
  • ‎लसीकरणामुळे हिपॅटायटीस A आणि B होण्यापासून रक्षण करता येते. [4]

यकृतासंबंधित खालील आजारांचीही माहिती जणून घ्या..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

Information about Hepatitis causes, symptoms, types, prevention & treatments in Marathi language.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...