यकृताचा सिरोसिस – Liver Cirrhosis :

लिव्हर सिरोसिस हा यकृताचा एक गंभीर असा आजार आहे. प्रामुख्याने दीर्घकालीन मद्यपानाचे व्यसन किंवा व्हायरल इन्फेक्शन्स यांमुळे ही समस्या होत असते. लिव्हर सिरोसिसमुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते.

यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे त्यानंतर त्याचे रस, रक्तादीमध्ये रुपांतर करण्यासाठी यकृताचे महत्वपूर्ण योगदान असते.

याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते. रक्ताचं शुद्धीकरण, रक्तात असलेलं विष पित्तावाटे बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं कार्य यकृत करतं.  म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी यकृताचे आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.

लिव्हर सिरोसिस म्हणजे काय..?

लिव्हर सिरॉसिसमध्ये यकृताच्या पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि त्यांची जागा फाइबर्स घेतात. त्यामुळे लिव्हर कडक होते आणि त्याचा आकार लहान झालेला असतो. लिव्हर सिरॉसिसमध्ये लिव्हरचा बहुतांश भाग हा खराब होऊन नष्ट झालेला असतो. यकृत हे आपल्या शरीरात चयापचय क्रियेसाठी अत्यंत आवश्यक असे अवयव असते. लिव्हर सिरॉसिस झाल्यामुळे यकृताचे काम मंदावते, पोर्टल हायपरटेन्शनसारख्या गंभीर स्थिती निर्माण होतात व शरीरावर विविध परिणाम होऊ लागतात.

लिव्हर सिरॉसिस होण्याचे प्रमाण अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये अधिक आढळते. सिरोसिस हा लीव्हरचा एक गंभीर असा रोग असून यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हा आहे.

लिव्हर सिरोसिस होण्याची कारणे – Liver cirrhosis causes :

लिवर सिरोसिसची अनेक कारणे असू शकतात जसे,
• अति प्रमाणात दारू पिणे,
• ‎हिपॅटायटीस B किंवा C ची लागण झाल्यामुळे लिव्हर सिरॉसिस होऊ शकतो. हिपॅटायटीस B किंवा C बाधित रक्त चढवणे किंवा दूषित सुया-इंजेक्शन, असुरक्षित शारीरिक संबंध यांमधून या प्रकारच्या हिपॅटायटीसची लागण होत असते.
• ‎फैटी लिव्हरमुळे यामध्ये यकृतातील चरबीचे प्रमाण वाढलेले असते.
• ऑटोइम्यून आजारांमुळे,
• ‎काही विशिष्ट औषधे जसे acetaminophen किंवा काही अँटीबायोटिक्स, antidepressants यासारखी औषधे अधिक काळ घेतल्याने,
• ‎Wilson disease सारख्या जन्मजात लिव्हरमधील दोषांमुळे,
• ‎याशिवाय लेप्टोस्पायरोसिस, लठ्ठपणा आणि मधुमेह हे विकारसुद्धा लिव्हर सिरॉसिस होण्यास कारणीभूत ठरतात.
काही वेळा सिरॉसिसचे कोणतेही कारण मिळत नाही. अशा रुग्णामध्ये ANA (Anti nuclear antibodies) positive असू शकतात.

यकृत सिरोसिसची लक्षणे – Liver cirrhosis symptoms :

लिव्हर सिरोसिसमध्ये खालील लक्षणे दिसून येतात,
• थकवा जाणवणे,
• अशक्तपणा,
• ‎वजन कमी होणे,
• ‎यकृताच्या ठिकाणी म्हणजे पोटाच्या उजव्या बाजला दुखते,
• ‎रुग्णास वारंवार जुलाब तसेच अपचन होते.
• ‎चक्कर येणे,
• ‎मळमळ व उलटी होणे,
• उलटीतून रक्त पडणे,
• नाकातून रक्त येणे,
• ‎भूख कमी होणे,
• अंगावर खाज सुटणे,
• ‎आजार वाढू लागल्यावर कावीळ होणे,
• ‎पोटात पाणी होणे (जलोदर),
• ‎पायाला सूज येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात.

यकृताच्या सिरोसिसचे निदान व तपासणी :

लिव्हर सिरोसिसचे निदान करण्यासाठी विविध रक्ततपासण्या, लिव्हर फंक्शन टेस्ट, एंडोस्कोपी, लिव्हर बायोप्सी, सोनोग्राफी व सी.टी. स्कॅन तपासणी करावी लागते.

लिवर सिरोसीसचे ग्रेड आणि वर्गीकरण :

विविध रक्ततपासण्या करून सिरोसीसचे A, B आणि C ह्या तीन ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. A ग्रेड म्हणजे सिरॉसिसची सुरुवातीची अवस्था असते तर C ग्रेड मध्ये सिरॉसिस गंभीर अशा शेवटच्या स्टेजमध्ये पोचलेला असतो.

सुरुवातीच्या म्हणजे A ग्रेड सिरॉसिसमध्ये औषधे व योग्य उपचार करून रुग्णाला चांगले आयुष्य जगता येते, मात्र आजार जर ग्रेड C मध्ये गेल्यास अशावेळी यावर अंतिम उपचार म्हणजे यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) हाच उरतो. वेळीच योग्य उपचार न केल्यास यकृत आणि किडनीचे कार्य योग्यरित्या होत नाही प्रसंगी रुग्ण कोमात जाऊन दगावतो.

यकृताच्या सिरोसिसमुळे होणारे दुष्परिणाम :

• पोर्टल हायपरटेन्शनची स्थिती निर्माण होणे,
• रक्तस्त्राव होणे,
• किडनी फेल होणे,
• लिव्हर कॅन्सर होणे,
• पित्ताशयात खडे होणे,
• प्लिहेचा आकार वाढणे,
• अंगावर सूज येणे,
• पोटात पाणी होणे (जलोदर किंवा ascites)
यासारखे दुष्परिणाम सिरोसिसमुळे होऊ शकतात.

लिव्हर सिरोसिसवर हे आहेत उपचार – Liver cirrhosis treatments :

हिपॅटायटीस बी किंवा सीमुळे यकृत पेशी नष्ट होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णास त्यावरील औषधे दिली जाऊ शकतात. शिरांमधील वाढत्या दाबांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे दिली जातील. रक्तस्राव होत असल्यास तो थांबवण्यासाठी उपचार केले जातील. जर अतिमद्यपानामुळे सिरोसिस झालेला असल्यास रुग्णास अल्कोहोलपासून मज्जाव केला जातो.

काहीवेळा लिवर सिरोसिसमध्ये पोटात पाणी धरत असते. अशावेळी पोटात साठलेले पाणी वारंवार काढावे लागते. पोटात पाणी धरू नये यासाठी सिरोसीस झालेल्या रुग्णांनी आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. तसेच पोटात पाणी धरू नये यासाठी औषधेही दिली जातील.

यकृत सिरॉसिस जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असल्यास योग्य औषधोपचारांद्वारे आजार नियंत्रित ठेवता येतो. मात्र खराब झालेले लिव्हर औषधांनी बरे होत नाही. तसेच जर लिव्हर आधीक प्रमाणात खराब झाल्यास लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हा शेवटचा पर्याय असतो.

लिव्हर सिरोसिस होऊ नये म्हणून काय करावे..?

• मद्यपान, दारू या व्यसनांपासून दूर रहावे.
• ‎दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा रक्ततपासणी व लिव्हर तपासणी करून घ्यावी.
• ‎काविळ झाल्यास त्यावर घरगुती उपाय करीत बसू नका.
• ‎कावीळ झाल्यास तज्ञ डॉक्टरांकडून त्याचे योग्य निदान करून हिपॅटायटीसचा कुठला प्रकार आहे ते पाहावे.
• ‎काविळीच्या निदानामध्ये रक्त तपासणीत जर हिपॅटायटीस बी किंवा सी असल्यास डॉक्टरांकडून तात्काळ उपचार सुरू करावेत. यावर पूर्ण उपचार घ्यावेत. उपचार मध्येच थांबवू नये. साधारण चार ते सहा महिने औषधे घेतल्यानं हा आजार बरा होतो.
• ‎फॅटी लिव्हर होऊ द्यायचं नसेल, तर नियमित व्यायाम करावा. तेलकट पदार्थ, चरबीजन्य पदार्थ, फास्ट फूड खाऊ नये.

हे सुद्धा वाचा..
कावीळ आजार माहिती व उपचार
हिपॅटायटीस आजाराची माहिती
पित्ताशयात खडे होणे

4 Sources
© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)