चक्कर येणे – Vertigo :

चक्कर येणे ही एक सामान्य अशी आरोग्यविषयक तक्रार आहे. यामध्ये चक्कर आल्याची म्हणजे आजूबाजूच्या वस्तू आपल्याभोवती फिरत असल्याची भावना होत असते. चक्कर येणे या त्रासाला भोवळ येणे, व्हर्टीगो (Vertigo) असेही संबोधले जाते.

प्रामुख्याने रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, कानासंबंधित आजार, लो ब्लडप्रेशर, डिहायड्रेशन, मानसिक ताण यांमुळे हा त्रास होत असतो. चक्कर येते तेव्हा रुग्णास मळमळ होणे, अस्वस्थता वाटणे, अंधारी येणे, घाम येणे यासारखीही लक्षणे जाणवू लागतात. तसेच चक्कर येऊन पडल्यानंतर थोडया वेळापुरती बेशुद्धीही येऊ शकते.

चक्कर येण्याची कारणे – Causes of Vertigo :

चक्कर येण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. यातील काही कारणे ही सामान्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात.

चक्कर येण्याची सामान्य कारणे :
• कानातील विविध आजारांमुळे,
• कानातील इन्फेक्शन किंवा मळ झाल्यामुळे,
• रक्तदाब कमी झाल्यामुळे, लो ब्लडप्रेशरविषयी माहिती जाणून घ्या..
• रक्तातील साखर कमी झाल्यामुळे, मधुमेहाविषयी माहिती वाचा..
• शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे,
• रक्ताल्पता किंवा ऍनिमियामुळे,
• स्पॉंडिलोसीससारख्या मानेच्या विकारामुळे,
• ‎डोळ्यांचे आजार, अपस्मार (फिट येणे), ताप, डोकेदुखी, मायग्रेनच्या त्रासामुळेही चक्कर येऊ शकते.
• उंच ठिकाणावरून खाली पाहणे,
• प्रवासावेळी बाहेर डोकावणे,
• ‎मानसिक तनाव तसेचं काही औषधांच्या दुष्परिणामामुळेही चक्कर येत असते.

चक्कर येण्याची काही गंभीर कारणे :
• कानासंबंधीत मेनियर आजार झाल्यामुळे, या आजारात शरीराचा तोल संभाळण्यावर परिणाम होतो.
• मेंदूला काही कारणांमुळे रक्तातून मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास चक्कर येते.
• ‎जुलाब-उलट्यांमुळे, उष्णतेमुळे अधिक घाम येणे किंवा जास्त व्यायाम केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशनमुळेही चक्कर येऊ शकते.
• डोक्याला दुखापत झाल्यामुळे,
• पक्षाघात (स्ट्रोक), हृदयविकार, मल्टिपल स्क्लेरोसिस, ब्रेन ट्युमर्स या गंभीर आजारातही चक्कर येऊ शकते.

चक्कर आल्यावर अशी लक्षणे जाणवितात – Vertigo symptoms

• आजूबाजूच्या वस्तू आपल्याभोवती फिरत आहेत असे वाटते,
• डोके गरगरणे,
• डोळ्यासमोर अंधारी येणे,
• मळमळ व उलटी होणे,
• डोके दुखणे,
• शरीराचा तोल जाऊन खाली पडणे,
• बेशुद्ध होणे
अशी लक्षणे यामध्ये असतात.

चक्कर येणे यावरील उपचार – Vertigo treatments :

कोणत्या कारणांमुळे चक्कर येत आहे यावर याचे उपचार ठरतात. त्यामुळे चक्कर येत असल्यास, ती कशामुळे येत आहे याचे निश्चित निदान होणे आवश्यक असते. निदानासाठी आपले डॉक्टर डोळे व कानांची तपासणी करतील, रक्तदाब, ब्लडशुगर तपासले जाईल. काहीवेळा एक्स-रे, CT स्कॅन, MRI स्कॅन किंवा सेरेब्रल अँजिओग्राफी अशा तपासण्या करण्याची आवश्यकता भासू शकते.

चक्कर येणे यावर प्रामुख्याने वेस्टिब्युलर ब्लॉकिंग एजंट्स (VBA) प्रकारची औषधे वापरली जातात. यासाठी अँटीहिस्टामाइन्स, बेंझोडायजेपाइन्स किंवा antiemetics औषधे दिली जातील.

चक्कर आल्यावर काय करावे..?

चक्कर आल्यानंतर कोणते उपाय व प्रथमोपचार करावेत याची माहिती खाली दिली आहे.
• चक्कर आलेल्या व्यक्तीला आरामशीर खाली झोपवावे.
• ‎चक्कर येऊन पडणाऱ्या व्यक्तीला आधार देऊन हळूहळू खाली झोपण्यास मदत करावी.
• ‎चक्कर आल्यास रुग्णाचे पाय थोडे वर आणि डोके खाली करावे. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होण्यास मदत होते.
• ‎चक्कर येऊन पडल्यानंतर आलेली बेशुद्धी थोडया वेळात नाहीशी होते. अनेकदा आपोआप बरे वाटते. रुग्ण शुद्धीवर येण्यासाठी त्याच्या तोंडावर हलकेसे पाणी शिंपडू शकता.
• ‎रुग्ण शुद्धीवर आल्यावरही त्याला आरामशीर झोपवावे. रुग्णास लगेच उभे राहण्यास देऊ नका.
• ‎जास्त व्यायाम, अथवा उपवास यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ चक्कर येते. तेंव्हा त्याला थोडी साखर खायायला दिल्यास ही चक्कर लगेच थांबते.
• ‎चक्कर येऊन गेल्यावरही रुग्णाने आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व उपचार करून घ्यावे. ज्यामुळे चक्कर येण्याच्या मूळ कारणाचे निदान होण्यास मदत होईल.

धोकादायक लक्षणे ओळखा..
चक्कर आलेल्या रुग्णात खालील धोकादायक लक्षणे दिसून आल्यास त्या रुग्णास तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जावे.
• तीव्र डोकेदुखी,
• ‎वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double vision – diplopia),
• ‎डोळ्यांनी ‎अजिबात न दिसणे,
• ‎ऐकू न येणे,
• ‎बोलण्यास त्रास होणे,
• हाता-पायात कमजोरी जाणविणे,
• ‎चालण्यास असमर्थ असणे,
• तोल जाऊन पडणे,
• ‎अधिक काळ बेशुद्धी असणे,
• ‎छातीत दुखणे ही लक्षणे दिसून येत असल्यास रुग्णास तातडीने दवाखान्यात घेऊन जावे किंवा 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.

वारंवार चक्कर येत असेल तर अशी घ्यावी काळजी – Vertigo solution tips :

• ‎संतुलित आहार घ्यावा.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
‎नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
• पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
• ‎मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करू शकता.
• काहीवेळा बेडवरून झोपलेल्या स्थितीतून लगबगीने उठून उभे राहिल्याने रक्तदाब घसरतो व त्यामुळे चक्कर येऊ शकते. यासाठी बेडवरून उठताना थोडावेळ बसून सावकाश उभे राहावे.
• ‎वारंवार चक्कर येण्याचा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान आणि उपचार करून घ्यावेत.

वरचेवर चक्कर येत असल्यास असा घ्यावा आहार – Vertigo diet chart :

चक्कर येऊ नये यासाठी काय खावे..?
• वेळच्यावेळी जेवण करावे. अधिकवेळ उपाशी राहू नये.
• हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, तृणधान्ये, कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, सुखामेवा, ग्रीन टी, मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश असावा.
• अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन-D व ओमेगा -3 फॅटी ऍसिड असणारे पदार्थ खाण्यामुळे चक्कर येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
• हिरव्या भाज्या व विविध फळे यात उपयुक्त अँटीऑक्सिडेंट असतात तर मासे व सुखामेवा यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड असते.
• व्हिटॅमिन-D साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 मिनिटे बसावे.
• डिहायड्रेशन होऊन चक्कर येऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पाण्याशिवाय शहाळ्याचे पाणी, रसदार फळे आहारात समाविष्ट करावित.

चक्कर येण्याची समस्या असल्यास काय खाऊ नये..?
• कॅफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी, चहा, चॉकलेट, एनर्जी ड्रिंक्स असे पदार्थ खाणेपिणे टाळावे.
• आहारात मिठाचा वापर कमी करावा. चिप्स, लोणचे असे खारट पदार्थ खाणे टाळावे.
• ऍसिडिटी वाढवणारे पदार्थ म्हणजे तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, सोडयुक्त पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
• टायरामाइन घटक असणारे पदार्थ म्हणजे रेड वाइन, चिकनचे यकृत, आंबट दही खाणे टाळा.
• मद्यपान, धूम्रपान करणे टाळावे. अल्कोहोलमुळे चक्कर येण्याची अधिक शक्यता असते.
• आयबुप्रोफेन, ऍस्पिरिन अशी वेदनाशामक गोळ्या औषधे वारंवार घेणे टाळावे.

खालील उपयुक्त लेखसुद्धा वाचा..
मायग्रेन डोकेदुखी – अर्धशिशीचा त्रास व उपाय
फेफरे किंवा फिट येणे या आजाराची माहिती
पित्ताचा त्रास आणि त्यावरील उपाय/a>
पक्षाघात, लकवा याविषयी माहिती

4 Sources
© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)