Dr Satish Upalkar’s article about Fatty liver in Marathi.
फॅटी लिव्हर – Fatty liver in Marathi :
फॅटी लिव्हर ही यकृताची एक प्रमुख समस्या आहे. फॅटी लिव्हरला हेपॅटिक स्टीटोसिस असेही म्हणतात. जेव्हा यकृतामध्ये चरबी अधिक जमा होते तेव्हा असे होते. यकृतामध्ये कमी प्रमाणात चरबी असणे हे सामान्य आहे, परंतु खूप जास्त प्रमाणात चरबी असल्यास यामुळे आरोग्य समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा, अत्यधिक दारू पिणे, चरबीयुक्त पदार्थ खाणे अशा विविध कारणांनी फॅटी लिव्हर हा यकृत आजार होतो. येथे फॅटी लिव्हर ची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
फॅटी लिव्हर म्हणजे काय ..?
जेंव्हा जास्त प्रमाणात चरबी ही यकृताच्या पेशींमध्ये जमा होऊ लागते, तेंव्हा त्या स्थितीला फॅटी लिव्हर असे म्हणतात. यकृतामध्ये काही प्रमाणात चरबी असणे हे सामान्य आहे, मात्र जर चरबीचे प्रमाण हे यकृताच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास फॅटी लिव्हर हा यकृताचा विकार होतो. परिणामी, यकृत आपले कार्य योग्यरीत्या करू शकत नाही त्यामुळे अनेक आरोग्य समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात.
यकृत हा आपल्या शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. तसेच यकृत हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. पचनक्रियेत यकृताची महत्वाची भूमिका असते. तसेच यकृत हे रक्तातील हानिकारक पदार्थ फिल्टर करत असते. अशा या यकृताचे महत्वाचे कार्य फॅटी लिव्हर मुळे प्रभावित होते. 40 ते 60 वयाच्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते.
फॅटी लिव्हर ची कारणे – Fatty liver causes in Marathi :
- दारू, अल्कोहोल अधिक पिण्यामुळे फॅटी लिव्हर होतो,
- आहारात चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे,
- लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो,
- डायबेटिस,
- रक्तातील चरबीचे म्हणजे ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे,
- रक्तातील कोलस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यामुळे,
- हिपॅटायटीस-C च्या इन्फेक्शनमुळे,
- गर्भावस्था,
- काही प्रकारच्या औषधांचे दुष्परिणाम,
- आनुवंशिकता
अशी अनेक फॅटी लिव्हर ची अनेक कारणे असू शकतात.
फॅटी लिव्हरचे प्रकार – Types of fatty liver :
फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत.
1) अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज
2) नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज
1) अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD) –
जास्त प्रमाणात अल्कोहोल, दारू पिणाऱ्यांमध्ये हा प्रकार दिसून येतो. अल्कोहोलचे जास्त सेवन हे यकृतावर चरबी जमा होण्याचे एक प्रमुख कारण आहे. तसेच अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे यकृताचे नुकसान होत असते.
2) नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) –
जास्त चरबीयुक्त आहार सेवन करणाऱ्या व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, मधुमेही रुग्णांमध्ये हा प्रकार दिसून येतो. म्हणजे तुम्हाला जर दारू वैगेरे अल्कोहोलचे व्यसन नसले तरीही या प्रकारचा फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता असते.
फॅटी लिव्हर डिसीजचे चार टप्पे (Grades) असतात.
साधारण फॅटी लिव्हर (Simple fatty liver) –
या अवस्थेत यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते परंतु यकृतला सूज येत नाही. या अवस्थेत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि योग्य आहार घेतल्यास त्रास बरा होतो.
स्टीटोहेपॅटायटीस (Steatohepatitis) –
या स्थितीत यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते तसेच यकृताला सूजही येते. यकृताला सूज आल्याने कावीळ वैगेरे लक्षणे यामध्ये जाणवू शकतात.
फायब्रोसिस (Fibrosis) –
यकृताला वारंवार सूज आल्यामुळे यकृताला जखम होते. या स्थितीला फायब्रोसिस असे म्हणतात.
सिरोसिस (Cirrhosis) –
ही फायब्रोसिस ची पुढची अवस्था असून यात यकृताच्या पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि त्यांची जागा फाइबर्स घेतात. या अवस्थेत यकृत आपले नॉर्मल कार्य करू शकत नाही.
पहिल्या टप्प्यानंतर फायब्रोसिस किंवा सिरोसिस ह्या अवस्था येण्यासाठी साधारण तीन ते चार वर्षे लागू शकतात. अशावेळी साधारण फॅटी लिव्हर ह्या पहिल्या टप्प्यात याचे निदान झाल्यास योग्य आहार घेऊन पुढील समस्या टाळता येणे शक्य आहे.
फॅटी लिव्हर ची लक्षणे – Fatty liver symptoms in Marathi :
फॅटी लिव्हर ची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यातचं ओळखणे खूप महत्वाचे असते. मात्र बऱ्याचवेळा यामध्ये सुरवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. फॅटी लिव्हर मध्ये खालील लक्षणे जाणवू शकतात.
- उजव्या कुशीत दुखणे,
- वजन कमी होणे,
- अशक्त वाटणे,
- पचनाच्या तक्रारी उद्भवणे अशी लक्षणे फॅटी लिव्हर मध्ये सुरवातीला जाणवू शकतात.
फायब्रोसिस किंवा सिरोसिस ह्या टप्प्यातील फॅटी लिव्हर ची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
- उजव्या कुशीत दुखणे,
- डोळे व त्वचा पिवळसर होणे,
- लघवीला गडद होणे,
- शौचास फिकट होणे,
- कावीळ होणे,
- ताप येणे,
- त्वचेला खाज सुटणे,
- भूक मंदावणे,
- वजन कमी होणे,
- अशक्त वाटणे,
- उलट्या व मळमळ होणे,
- पोटात पाणी जमा होणे,
- पायावर सूज येणे,
यासारखी लक्षणे फायब्रोसिस किंवा सिरोसिस ह्या टप्प्यात फॅटी लिव्हरमध्ये जाणवू शकतात.
फॅटी लिव्हर चे निदान – Fatty liver Diagnosis test :
रक्त चाचण्यांमध्ये लिव्हर एन्झाईमचे प्रमाण वाढल्याचे आढळल्यास फॅटी लिव्हर रोगाचे निदान होऊ शकते. यासाठी alanine aminotransferase test (ALT) आणि aspartate aminotransferase test (AST) ह्या ब्लड टेस्ट केल्या जातात. जर ह्या ब्लड टेस्टचा रिपोर्ट positive आल्यास, फॅटी लिव्हरचे निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, लिव्हर बायोप्सी अशा तपासण्या केल्या जातात.
फॅटी लिव्हर वरील उपचार – Fatty liver treatments in Marathi :
फॅटी लिव्हरवर कोणतेही विशिष्ट असे औषध उपलब्ध नाही. उपचारामध्ये खालील दिशानिर्देश पाळणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे फॅटी लिव्हर ची समस्या लवकर दूर होते.
- दारू, अल्कोहोल पिणे टाळा.
- वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करावा.
- चरबीयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ, मिठाचे पदार्थ, मांसाहार, साखर, ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ खाणे कमी करावे.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे यांचा समावेश अधिक करावा. - पुरेसे पाणी प्यावे.
- ग्रीन टीचे सेवन करा. यामुळे यकृतामध्ये जमा होणारी चरबी कमी होते आणि यकृताचे कार्य सुधारते.
- यकृताला अपायकारक असणारी औषधे खाणे टाळा.
- आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध गोळ्या घेणे टाळा.
अशी काळजी घेतल्यास पहिल्या टप्यातचं फॅटी लिव्हर टाळता येतो आणि हा आजार लवकर बरा होतो व पुढील गुंतागुती टाळता येतात.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – लिव्हर सिरॉसिस विषयी माहिती व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
4 SourcesIn this article information about Fatty liver Causes, Symptoms, Diagnosis and Treatments in Marathi language. This article is written by Dr Satish Upalkar.