पित्तामुळे डोके दुखणे –
पित्तामुळे अनेकांचे डोके दुखत असते. प्रामुख्याने वारंवार तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ, चहा-कॉफीचा अतिरेक, अपुरी झोप, तणाव, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास व त्यामुळे डोके दुखू लागते.
पित्तामुळे डोके दुखण्याची कारणे –
- वरचेवर तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाणे,
- चहा, कॉफीचे अतिप्रमाण,
- उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे किंवा बराच वेळ उपाशी राहणे,
- तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारखी व्यसने,
- मानसिक तणाव, राग,
- वरचेवर डोके किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेणे,
- अपुरी झोप किंवा अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.
अशा विविध कारणांनी पित्त वाढते व त्यामुळे डोके दुखणे, ऍसिडिटी, छातीत जळजळ होणे, अल्सर यासारखे त्रास होऊ लागतात.
पित्तामुळे डोके दुखणे यावर घरगुती उपाय –
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा.
- वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही पित्तामुळे डोके दुखणे कमी होते.
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास काही वेळ झोप घ्यावी. यामुळेही आराम मिळून डोके दुखणे थांबते.
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोके दुखते.
- कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही पित्तामुळे डोके दुखत असल्यास आराम मिळतो.
असे घरगुती उपाय पित्तामुळे डोके दुखणे यावर उपयोगी ठरतात.
पित्तामुळे डोके दुखू नये यासाठी काय करावे ..? –
- मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
- संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
- वेळेवर जेवण घ्या. अधिक वेळ उपाशी राहू नका.
- दिवसभरात पुरेसे पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लास पाणी प्यावे.
- दररोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे.
- स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
- जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
- नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
- मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
- तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
- वारंवार डोके दुखत असल्यास उठसुठ वेदनाशामक गोळ्या घेणे टाळा.
अशी काळजी घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. त्यामुळे पित्त आटोक्यात राहिल्याने डोके दुखत नाही.
हे सुध्दा वाचा –
अंगावर पित्त उठणे
अर्धे डोके दुखणे
Read Marathi language article about Pitta headache and home remedy. Last Medically Reviewed on February 21, 2024 By Dr. Satish Upalkar.