अल्सर म्हणजे काय ..?
अल्सर म्हणजे पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास होणारी जखम. पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्या पाचक रसाचा परिणाम या अवयवांच्या आतील आवरणावर होऊन अल्सर होत असतात. योग्य उपचार व पथ्य यांमुळे अल्सर लवकर बरे होऊ शकतात.
पोटात अल्सर होणे :
अल्सरचा त्रास अनेकांना असतो. अल्सरमुळे पोट दुखणे, वारंवार पित्त होणे, पोटात जळजळ होणे, आग होणे यासारखे त्रास होत असतात. अशी लक्षणे असल्यास अनेकजण आम्लपित्त म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात.
अल्सर असल्यास त्यावर उपचार न केल्यास अल्सर गंभीर होऊन पोट किंवा आतड्याला छिद्र पडणे, पोटात रक्तस्राव होणे अशी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.
अल्सर ची लक्षणे (Peptic ulcer symptoms) :
अल्सर ची पुढीलप्रमाणे लक्षणे असतात.
- जेवल्यावर लगेच पोट दुखणे,
- पोटात वरच्या बाजूला वारंवार दुखणे,
- रात्री-अपरात्री पोटदुखी चालू होणे.
- पोट फुगल्यासारखे वाटणे,
- ऍसिडिटी (आम्लपित्त) होणे,
- छातीत व पोटात जळजळणे,
- भूक व वजन कमी होणे,
- मळमळ आणि उलट्या होणे असे त्रास अल्सरच्या रुग्णाला वरचेवर होत असतात.
तसेच रुग्णाने अल्सरच्या त्रासावर उपचार न घेतल्यास हा त्रास पुढे वाढत जातो. अशावेळी उलटीतून रक्त पडणे किंवा पोटात रक्तस्राव झाल्यामुळे शौच काळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसून येतात.
आणि त्यानंतरही अल्सरकडे दुर्लक्ष केल्यास, अल्सर बळावून जठरात खूप रक्तस्त्राव होतो, अल्सर फुटून आतड्यावरील आवरणांना छिद्र पडू शकते. पोटात अतिप्रमाणात रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जीवावरही बेतते.
अल्सर होण्याची कारणे (Causes of ulcer) :
- अल्सरचा त्रास प्रामुख्याने पोटातील व ड्युओडेनममधील आम्लता (ऍसिडिटी) वाढल्यामुळे होतो.
- काही रुग्णांना हेलिकोबॅक्टर पायलोरी (H पायलोरी) नावाच्या जंतूंचा संसर्ग जठरात झाल्यामुळेही अल्सर होत असतो. या जंतूंची लागण ही दूषित अन्न व पाण्यातून होते.
- वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेण्याच्या सवयीमुळे अल्सर होऊ शकतो. प्रामुख्याने स्टिरॉइड्स, अॅस्पिरीन, आयबुप्रोफेन, काँबिफ्लॅम अशाप्रकारची औषधे दीर्घकाळ घेत राहिल्यास अल्सर होतो.
- धूम्रपान, तंबाखू व मद्यपान यासारख्या व्यसनामुळे अल्सर होण्याचा धोका वाढतो.
- वारंवार तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे अल्सर होण्याचा धोका वाढतो.
- वेळी अवेळी जेवणे, जास्त काळ उपाशी राहण्याची सवय,
- अनुवंशिकता,
- मानसिक ताणतणाव अशी विविध कारणे अल्सर होण्यास जबाबदार ठरतात.
अल्सर चे प्रकार (Peptic ulcer types) :
पेप्टिक अल्सरचे तीन प्रकार आहेत.
1) गॅस्ट्रिक अल्सर – ह्यामध्ये पोटात अल्सर होतो.
2) esophageal ulcers – अन्ननलिकेच्या आत अल्सर होतो.
3) ड्युओडेनल अल्सर – यामध्ये लहान आतड्याच्या वरील भागात असणाऱ्या ड्युओडेनम (ग्रहणी) मध्ये अल्सर होतो.
अल्सरचे निदान असे केले जाते :
पेशंट हिस्ट्री आणि रुग्णाची तपासणी करून डॉक्टर अल्सरचे निदान करू शकतात. तसेच अचूक निदानाकरिता एन्डोस्कोपी, एन्डोस्कोपिक बायोप्सी, बेरियम परीक्षण, ब्लड टेस्ट, शौचाची तपासणी याद्वारे अल्सरचे निदान केले जाते. काहीवेळा पोटाचा CT स्कॅन ही करावा लागतो.
अल्सर वरील उपचार (Ulcer treatments) :
अल्सरवर ओमीप्रॅझॉल, पॅण्टोप्रॅझॉल, रॅबिप्रॅझॉल अशी पित्त कमी करणारी antacids औषधे डॉक्टर देतात. ती औषधे डॉक्टर जोपर्यंत सांगतील तेवढे दिवस घ्यावीत. अल्सर जर ‘H पायलोरी’ या बॅक्टेरियामुळे झालेला असल्यास त्यावर योग्य अँटिबायोटिक आणि antacids औषधे दिली जातील. अल्सरवर उपचार चालू असताना रुग्णाने योग्य खानपान घेणे गरजेचे असते. अल्सरमध्ये कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या.
आम्लपित्त कमी करणारी औषधे उपयोगी न ठरल्यास व अल्सरची स्थिती गंभीर असल्यास, अल्सरमुळे जठर किंवा आतड्याला छिद्र पडल्यास अल्सरवर शस्त्रक्रिया करावी लागते.
अल्सर असल्यास घ्यायची काळजी –
- डॉक्टरांनी अल्सरवर दिलेली औषधे घ्या.
- मसालेदार तिखट पदार्थ खाणे टाळा.
- जास्त गरम पदार्थ खाणे टाळा.
- चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळा.
- मद्यपान, तंबाखू, सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहा.
- ibuprofen, aspirin अशी वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध गोळ्या घेणे टाळा.
हे सुद्धा वाचा..
आम्लपित्त म्हणजे काय व आम्लपित्तवरील उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about Peptic ulcer causes, symptoms and treatments. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.