आरोग्य स्त्रियांचे

7238
views

आरोग्य स्त्रियांचे :
घरातील जबाबदाऱ्या, घरातील लोकांचे आरोग्य सांभाळणारी स्त्री स्वत:च्या आरोग्याबाबत मात्र बरेचदा फारच उदासीन दिसते. अगदीच सहन होण्यापलीकडची परिस्थिती निर्माण झाली तरच ती दवाखान्याची पायरी चढेल. मुलांचं शिक्षण, नोकरी, घरातील ज्येष्ठांची जबाबदारी, इतरांची आजारपणं यातच स्त्रियां एवढय़ा गुंतून पडतात की स्वत:च्या आरोग्याकडे त्यांना लक्ष द्यायला वेळच मिळत नाही किंवा आपणही माणूस असून आपलं शरीरही कुरबूर करते हे त्या सोयीस्कररीत्या विसरतात. स्त्री आणि पुरुषांच्या आरोग्य समस्या अनेक बाबतीत एकसारख्या असल्या तरीही, फक्त स्त्री संबधीत काही आरोग्याच्या समस्या असतात. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी Gynecology नावाची स्वतंत्र वैद्यकिय शाखा अस्तित्वात आली आहे.

स्त्रीयांमध्ये रोग उत्पन्न प्रमुख कारणे :

  • पोषणतत्वरहित आहाराचे सेवन करणे. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध ताजी फळे यांचे अपुऱ्‍या सेवनाने. अधिक स्नेहयुक्त, चरबीयुक्त पदार्थांच्या सेवन केल्याने. चहा, कॉफी यांच्या अतिरेकामुळे विकारांची उत्पत्ती होते.
  • स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यामुळे,
  • शारीरिक श्रमाचा अभाव, बैठी जीवनपद्धत्तीमुळे.
  • सौंदर्यासंबंधीच्या चुकिच्या संकल्पनेमुळे.
  • मानसिक ताणतणावामुळे,
  • डॉक्टरांच्या सुचनेशीवाय घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिवापरामुळे स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने विविध विकारांची उत्पत्ती होते.

प्रामुख्याने आहारातील पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे, स्वत:च्या आरोग्याबाबत आढळणारा निष्काळजीपणा आणि तणावामुळे स्त्रियांमध्ये विकारांची उत्पत्ती होत असते. यामध्ये प्रजननविषयक विकारापासुन ते मानसिक तणाव, डिप्रेशन, उच्चरक्तदाब, हृद्यरोग, मधुमेह, स्थुलता, हाडे व सांध्यांचे विकार (ऑस्टिओपोरोसिस, संधीवात), कॅन्सर (स्तनाचा, गर्भाशयाचा) आणि रक्तल्पता यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. वेगवेगळ्या कर्तव्यपूर्तीत गुंतलेल्या स्त्रिया आपल्या आरोग्याकडे, शरीराच्या कुरबुरींकडे नेहमीच दुर्लक्ष करताना आढळतात. मात्र, आता त्यांनी आपली मानसिकता बदलून आरोग्याबाबत सजग होणं गरजेचं झालं आहे.

स्त्रीयांमधील कैन्सरचे प्रमाण :

  • भारतात प्रत्येक वर्षी साधारण 1.5 लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचे निदान होते. तर सुमारे 70 हजार महिलांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो.
  • गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने पीडित महिलांच्या संख्येमुळे भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
  • स्तनाच्या कर्करोगामुळे भारतात 2013 मध्ये 70 हजार 218 महिलांचा मृत्यू झाला. ही संख्या जगभरात सर्वात जास्त आहे.

कोणत्या रोगांविषयी स्त्रीयांनी विशेष दक्ष रहावे :
◦ गर्भाशयाचा कैन्सर
◦ स्तनाचा कैन्सर
◦ हृद्यविकार
◦ डिम्बग्रंथीचा कैन्सर (Ovarian cancer)
◦ मलाशयाचा कैन्सर
◦ मधुमेह
◦ उच्चरक्तदाब
हे रोग अत्यंत कमी लक्षणे जाणवतात आणि हे रोग कधी गंभीर होऊन मृत्युस कारण ठरतात हे कळत नाही. शरीरात छुप्या स्वरुपात राहत असल्यामुळे या रोगांना ‘Silent killer diseases’ असे म्हणतात. या छुप्या स्वरुपातील रोगांपासून रक्षण करण्यासाठी दक्ष असावे लागते. वरील रोग नसल्याची खात्री वैद्यकिय तपासणींच्या द्वारे वेळोवेळी करुन घेणे गरजेचे असते.

पुरुषांच्यामानाने स्त्रीयांमध्ये अधिक प्रमाणात होणारे विकार :
अनेक रोग हे स्त्री आणि पुरुष यां दोहोंमध्ये होत असतात. मात्र त्यातील काही रोग हे पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये अधिक होण्याची संभावना असते.
– पित्ताशयातील खडे (Gallstones) हा विकार स्त्रीयांमध्ये पुरुषांपेक्षा 3 ते 4 पट अधिक प्रमाणात आढळतो.
– अर्धशिशी (Migraine headaches) सामान्यतः तीन व्यक्तींपैकी दोन महिलांमध्ये तर एका पुरुषामध्ये हा रोग आढळतो.
– मुत्रपथ संसर्ग, मुत्राशयाचा संसर्ग होण्याचे प्रमाण स्त्रीयांमध्ये अधिक आहे.

तसेच खालील विकार हे स्त्री मध्ये पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात होण्याची शक्यता असते.
उच्चरक्तदाब, आमवात, अस्थिपोकळ होणे (Osteoporosis),
किडन्यांचे विकार सामान्यतः उच्चरक्तदाबामुळे स्त्रीयांमध्ये होण्याची अधिक शक्यता असते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.