ऍसिडिटी होण्याची कारणे, लक्षणे व ऍसिडिटीवर हे करा आयुर्वेदिक उपाय – Acidity solution in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

ऍसिडिटी होणे – Acidity :

अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि तणावामुळे ऍसिडिटीचा त्रास अनेकांना होत असतो. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल कमी-अधिक प्रमाणात सतत तयार होत असते. या आम्लामुळे अन्न पचायला मदत करते.

ऍसिडिटीची लक्षणे :

पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटी झाल्यास छातीमध्ये, पोटामध्ये किंवा घशात जळजळणे, आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट पाणी सुटणे, मळमळ, डोकेदुखी, मायग्रेन डोकेदुखी अशी लक्षणे जाणवू शकतात.

ऍसिडिटी होण्याची कारणे :

• मसालेदार, तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, कोल्ड्रिंक्स, चहा-कॉफी अधिक पिण्यामुळे,
• पोट खूप वेळ रिकामे ठेवणे,
• वेळीअवेळी जेवणे किंवा जेवणाच्या वेळा न पाळणे या सवयीमुळे,
• धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे,
• मानसिक ताणतणाव,
• जागरण केल्यामुळे,
• डोकेदुखी व अंगदुखीच्या गोळ्या वरचेवर घेत राहिल्यामुळे,
तसेच पोटात आढळणाऱ्या ‘पायलोराय’ या जंतूंमुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून अॅसिडिटी होत असते.

ऍसिडिटी वर हे करा घरगुती उपाय :

आले –
ऍसिडिटी झाल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

थंड दूध –
थंड दूध पिण्यामुळेही ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. याशिवाय मनुका दुधात घालून उकळून ते दूध थंड झाल्यावर प्यावे व मनुकाही खाव्यात.

केळे –
केळ्यात नैसर्गिकरीत्या Antacids असतात. त्यामुळे ऍसिडिटीवर केळे खाल्याने आराम मिळतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

बडीशेप –
जेवणानंतर बडीशेप चावून खाल्यामुळे ऍसिडिटी होण्यापासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे अन्नपचनही व्यवस्थित होते.

तुळशीची पाने –
अॅसिडिटी होत असल्यास तुळशीची काही पाने चावून खावीत.

अॅसिडिटी होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

• उपाशीपोटी फार वेळ न राहू नये.
• वेळेवर जेवण घ्यावे.
• रोज सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) जरूर करावा.
• चमचमीत मसालेदार पदार्थ, आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, लोणची, कच्चा टोमॅटो, ओलं खोबरं, पापड, अति मांसाहार, हरभऱ्याची डाळ या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
• वारंवार चहा-कॉफी पिणे टाळावे.
• स्मोकिंग, मद्यपान ह्या व्यसनांपासून दूर राहावे.
• पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
• नियमित व्यायाम व योगासने करावे.
• राग-चिंता-काळजी यावर नियंत्रण
ठेवावे. यासाठी मानसिक ताणतणावांचे नियोजन करावे.
• रात्री न जागणे व दिवसा न झोपणे.
• वारंवार वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे टाळावे.