लेप्टोस्पायरोसिस आजार – Leptospirosis in Marathi :

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणुपासुन (बॅक्टेरिया) होणारा साथीचा रोग असुन याचा प्रसार उंदिर, घुशी, मुंगूस, डुक्कर, कोल्हा तसेच गाय, म्हैस, घोडा, कुत्रा आणि मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांच्या लघवीतुन होत असतो. लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणु पाण्यात तसेच चिखलात अनेक महिने जिवंत राहु शकतात. लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग मानव आणि प्राण्यांना होतो. पावसाळ्यात या आजाराची जास्त प्रमाणात साथ आलेली आढळते.

लेप्टोस्पायरोसिसची कारणे – Leptospirosis causes in Marathi :

बाधीत प्राण्यांच्या मुत्रातुन लेप्टोस्पायरोसिस जीवाणु पाणी, चिखल यात मिसळतात. अशा दूषित पाण्याशी आपला संपर्क आल्यास हे जीवाणू आपली त्वचा किंवा श्लेष्मल पडदा माध्यमातून शरिरात प्रवेश करतात. तसेच पिण्याचे पाणी दुषित असेल तर त्यातुनही या रोगाचा प्रसार होत असतो.

दूषित पाणी किंवा चिखलाचा संपर्क आपल्या शरीरावरील उघड्या जखमा, पायावारील जखमा यातून बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करतात. याशिवाय डोळ्यातून, श्लेष्मल त्वचेतून तसेच दूषित पाणी पिण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचे बॅक्टेरिया मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात. अशाप्रकारे लेप्टोस्पायरोसिसचा आजार प्राण्यांकडून मनुष्याकडे पसरत असतो. हा आजार सहसा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.

लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका कोणाला जास्त असतो..?
पावसाळ्याच्या दिवसात, पूरस्थितीमध्ये लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असतो. तसेच चिखल व प्राण्यांशी संपर्क येत असणारा शेतकरी वर्ग, सांडपाणी निचरा करणारे कचरा कामगार यांना पावसाळ्याच्या दिवसात ह्या आजाराचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.

लेप्टोस्पायरोसिसचे प्रकार :

अवस्थेनुसार या आजाराचे दोन मुख्य प्रकार (types) होतात.
1) पहिली अवस्था (Mild Leptospirosis)
2) दुसरी अवस्था (Severe Leptospirosis)

साधारण 90% रुग्ण हे पहिल्या अवस्थेतील असतात. तर 5 ते 15 टक्के रुग्ण हे गंभीर अशा दुसऱ्या अवस्थेतील असतात. लेप्टोस्पायरोसिसवर परिणाम कारक अँटी-बायोटिक्स उपलब्ध आहेत. पहिल्या अवस्थेत वेळीच आणि योग्य उपचार केल्यास आजार दुसऱ्या अवस्थेत जाण्यापासून व आजार पूर्णपणे नाहीसा होण्यास मदत होते. मात्र जर योग्य उपचार न केल्यास आजार वाढत जाऊन दुसऱ्या अवस्थेत पोहोचून किडनी, फुफ्फुसे, मेंदू, लिव्हर, हृदय यासारख्या महत्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन गंभीर स्थिती निर्माण होते.

लेप्टोस्पायरोसिस आजाराची लक्षणे – Leptospirosis symptoms :

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे ही फ्ल्यू, मलेरिया, डेंग्यू ताप, ब्रुसेलोसिस या आजारासारखी असतात. शरिरात जीवाणूनी प्रवेश केल्या नंतर 5 ते 14 दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरवात होते. तर काही लोकांमध्ये कुठलीही लक्षणे दिसुन येत नाही.

पहिल्या अवस्थेतील लक्षणे (Mild Leptospirosis) –

 • तीव्र ताप,
 • ‎थंडी वाजून येणे,
 • खोकला,
 • ‎डोकेदुखी,
 • अंगदुखी, सांधेदुखणे,
 • थकवा जाणवणे,
 • ‎घसा खवखवणे,
 • ‎पोटदुखी,
 • ‎उलट्या होणे,
 • ‎अतिसार,
 • ‎कावीळ,
 • ‎पुरळ उटणे (rashes),
 • ‎डोळ्यात जळजळ होणे, लालसर डोळे होणे


ही लक्षणे पहिल्या अवस्थेत दिसुन येतात. ही लक्षणे कधीकधी अचानक दिसुन येतात काही रुग्ण आजाराच्या पहिल्या आठवड्यात बरे होतात तर 10% रुग्णांचा आजार बळावतो. म्हणजे आजार गंभीर होऊन दुसऱ्या अवस्थेत पोहोचतो.

दुसऱ्या अवस्थेची लक्षणे (severe Leptospirosis) –
पहिल्या अवस्थेतील लेप्टोस्पायरोसिस आजार गंभीर होऊन दुसऱ्या अवस्थेत पोहोचतो. या अवस्थेत बॅक्टेरिया रुग्णाच्या किडनी, लिव्हर, मेंदू, फुफ्फुसे, हृदय यावर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे खालील लक्षणे या अवस्थेत असतात.

 • लिव्हरवर परिणाम होऊन कावीळ होणे,
 • ‎किडन्या निकामी होणे,
 • ‎फुप्फुसांचा रक्तस्त्राव, खोकल्यातुन रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
 • मेंदूवर परिणाम होऊन meningitis होणे,
 • ‎ह्रदयाच्या कार्यात अनियमितता (ठोके अनियमित पडणे)
 • ‎ताप अधिक असणे,
 • उलट्या होणे,
 • ‎चक्कर येणे, सेप्टिक शॉक


दुसऱ्या टप्यातील लेप्टोस्पायरोसिस वेल्स डिसिस (Weil’s disease) असेही म्हणतात. यात लवकर उपचार दिला गेला नाही तर रुग्णांना याचे दिर्घकाळ परिणाम भोगावे लागतात आणि काही रुग्णांमध्ये किडनी आणि फुफ्फुसांच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते.

लेप्टोस्पायरोसिस निदान – Leptospirosis diagnosis test :

सुरवातीच्या mild अवस्थेतील लेप्टोस्पायरसेसचे निदान करणे अवघड असते. कारण यातील लक्षणे ही फ्ल्यू किंवा इतर इन्फेक्शनप्रमाणेच असतात. रक्त आणि लघवीची चाचणी करुन लेप्टोस्पायरसेसचे निदान करता येते. पावसाळी दिवस किंवा पूरस्थितीमध्ये ताप, हुडहुडी, अंगदुखी, खोकला, उलट्या, अतिसार अशी लक्षणे असल्यास रक्त आणि लघवीची चाचणी करुन लेप्टोस्पायरसेसचे निदान करणे अत्यंत गरजेचे असते.

लेप्टोस्पायरोसिस उपचार – Leptospirosis treatments in Marathi :

लेप्टोस्पायरोसिस हा बॅक्टेरियल आजार असल्याने यावर अँटी-बायोटिक्स औषधांद्वारे उपचार केले जातात. रुग्णास हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज असते. पहिल्या अवस्थेतील (mild Leptospirosis) या आजारावर परिणाम कारक अँटी-बायोटिक्स उपलब्ध आहेत.

तर रोग पुढील गंभीर अवस्थेत पोहचल्यास (severe leptospirosis) रुग्णास अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. कारण या अवस्थेत बॅक्टेरियाचा परिणाम रुग्णाच्या किडनी, मेंदू, लिव्हर, फुफ्फुसे यासारख्या महत्वाच्या अवयवांवरही होत असतो. अशावेळी रुग्ण दगावण्याची शक्यताही जास्त असते.

लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपाययोजना – Leptospirosis Prevention tips :

लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ नये म्हणून काय करावे, लेप्टोस्पायरोसिसपासून बचाव कसा करावा याची माहिती खाली दिली आहे.

 • पावसाळ्यात पाणी फिल्टर करून किंवा चांगले उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे.
 • बाहेरील दूषित पाणी पिऊ नये.
 • उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका. घरात अन्न झाकुन ठेवा.
 • उघड्या पायाने पावसाच्या पाण्यात जाणे टाळावे.
 • ‎ पायावर जखम किंवा ओरखडा असल्यास व्यवस्थित ड्रेसिंग करुन घ्यावे.
 • पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यास तात्काळ हात, पाय साबनाने स्वछ धुवावेत.
 • पायावर जखम असल्यास व पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यास तात्काळ जखम स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर अँटी-सेप्टिक औषधे लावावीत.
 • ‎ संरक्षण साधणे हात मोजे, पायमोजे, गम-बुट वापरावेत.
 • ‎पावसाळ्याच्या दिवसात पूरस्थितीमध्ये विशेष काळजी घ्यावी.
 • पाळीव जनावरांशी संपर्क आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
 • मृत जनावरांना हात लावणे टाळावे.
 • घराच्या आजुबाजुचा परिसर स्वछ ठेवावा.


Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..

Information about Leptospirosis Symptoms, Causes, Prevention & Treatments in Marathi language. This Medical Article written by Dr. Satish Upalkar.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...