चिकनगुनिया आजार – Chikungunya :
चिकनगुनिया हा एक विषाणुजन्य आजार असून तो डास चावल्याने होत असतो. चिकनगुनियामध्ये थंडी वाजून तीव्र ताप येणे, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे असतात. तसेच चिकनगुनिया आजारातून बरे झाल्यानंतर बरेच दिवस सांधे दुखू शकतात.
चिकनगुनिया होण्याची कारणे (Causes of Chikungunya) :
जेंव्हा विषाणू बाधित एडीस इजिप्ती किंवा एडीस अल्बोपिक्टस ह्या जातीच्या डासाची मादी एखाद्या व्यक्तीस चावते त्यावेळी त्या डासातील विषाणू हे त्या व्यक्तीच्या शरीरात पसरतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अशाप्रकारे चिकनगुनियाची लागण होत असते. तसेच काहीवेळा चिकनगुनिया संक्रमित रक्तातून देखील याची लागण होऊ शकते.
चिकनगुनिया संसर्गजन्य आहे का..?
चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांद्वारे मनुष्यांना होत असतो. हा आजार चिकनगुनियाच्या विषाणूने (CHIKV) बाधित असणाऱ्या डासांमर्फत होत असतो. चिकनगुनिया हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. तो केवळ CHIKV बाधित डास चावल्यानेचं होत असतो. चिकनगुनिया झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्या खोकला किंवा शिंकातून चिकनगुनिया रोग पसरत नाही. त्यामुळे चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असून तो संसर्गजन्य आजार (साथीचा रोग) नाही.
चिकुनगुनिया रोगाची लक्षणे (Chikungunya symptoms) :
चिकनगुनियाचा डास चावल्यानंतर साधारणपणे 3 ते 7 दिवसानंतर लक्षणे जाणवू लागतात.
- भरपुर ताप येणे, (104 अंश पेक्षा अधिक ताप येणे.)
- हुडहुडी भरणे, थंडी वाजुन येणे,
- सांध्यांच्या ठिकाणी अतिशय वेदना होणे,
- सांध्यांवर सूज येणे,
- डोकेदुखी,
- अंगदुखी,
- उलट्या व मळमळ होणे,
- हातापयावर, पाठीवर पुरळ येणे अशी लक्षणे चिकनगुनिया आजारात जाणवू शकतात.
चिकुनगुन्याचे निदान असे केले जाते :
केवळ रक्ताच्या चाचणीद्वारेचं चिकुनगुनियाचे निदान करता येते. यासाठी ELISA ही रक्त चाचणी करुन चिकनगुनिया आजाराचे निदान केले जाते. याशिवाय CBC Test, RT-PCR test सुद्धा केली जाते.
चिकनगुनिया उपचार (Chikungunya treatment) :
चिकनगुनियावर विशिष्ट अशी लस किंवा औषधे उपलब्ध नाहीत. पेशंटमध्ये असणाऱ्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. चिकनगुनियामध्ये ताप व सांधेदुखी होत असते. अशावेळी पेरासिटामॉल सारखी वेदनाशामक औषधे दिली जातात. केवळ आपल्या डॉक्टरांनी दिलेलीच औषधे घ्यावीत.
तसेच रुग्णाने बेडरेस्ट घेणे आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सलाईन, ओआरएस, तरल द्रवपदार्थ घेणे आवश्यक असते. मुख्य म्हणजे चिकनगुनिया झालेल्या रुग्णाला डास चावू नये, याची अधिक काळजी घ्यावी. जेणेकरुन इतर लोकांना या आजाराचा संसर्ग होणार नाही.
बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार दोन आठवड्यात बरा होत असतो. काही वृद्ध व्यक्तीमध्ये आजार बरा होण्यासाठी तीन महिने लागू शकतात..बऱ्याच रुग्णांना पुढील काही महिने सांधेदुखीचा त्रास होत राहतो. तसेच 1 वर्षानंतरही, साधारण 20 टक्के रुग्णांना सांधेदुखी सतावू शकते.
चिकनगुनियानंतर होणाऱ्या सांधेदुखी वर उपाय :
चिकनगुनियातून बरे झालेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये पुढील काही महिने सांधेदुखी होत राहते. अशावेळी सांधे दुखत असल्यास पुढील आयुर्वेदिक व घरगुती उपाय करू शकता.
- चिकनगुनिया झालेल्यानी आहारात दूध व दुधाचे पदार्थ समाविष्ट करावेत. कारण यात प्रोटीन्स व कॅल्शिअम मुबलक असते. त्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघण्यास मदत होते.
- चिकनगुनिया झालेल्यानी दिवसातून दोनवेळा हळद घालून गरम दूध प्यावे. यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
- सांधे दुखत असल्यास तेथे कोमट केलेल्या आयुर्वेदिक वेदनाहर तेलाने थोडी मालीश करावी. यामुळेही सांध्यातील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी निर्गुंडी तेल किंवा महानारायण तेलाचा वापर करू शकता.
- सांधे दुखत असल्यास सुंठी गुणकारी ठरते. सुंठी ही आल्यापासून बनवली जाते. आल्यात सूज व वेदनाशामक गुणधर्म असतात. यासाठी सांधे दुखत असल्यास दिवसातून 2 वेळा अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण सेवन करावे.
- काहीवेळा आजारपणामुळे तोंडाची चव जात असते. अशावेळी तोंडाला चव येण्यासाठी ‘हिंगाष्टक चूर्ण’ हे आयुर्वेदिक औषध उपयोगी ठरते. आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये ‘हिंगाष्टक चूर्ण’ मिळते. जेवताना तूप आणि अर्धा चमचा हिंगाष्टक चूर्ण घालून भात खाल्यास तोंडाला रुची येऊन, भूक चांगली लागते व अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.
चिकनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना (prevention) :
चिकनगुनियापासून बचाव करण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय खाली दिलेले आहेत.
- डासांपासून बचाव करावा.
- डासनाशक साधनांचा वापर करावा.
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
- घरात डास येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.
- चिकनगुनिया पसरवणारे डास हे प्रामुख्याने सकाळच्या व दुपारच्या वेळी फिरत असतात. याकाळात डासनाशक औषधांचा वापर करावा.
- घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. जेणेकरून डासांची पैदास थांबण्यास मदत होईल.
- ताप येण्याबरोबर सांधे दुखणे, पुरळ उठणे असे त्रास असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि रक्त तपासणी करुन घ्यावी.
- ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने कोणतेही औषध घेऊ नये.
हे सुद्धा वाचा..
Read Marathi language article about Chikungunya Symptoms, Causes, Prevention & Treatments. Last Medically Reviewed on February 22, 2024 By Dr. Satish Upalkar.