पित्ताशयात खडे होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Gallstones treatment in Marathi

पित्ताशयातील खडे – Gallstones in Marathi :

अनेक लोकांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास असतो. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली
पित्ताशयाची पिशवी असते. या पित्ताशयात पित्त (Bile) साठवले जाते. या पित्ताचा उपयोग पचनक्रियेसाठी होत असतो. 

पित्ताशयात काहीवेळा पित्ताचे खडे धरत असतात. विशेषतः पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे होत असतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो.

पित्ताशयात खडे होण्याची कारणे – Gallstones causes :

पित्ताशयातील पित्तामध्ये रासायनिक असंतुलनामुळे पित्ताचे खडे होत असतात. पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम ग्लायकोकॉलेट आणि बिलीरुबिनचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे होतात.

पित्ताशयात होणारे जवळपास 80 टक्के पित्ताचे खडे हे कोलेस्ट्रॉलपासून बनलेले असतात. तर 20 टक्के पित्ताचे खडे कॅल्शियम ग्लायकोकॉलेट आणि बिलीरुबिनपासून बनलेले असतात.

हा त्रास कोणाला होऊ शकतो – Gallstones risk factors :

• लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती,
• तेलकट, चरबीयुक्त आहार वारंवार खाणारे लोक,
• आहारातील फायबर्सचे प्रमाण कमी असल्यास,
• कुटुंबात या त्रासाची आनुवंशिकता असल्यास,
• स्त्रिया,
• 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, यांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

पित्ताशयातील खडे झाल्याची ही आहेत लक्षणे – Symptoms of gallstones :

पित्ताशयात खडे असले तरीही बऱ्याच लोकांना काहीवेळा याची लक्षणे जाणवत नाहीत. या त्रासात साधारणपणे खालील लक्षणे जाणवू शकतात.
• पित्ताशयातील खड्यांमुळे पित्ताशयाला सूज येऊन उजव्या कुशीत दुखणे,
• पोटदुखी,
• जेवणानंतर त्रास वाढलेला जाणवतो,
• ताप येणे,
• मळमळणे,
• उलटी होणे,
• काविळ होणे,
• लघवीला गडद होणे,
• शौचाचा रंग पांढरट किंवा मातकट असणे,
• घाम येणे,
• पोट गच्च वाटणे व ढेकर येणे अशी लक्षणे या त्रासात जाणवू शकतात.

पिताशयातील खड्यांचे निदान :

रुग्णातील लक्षणे पाहून व शारीरिक तपासणी करून आपले डॉक्टर या त्रासाचे निदान करू शकतात. निदान स्पष्ट होण्यासाठी काही चाचण्या व तपासण्या कराव्या लागू शकतात. पित्ताशयात खडे आहेत की नाही हे पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एक्स-रे किंवा रेडिओनुक्लाइड स्कॅन करावे लागते.

पित्तनलिकेची स्थिती जाणून घेण्यासाठी एंडोस्कोपिक रेट्रोग्राइड कोलॅंगिओपँक्रिएटोग्राफी (ERCP) करावी लागू शकते. याशिवाय रक्ताची चाचणी करून रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण तपासले जाते.

पित्ताशयात खडे होणे यावरील उपचार – Gallstones treatments :

पित्ताशयात खडे झाल्यास त्यावरील उपचारामध्ये औषधोपचार किंवा ऑपरेशन यांचा अवलंब केला जाऊ शकतो. लहान खडे असल्यास औषधे उपयोगी पडू शकतात. थोडी मोठी असणारी खडे ही ERCP द्वारे काढून टाकता येऊ शकतात. पित्ताशयातील एकदा काढून टाकलेले खडे पुन्हा तयार होऊ शकतात. यासाठी शस्त्रक्रिया करून संपूर्ण पित्ताशयचं काढून टाकणे योग्य असते.

वारंवार पित्ताशयाचे खडे होत असल्यास कोलेसिस्टेक्टॉमी ऑपरेशन करून पित्ताशय काढून टाकले जाते. तसेच यकृतातून येणारा पित्तरस लहान आतड्यात सोडण्यासाठी व्यवस्था केली जाते. त्यामुळे पित्ताशय काढून टाकले तरीही पित्त लहान आतड्यात येत असल्याने पचनक्रियेत कोणताही बाधा निर्माण होत नाही.

पित्ताशयात खडे असणाऱ्या रुग्णांसाठी आहार – Gallstones diet tips :

पित्ताशयात खडे होण्याच्या त्रासावर आहाराचे खूप महत्त्व आहे. पित्ताशयात खडे होत असल्यास काय खावे व काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.

पित्ताशयात खडे झाल्यास काय खावे –
• फायबर्सयुक्त आहार घ्यावा. यासाठी आहारात हिरव्या फळभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश अधिक करावा.
• आहारांमध्ये व्हिटॅमिन-C, लोह आणि लेसिथिन हे पोषकतत्वे असणारे पदार्थ समाविष्ट करावेत.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पित्ताशयात खडे झाल्यावर काय खाऊ नये –
तेलकट आहारामुळे हा त्रास अधिक प्रमाणात होत असतो. तेलकट व चरबीचे पदार्थ खाणे टाळावे. saturated फॅट्स असणारे पदार्थ म्हणजे तूप, लोणी, डालडा, चॉकलेट, केक, बिस्कीट, विविध मिठाई, अंड्यातील पिवळा बलक, प्राणिज चरबी असे पदार्थ खाणे टाळावे.

काविळ होण्याची कारणे व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Gallstones causes, symptoms and treatment information in Marathi.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.