स्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Pancreatitis in Marathi, Pancreatitis Symptoms, Causes, Diagnosis, Treatments, Tests in Marathi.

स्वादुपिंडाला सूज येणे (Pancreatitis):

या विकारात स्वादुपिंड (Pancreas) हा अवयव संक्रमित होऊन त्यास सूज येते. पचनक्रियेमध्ये स्वादुपिंड महत्वाची भुमिका निभावतो. हा अवयव पोटाजवळ असून त्यामधून महत्वाचे स्त्राव निघत असतात. या स्रावांमध्ये पाचकस्राव (Digestive enzymes), इन्सुलिन स्त्राव आणि Glucagons या महत्वच्या स्त्रावांचे स्त्रवण स्वादुपिंडातून होत असते. हे स्राव स्वादुपिंड नलिकेतून ग्रहणीमध्ये येऊन आहाररसामध्ये मिसळून पचनक्रियेमध्ये भाग घेतात.

मात्र जेंव्हा स्वादुपिंड नलिकेमध्ये बाधा निर्माण होतो तेंव्हा स्वादुपिंडातील स्त्राव ग्रहणीमध्ये जाण्यास अडथळा होतो. त्यामुळे स्वादुपिंड संक्रमित होऊन त्यास सुज येते. शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वादुपिंड स्त्रावांच्या कमतरतेमुळे शरीरात असंतुलन निर्माण होते. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणाऱ्या इन्सुलिन स्त्रावाच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते. पर्यायाने मधुमेहाचीही स्थिती उद्भवते.

स्वादुपिंडाला सूज येण्याची कारणे :

ह्या रोगाची प्रमुख कारणे ही आहारासंबंधी असतात जसे,
• जास्त तेलकट आहार सेवन करणे.
• जास्त प्रमाणात दारू पिण्यामुळे स्वादुपिंडाला सूज येऊ शकते.
• तसेच विविध विकारांमुळेही हा त्रास होऊ शकतो. यामध्ये पित्ताशयाचे विकार, पित्ताशयात खडे होणे, पेप्टिक अल्सर, स्वादुपिंडाचे आजार, हायपरथायरॉईड, गालफुगी, उच्चरक्तदाब यासारखे विकारातून स्वादुपिंडाला सूज येऊ शकते.
• स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळेही स्वादुपिंडाला सूज येऊ शकते. येथे क्लिक करा व स्वादुपिंडाच्या कॅन्सरची कारणे, लक्षणे, निदान व उपचार यांची माहिती जाणून घ्या..
• स्वादुपिंड नलिकेत खडे असणे, जीवाणू संक्रमण होणे (इन्फेक्शन), पोटाला मार लागणे यांमुळेही हा त्रास होऊ शकतो.

स्वादुपिंडाला सूज येणे लक्षणे :

• पोटात दुखणे, स्वादुपिंडातील विकारांमुळे पोटाच्या मधल्या व आजूबाजूला वरच्या भागात दुखते, यामुळे पाठीकडेही वेदना होऊ शकतात.
• पोटावर स्पर्श केल्यास वेदना अधिक जाणवणे, त्या ठिकाणचा भाग हा जास्त कठोर वाटणे,
• जेवणानंतर पोटात दुखायला लागते,
• मळमळणे, उलटी होणे,
• पोट फुगणे, पोट साफ न होणे, दुर्गंधीत आणि तेलकट संडासला होणे,
• भूक मंदावणे, वजन कमी होणे, ताप येणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे स्वादुपिंडाला सूज आल्यास दिसू शकतात.

आजाराचे निदान कसे करतात :

स्वादुपिंडातील त्रासाचे नेमके निदान होण्यासाठी अल्ट्रासाउंड, CT scan, MRI स्कॅन, एक्स रे परिक्षण वैगरे तपासण्या कराव्या लागू शकतात. यामुळे स्वादुपिंड नलिकेमध्ये खडे आहेत का वैगरे माहिती मिळते.

याशिवाय रक्त आणि लघवीची तपासणी केली जाते. स्वादुपिंडावर सूज आल्यास रक्तातील अमायलेझ या एन्झाइमची पातळी वाढलेली असते. तसेच रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या तपासली जाते. तर लघवीची तपासणी करून साखरेचे प्रमाण तपासले जाते.

उपचार मार्गदर्शन –

स्वादुपिंडाच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास स्वादुपिंड निकामी होणे, डायबेटीस होणे, पचनक्रियेत बाधा येणे यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. असा त्रास होऊ लागल्यास रुग्णाने जास्त तेलकट आहार खाणे टाळावे, दारूचे व्यसन असल्यास दारू पिणे टाळले पाहिजे.

उपचारामध्ये वेदना थांबवण्यासाठी डॉक्टर वेदनाशामक औषधांचा वापर करतील. इन्फेक्शन असल्यास अँटिबायोटिकही दिले जाईल. तर स्वादुपिंड नलिकेत खडे झालेले असल्यास शस्त्रक्रियेद्वारे खडे काढले जातात.

स्वादुपिंडाच्या कँसरपासून सावध राहा..
स्वादुपिंडाच्या ठिकाणी सूज येणे, त्याठिकाणी वेदना होणे हे स्वादुपिंडाच्या कँसरसंबंधितही असू शकते. गोव्याचे मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रीकर यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यामुळे सर्वांनीच स्वादुपिंडाच्या कँसरविषयी जागरूक राहणे गरजेचे बनले आहे. कारण सुरवातीला स्वादुपिंडाच्या कँसरची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. मात्र कँसर जसजसा गंभीर स्टेजमध्ये पोहचतो तेंव्हाच त्याची लक्षणे दिसू लागतात म्हणून स्वादुपिंडाच्या कॅन्सरला ‘सायलेंट किलर’ असेही ओळखले जाते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, निदान, त्यावरील उपचार आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरपासून दूर राहण्याचे उपाय यांची मराठीत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

संबंधित खालील माहितीही वाचा..
मधुमेह – डायबेटीसची मराठीत संपूर्ण माहिती
पित्ताशयात खडे होणे आणि उपाय

Acute & Chronic Pancreatitis: Causes, Signs & Treatments in Marathi.