गालगुंड – Mumps :

गालगुंड हा एक विषाणूमुळे होणारा आजार असून याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍याकडे लाळ, नाकातील स्राव यामार्फत होत असतो. गालगुंड आजारात गालाच्या खाली गळ्याजवळ असणाऱ्या लाळेच्या ग्रंथी सूजतात. त्यामुळे या आजारात गाल फुगलेले दिसतात म्हणूनच गालगुंड आजाराला ‘गालफुगी’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होत असतो.

गालफुगीची लक्षणे – Symptoms of mumps :

विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत गालफुगीची लक्षणे दिसतात. सुरवातीला फ्लूसारखी खालील लक्षणे दिसू शकतात,
• सौम्य ताप येणे,
• अंग दुखणे,
• थकवा येणे,
डोकेदुखी,
भूक न लागणे किंवा मळमळ होऊ लागते.

ह्या सुरवातीच्या लक्षणानंतर पुढील काही दिवसांत, गालगुंडाची मुख्य लक्षणे जाणवतात. यावेळी,
• लाळग्रंथींना सूज येणे, तेथे वेदना होणे,
• गाल फुगणे,
• अन्न गिळताना त्रास होणे,
• ताप येणे (103 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत),
• अंग दुखणे अशी लक्षणे या आजारात जाणवू शकतात.

गालगुंड आजाराची कारणे – Causes of mumps :

गालगुंड हा आजार पॅरामाइक्सोव्हायरस ह्या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो. तर गालगुंड आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकेद्वारे किंवा खोकल्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीकडे तो पसरत असतो. अशाप्रकारे त्या व्यक्तीलाही गालगुंड आजाराची लागण होत असते.

गालगुंड आजार झाल्यानंतर त्या रोगाची प्रतिकारशक्ती शरीरात तयार होत असते. त्यामुळे एकदा हा आजार झाल्यास त्या व्यक्तीला पुन्हा कधीही गालफुगी होत नाही.

गालफुगीवर असे करतात उपचार – Mumps treatments :

गालगुंड हा व्हायरल आजार असल्याने, त्यावर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिकचा वापर केला जात नाही. प्रामुख्याने लक्षणांवरून गालफुगीवर उपचार केले जातात. त्यामुळे या आजारात ताप किंवा अंगदुखी असल्यास एसीटामिनोफेन आणि इबुप्रोफेन सारखी वेदनाशामक औषधे दिली जातील.

सूजलेल्या ठिकाणी वेदना होत असल्यास बर्फाचे पॅक वापरुन शेक घेणे किंवा कोमट पाण्याने गुळण्या करणे असे काही घरगुती उपाय केल्याने गालफुगीतील सूज कमी होण्यास मदत होते.

याशिवाय रुग्णाने आजार बरा होईपर्यंत विश्रांती घेणे आवश्यक असते. लहान मुलांना गालफुगीचा आजार झाल्यास पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेला पाठवून देऊ नये. कारण दुसऱ्या मुलांनाही याची लागण होण्याची शक्यता असते. साधारण दोन ते तीन आठवड्यात आजार बरा होतो.

गालफुगी आजारामध्ये आहार असा असावा – Mumps diet chart :

गालगुंड सुजल्यास काय खावे..?
गालगुंड आजारात तापामुळे शरीरातून अधिक घाम निघून गेल्यामुळे शरीरात पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी, पातळ द्रवपदार्थ किंवा ओआरएस मिश्रण प्यावे.

गालाजवळच्या ग्रंथी सुजलेल्या असल्याने गालफुगी आजारात अन्न चावून खाताना किंवा गिळताना अधिक वेदना व त्रास होऊ लागतो. यासाठी मऊ आहार, सूप असा सहज खाता येण्याजोगा आहार सेवन करावा.

गालगुंड झाल्यावर काय खाऊ नये..?
लाळ अधिक सुटणारे आंबट पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. कारण अशा पदार्थांमुळे आपल्या लाळेच्या ग्रंथींमध्ये जास्त वेदना होऊ शकतात.

गालगुंड प्रतिबंधक उपाययोजना – Mumps prevention tips :

लसीकरणामुळे गालगुंड आजारापासून रक्षण करणे शक्य आहे. लहान बालकांना एकाच वेळी गोवर, गालगुंड आणि रुबेला (MMR) ची लस दिली जाते. त्यामुळे गोवर, गालगुंड आणि रुबेला या आजारापासून कायमस्वरूपी संरक्षण होण्यास मदत होते. बाळाला 15 व्या महिन्यात व वयाच्या पाचव्या वर्षी MMR लस दिली जाते.

गालगुंड आजारामुळे होणारे दुष्परिणाम – Mumps complications :

गालगुंड आजारात पॅरोटीड ग्रंथींवर परिणाम होत असतो. तसेच काहीवेळा मेंदू आणि प्रजनन अवयवांसह शरीराच्या इतर भागातही आजारामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः मोठेपणी गालगुंड हा आजार झाल्यास त्यामुळे खालील दुष्परिणाम होऊ शकतात.

ऑर्किटायटिस –
मोठेपणी गालगुंड झाल्यास पुरुषांचे अंडकोष सूजतात व तेथे वेदना होऊ लागते. साधारण 5 पैकी 1 पुरुषाला असा त्रास होऊ शकतो. होते. यामुळे भविष्यात वंध्यत्वाची समस्या (मुलबाळ न होण्याची समस्या) काहीवेळा होऊ शकते.

ओफोरिटिस –
मोठेपणी गालगुंड झाल्यास स्त्रीच्या अंडाशयाला सूज येते व तेथे वेदना होऊ लागते. साधारण 20 पैकी एका स्त्रीला असा त्रास होऊ शकते. यामुळे भविष्यात वंध्यत्वाची समस्या (मुलबाळ न होण्याची समस्या) काहीवेळा होऊ शकते.

गर्भपात होणे –
एखाद्या स्त्रीला गरोदरपणात गालगुंडाचा संसर्ग झाल्यास त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो .

मेंदूतील संसर्ग –
जेव्हा गालगुंडचा व्हायरस रक्तप्रवाहात पसरतो आणि शरीराच्या मेंदू आणि मज्जासंस्थेस संक्रमित करतो तेव्हा गालगुंडांमुळे मेंदूला सूज येऊन जीवघेण्या अशा मेनिंजायटीस आणि एन्सेफलायटीस ह्या स्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला गालगुंड झाल्यास व डोकेदुखी, हातापायातील चेतना कमी झाल्यासारखे वाटत असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

स्वादुपिंडाला सूज येणे –
गालगुंडमुळे स्वादुपिंडाला सूज येऊ शकते. यामुळे ओटीपोटात दुखणे, मळमळ आणि उलट्या होणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

बहिरेपणा येणे –
गालफुगीमुळे कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. साधारण 15 हजार रुग्णांमध्ये एका व्यक्तीला अशी समस्या होऊ शकते.

हे सुद्धा वाचा..
टॉन्सिल्स सुजणे
अपेंडीक्सला सूज येणे

6 Sources