पायाला गोळे येण्याची कारणे व पायाच्या पोटऱ्या दुखणे यावरील घरगुती उपाय – Leg Cramps in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

पायात गोळा येणे – Leg Cramps :

अनेकांना पायात गोळा येण्याची समस्या असते. या त्रासाला पायात पेटके येणे किंवा लेग क्रॅम्प्स असेही म्हणतात. पायात गोळे आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागते. बऱ्याचदा हा त्रास रात्री झोपल्यावर सुरू होऊ शकतो.

पायाला गोळे येण्याची ही आहेत कारणे :

अनेक कारणांमुळे पायात पेटके येऊ शकतात. पाणी कमी पिणे, आहारातील पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता, पायाचे स्नायू थकने यामुळे हा त्रास प्रामुख्याने होत असतो.
• शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे,
• शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडिअम व कॅल्शियम हे क्षारघटक कमी अधिक झाल्यामुळे,
• ‎अतिश्रम किंवा व्यायामामुळे पायाच्या स्नायूंवर ताण येऊन मांसपेशी थकल्यामुळे,
• घाम अधिक आल्यामुळे,
• ‎गरोदरपणामुळे,
• किडनीच्या आजारांमुळे,
• थायरॉईड विकार, मधुमेह, पार्किन्सन्स अशा आजारांमुळे,
• ‎मद्यपान, अल्कोहोल किंवा दारूच्या व्यसनामुळे,
तसेच काही औषधांमुळेही पायात पेटके किंवा गोळे येऊ शकतात.

पायाच्या पोटऱ्या दुखू नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

पुरेसे पाणी प्यावे –
कमी पाणी पिण्याची सवय असलेल्या लोकांमध्ये पायात गोळे येण्याची समस्या अधिक असते. तसेच उष्णतेचे दिवस किंवा व्यायाम अधिक केल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ही समस्या होऊ शकते. यासाठी दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट होऊन ही समस्या होत नाही.

नियमित व्यायाम करावा –
दररोज व्यायाम केल्यामुळे शरीर व मांसपेशीतील रक्तप्रवाह सुधारतो. त्याचाप्रमाणे स्नायूंवरील ताणही कमी होण्यास मदत होते. तसेच व्यायामाने वजन आटोक्यात राहते व जास्त वजनाचा भार आपल्या पायांवर येत नाही. त्यामुळे पायात गोळे येण्याची समस्या असल्यास रोज सकाळी किमान अर्धा तास चालण्यास जावे. तसेच सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 मिनिटे बसावे. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन-D मुबलक प्रमाणात मिळते व कॅल्शिअमचे शोषण हाडांमध्ये होण्यास मदत होते.

स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा –
व्यायाम केल्यानंतर पायांचा स्ट्रेचिंग एक्सरसाइजसुद्धा करावा. यामध्ये पाय पुढे मोकळे सोडून बसावे व हातानी पाय ताणण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पायाची पेटरी ताणली जाऊन तेथील दुखणे कमी होते. यासाठी विविध योगासनेसुद्धा आपण करू शकता.

योग्य स्थितीत बसा –
एकाचं ठिकाणी अधिक वेळ बसणे किंवा अधिक वेळ उभे राहणे टाळावे. तसेच खुर्चीत बसल्यावर पाय हवेत मोकळे ठेवू नयेत, अशावेळी पायाची पावले ही जमिनीला टेकलेली असावीत.

रक्तातील क्षार घटकांचे प्रमाण तपासून घ्या –
रक्तामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अशा क्षार घटकांचे प्रमाण कमी झाल्यास पायात गोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ब्लड टेस्ट करून रक्तातील पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारख्या क्षारांचे प्रमाण योग्य आहे की नाही ते तपासावे.

पायात गोळे येणे यावर हे करा घरगुती उपाय – Leg cramps home remedies :

शहाळ्याचे पाणी –
शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम व सोडिअम असे क्षार घटक असून ते नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट प्रमाणे कार्य करते. त्यामुळे पायाला गोळे येण्याची समस्या दूर करण्यासाठी शहाळ्याचे पाणी जरूर प्यावे.

दूध व दुधाचे पदार्थ –
पायात गोळा येण्याची समस्या असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध प्यावे. दुधात कॅल्शियम व प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मांसपेशीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय आहारात दुधाचे पदार्थही समाविष्ट करावेत.

केळे –
केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे पायात पेटके येत असल्यास दररोज एक केळे जरूर खावे.

कच्चा मुळा –
पायात गोळे येणे या त्रासावर कच्चा मुळा खाणे उपयोगी ठरते. यामुळेही ही समस्या लवकर दूर होण्यास मदत होते.

निर्गुंडी तेल –
पायात पेटका आला असल्यास व त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखत असल्यास कोमट केलेले निर्गुंडीचे तेल पायाच्या पोटरीला लावावे व तेथे थोडी मालीश करावी. निर्गुंडीचे आयुर्वेदिक तेल या त्रासावर खूप उपयुक्त ठरते.

पायात पेटके येत असल्यास हा घ्यावा आहार :

पायाला गोळे येण्याची समस्या वरचेवर होत असल्यास कोणता आहार घ्यावा, काय खावे व काय खाऊ नये याची माहिती खाली दिली आहे.
आहारात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व सोडिअम असे पोषकघटक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. यासाठी दूध व दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, केळे, कच्चा मुळा, सैंधव मीठ, सुकामेवा, रताळे, पपई, कलिंगड, भोपळा, मांस, मासे, अंडी असे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.

शरीर हायड्रेट राहण्यासाठी आहारात पुरेसे तरल पदार्थ असावेत. यासाठी पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, ताज्या फळांचा रस पिऊ शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

पायाची पोटरी दुखत असल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असेल..?

पायात गोळा येणे ही समस्या सामान्य वाटत असली तरी वरचेवर हा त्रास होत असल्यास किंवा रक्ताच्या चाचणीत क्षार घटकांचे प्रमाण कमी झालेले असल्यास आपल्या डॉक्टरांकडून यावर उपचार करून घ्यावेत.

हे सुद्धा वाचा..
सायटिकाचा त्रास व उपाय
सांधेदुखीचा त्रास आणि उपाय
आमवात आजाराची माहिती व उपचार
गुडघेदुखीवरील उपचार
व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास व उपचार

Information about Leg Cramps causes, symptoms, prevention & treatments in Marathi language.