हायपोथायरॉईडीझम – Hypothyroidism :
जेंव्हा आपल्या शरीरात पुरेसे थायरॉईड हार्मोन तयार होत नाही तेंव्हा, हायपोथायरॉईडीझमची स्थिती निर्माण होते. हायपोथायरॉईडीझम ही समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकते. त्यातही साधारण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
हायपो थायरॉईड म्हणजे काय ..?:
थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्यास आणि ऊर्जा वापरण्यास मदत करण्यासाठी ह्या ग्रंथीतून हार्मोन्स येत असतात. आपल्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाला उर्जा पुरवण्यासाठी थायरॉईडची महत्वाची जबाबदार असते. याशिवाय हृदयाची स्पंदने आणि पचनक्रिया देखील यामुळे नियंत्रित केली जाते.
मात्र जर शरीरात थायरॉईड हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार होत नसल्यास त्याचा परिणाम शरीराच्या अनेक क्रियांवर होऊ लागतो. ह्या थायरॉईड समस्येला ‘हायपोथायरॉईडीझम’ असे म्हणतात. हायपोथायरॉईडीझमचा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. लक्षणांवरून किंवा ब्लड टेस्टद्वारे हायपोथायरॉईडीझमचे निदान केले जाते.
हायपोथायरॉईडीझम ची लक्षणे (Symptoms of hypothyroidism) :
हायपोथायरॉईडीझममध्ये खालील लक्षणे जाणवू शकतात.
- थकवा जाणवणे,
- डिप्रेशन,
- पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता),
- थंडी वाजणे,
- त्वचा कोरडी पडणे,
- वजन जास्त वाढणे,
- मांसपेशी कमजोर होणे,
- अंग दुखणे,
- घाम कमी येणे,
- हृदयाची स्पंदने मंद होणे,
- रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे,
- सांध्यामध्ये वेदना होणे आणि सांधे जखडणे,
- केस कोरडे व पातळ होणे,
- स्मरणशक्ती कमी होणे,
- मासिक पाळीत बदल होणे,
- वंध्यत्व समस्या होणे,
- आवाज बसणे,
अशी लक्षणे हायपोथायरॉईडीझममध्ये असतात.
हायपोथायरॉईडीझम होण्याची कारणे (Hypothyroidism causes) :
हायपोथायरॉईडीझम समस्या होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात.
- ऑटोइम्यून म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीचे आजार झाल्यामुळे,
- हाशिमोटो आजारातून (Hashimoto’s disease) थायरॉईडला सूज आल्यामुळे,
- कॅन्सरवरील रेडिएशन थेरपीमुळे,
- शस्त्रक्रियेने थायरॉईड काढून टाकलेले असल्यास,
- हायपरथायरॉईडीझम या थायरॉईड प्रॉब्लेममध्ये घेत असलेल्या उपचारामुळे,
- तसेच काही औषधांच्या दुष्परिणामामुळे हायपोथायरॉईडीझम होऊ शकते.
हायपोथायरॉईडीझमचे निदान (Diagnosis test) :
शारीरिक तपासणी आणि लक्षणे यावरून डॉक्टर हायपोथायरॉईडीझमचे निदान करतील. तसेच निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी काही रक्ताच्या चाचण्या करायला सांगतील. यासाठी TSH चाचणी आणि T4 थायरॉक्सिन चाचणी केली जाते. चाचणीमध्ये जर TSH ची पातळी अधिक वाढलेली असल्यास व T4 ची पातळी कमी झालेली असल्यास हायपोथायरॉईडीझमचे निदान होते. याशिवाय थायरॉईड फंक्शन टेस्टसुद्धा करण्यात येईल.
हायपोथायरॉईडीझमवर आणि उपचार (Hypothyroidism treatments) :
हायपोथायरॉईडीझम ही एक दीर्घकालीन (lifelong) अशी स्थिती आहे. त्यामुळे हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांनी संपूर्ण आयुष्य यावरील औषधे घेणे गरजेचे असते. कारण या स्थितीमध्ये शरीरात स्वतःहून थायरॉईड हार्मोन्स तयार होत नसल्याने औषधाद्वारे बाहेरून कृत्रिमरीत्या थायरॉईड संप्रेरक शरीराला दिले जाते. यासाठी लेव्होथिरोक्साईन यासारखी औषधे वापरून लक्षणे कमी करून त्रास नियंत्रित ठेवला जातो.
औषधे घेत असताना हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांनी वर्षातून एकदा टीएसएच पातळीची तपासणी करून घेतली पाहिजे. थायरॉईड टेस्ट विषयी माहिती जाणून घ्या..
हायपोथायरॉईडीझम आणि आहार :
हायपोथायरॉईडीझमची समस्या असणाऱ्या रुग्णांनी फायबर्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्स अशी पोषकतत्वे असणारा संतुलित आहार घ्यावा. यासाठी आहारात धान्य, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी याचा समावेश करावा.
हायपोथायरॉईडीझम पेशंटसाठी आहारात व्हिटॅमिन-B12, आयोडीन, सेलेनियम, झिंक, प्रोबायोटिक्स यासारखी पोषकघटक खूप महत्त्वाचे असतात. दूध, अंडी, मांस, मासे, तीळ यात व्हिटॅमिन-B12 मुबलक प्रमाणात असते. याशिवाय दह्यात असणारे यामध्ये प्रोबायोटिक्ससुद्धा उपयुक्त असतात. त्यामुळे दह्याचाही आहारात समावेश करा.
हायपोथायरॉईडीझम मध्ये कोणता आहार खाणे टाळावे ..?
हायपोथायरॉईडीझम मध्ये वजन व रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्याची अधिक शक्यता असते. यासाठी आहारात चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे गोड पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे.
विशेषतः ग्लूटेन हा घटक असणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्यामुळे हायपोथायरॉईडीझम असल्यास गहू व गव्हाचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच थायरॉईडवर प्रतिकूल परिणाम करणारे गोयट्रोजेन घटक असणारे कोबी, ब्रोकोली, पालक, स्ट्रॉबेरी, रताळी, सोयाबीन, शेंगदाणे हे पदार्थ खाणे टाळावे.
हे सुद्धा वाचा..
हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) विषयी जाणून घ्या.
Read Marathi language article about Hypothyroidism Symptoms, Causes, Treatments and Diet plan. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.