Filariasis symptoms, causes, prevention & treatments information in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar.
हत्तीरोग आजाराची माहिती – Elephantiasis :
हत्तीरोग हा परोपजीवी जंतूंमुळे होणारा साथीचा आजार आहे. याची लागण डासांमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. हत्तीरोग हा आजार lymphatic filariasis किंवा एलिफॅन्टीयसिस या नावानेही ओळखला जातो. हत्तीरोगाचा विपरीत परिणाम वृषण (पुरुषांचे जननेंद्रिय), पाय, मांडी, स्तन यावर होऊन त्याठिकाणी सूज येत असते. तसेच यामुळे पाय विद्रुप होऊन कायमचे अपंगत्व येत असते.
हत्तीरोग होण्याची कारणे – Filariasis Causes in Marathi :
वुचेरिया बॅनक्रोफ्टी, ब्रुशिया मलय आणि ब्रुशिया तिमोरी या तीन प्रकारच्या परोपजीवी जंतूंमुळे (worms) हत्तीरोग होत असतो. ह्या जंतूंचा प्रसार क्युलेक्स जातीच्या डास चावल्याने होत असतो. एकाद्या व्यक्तीला असा बाधित डास चावल्यास हत्तीरोगाचे जंतू हे त्या व्यक्तीच्या शरीरात शिरतात. त्यानंतर ते जंतू रक्तामार्फत लसीका प्रणालीत (lymphatic system) मोठया प्रमाणात पसरतात व त्या व्यक्तीला हत्तीरोगाची लागण होते. [1]
हत्तीरोगाची लक्षणे – Filariasis Symptoms in Marathi :
डास चावल्याबरोबर लगेचच या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. डासामार्फत जंतू शरीरात शिरल्यानंतर हत्तीरोगाची लक्षणे दिसण्यासाठी 8 ते 16 महिने एवढा कालावधी लागत असतो. संबंधित व्यक्तीच्या शरीरामध्ये जंतूची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. हत्तीरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
- हातपाय, जननेंद्रिय व अन्य अवयवांवर सूज येणे,
- ताप येणे,
- हुडहुडी भरणे,
- लसीकाग्रंथीना सूज येणे अशी लक्षणे या रोगात दिसतात.
हत्तीरोग आजारात रुग्णाच्या हातापायाला सूज येत असते. विशेषतः बाधित रुग्णाचा पाय सुजत जाऊन मोठा मोठा होत जातो. तो हत्तीच्या पायासारखा मोठा दिसू लागतो आणि म्हणूनच या आजाराला हत्तीपाय असेही म्हटले जाते. [2]
रोगकारक डासांचा उपद्रव कोठे होऊ शकतो..?
क्युलेक्स डासांची उत्पात्ती ही प्रदूषित पाणी, सांडपाणी, पाण्याची डबकी, तुंबलेल्या नाल्या व गटारे, टायर्समध्ये साचलेल्या पाण्यावर खूप मोठया प्रमाणात होते त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो.
हत्तीरोगाचे निदान :
हत्तीरोगाच्या निदानासाठी ब्लड टेस्ट केली जाते. यासाठी रक्ताचा नमुना घेतल्यानंतर, चाचणीसाठी ते लॅबमध्ये पाठविले जाते. लॅबमध्ये रक्तात परजीवी उपस्थित आहे का ते तपासले जाते. हत्तीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री 9 ते 12 दरम्यान रक्तनमूना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते.
हत्तीपाय रोग उपचार – Treatments of Filariasis in Marathi :
हत्तीरोगामध्ये अँटीपारॅसिटिक औषधांद्वारे उपचार केले जातात. यासाठी डायथिलकार्बामाझिन (डीईसी), मेक्टिझान आणि अल्बेंडाझोल यासारखी अँटीपारॅसिटिक औषधे वापरली जातील. ज्या रुग्णांमध्ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्णांना सरकारी दवाखान्यात डायथिलकार्बामाझिन (डीईसी) 12 दिवस देण्यात येते. [3]
उपचारामध्ये काहीवेळा प्रभावित भागावर ऑपरेशन करण्याचीही आवश्यकता पडू शकते. याशिवाय रुग्णाने बाधित झालेल्या भागाची काळजी व स्वच्छता घेणे आवश्यक असते. तसेच डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे योग्य शारीरिक व्यायाम करणेही हे महत्वाचे असते.
हत्तीरोग प्रतिबंधात्मक उपाय :
हत्तीरोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, हत्तीरोगापासून बचाव कसा करावा याची माहिती खाली दिली आहे.
- हत्तीरोग आटोक्यात आणण्यासाठी डासांची संख्या कमी करणे व त्यांना दूर ठेवणे हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे यासाठी घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
- मैला, घाण, कचरा इत्यादीची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचा योग्य पध्दतीने निचरा करणे.
- नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी नियमितपणे किटकनाशकांची फवारणी करावी.
- घरांच्या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकावू टायर, बाटल्या इ साहित्य ठेऊ नये.
- आठवडयातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. पाणी साठवलेल्या भांडयाना योग्य पध्दतीने व्यवस्थित झाकून ठेवावे.
- फुलदाण्या, झाडांच्या कुंड्या, फिशटॅंक इ. यातील पाणी नियमित बदलावे.
- घरातील दारे आणि खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावाव्यात. मच्छरदाण्यांचा वापर करावा.
- हत्तीरोग नियंत्रणासाठी एकदिवसीय सामुदायिक औषध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत हत्तीरोग प्रभावित जिल्ह्य़ातील दोन वर्षांवरील सर्व लोकांना (गर्भवती स्त्रियांना वगळून सर्वांना) हत्तीरोगविरोधी गोळ्या दिल्या जातात. त्या गोळ्या हत्तीरोगाची लागण झाली नसतानाही सर्वांनी घेणे गरजेचे असते.
हे लेख सुद्धा वाचा..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
Filariasis causes, symptoms & treatments information in Marathi.