सायटिका म्हणजे काय व त्यावरील उपचार – Sciatica in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

सायटिका – Sciatica :

सायटिक नाडी (nerve) ही पाठीच्या मणक्यापासून सुरू होते व ती खाली दोन्ही पायापर्यंत गेलेली असते. सायटिक नाडी (sciatic nerve) ही आपल्या शरीरातील सर्वात लांब आणि महत्वाची अशी नाडी असते. ही नाडी काही कारणांनी दुखावली गेल्यास सायटिकाचा त्रास होऊ लागतो. या त्रासात पाठिपासून ते खाली पायापर्यंत अतिशय वेदना होत असतात.

सायटिकाची लक्षणे – Symptoms of sciatica :

• सायटिकामध्ये कंबरेपासून ते खाली पायापर्यंत अतिशय वेदना होणे,
• हालचाल केल्यास त्याठिकाणी वेदना अधिक होणे,
• काहीवेळा पायातील शक्ती कमी झाल्याचे जाणवणे,
• पाय बधिर होणे,
• पायाकडे सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे,
• पायांमध्ये वेदनादायक अशा मुंग्या येणे,
• काही गंभीर स्थितीमध्ये मूत्राशय आणि आतड्यावरील नियंत्रण सुटू शकते. त्यामुळे लघवी किंवा शौचावर रुग्णाचे नियंत्रण राहत नाही. या स्थितीला कॉडा इक्विना सिंड्रोम असे म्हणतात.
अशी लक्षणे सायटिकामध्ये जाणवतात.

सायटिका होण्याची कारणे – Sciatica causes :

सायटिका नाडीला दुखापत झाल्याने सायटिकाचा त्रास होत असतो. त्यामुळे पडणे, अपघात यामुळे कंबरेच्या खाली मार बसल्यामुळे सायटिकाचा त्रास होऊ लागतो. याशिवाय मज्जातंतू किंवा सायटिका नाडीतील ट्युमर्स यामुळेही हा त्रास होत असतो.

तसेच हर्निएटेड डिस्क किंवा मणक्यातील चकत्या दबणे, दोन चकत्यातील कार्टीलेजची झिज होणे किंवा स्लिप डिस्कमुळेही सायटिकाचा त्रास होत असतो. याशिवाय स्पाइनल स्टेनोसिस, स्पोंडिलोलिस्टीसिस, पिरिफॉर्मिस सिंड्रोम यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

सायटिकाचे निदान असे केले जाते :

रुग्णाला होणारा त्रास, असलेली लक्षणे आणि शारीरिक तपासणी याद्वारे आपले डॉक्टर सायटिकाचे निदान करतील. तसेच निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी MRI स्कॅन, CT स्कॅन किंवा एक्स-रे यासारख्या काही तपासण्या कराव्या लागतील.

सायटिकावर हे आहेत उपचार – Sciatica treatments :

सूज व वेदना कमी करण्यासाठी एस्पिरिन आणि इबुप्रोफेन सारखी पेनकिलर औषधे दिली जातील. याशिवाय आयुर्वेदिक पंचकर्म, फिजिओथेरपी, मसाज थेरपी यांचाही उपयोग या त्रासावर चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

सायटिकावर दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया (operation) उपलब्ध आहेत. एक म्हणजे डिस्टेक्टॉमी, यामध्ये सायटिक नाडीवर दबाव टाकणाऱ्या डिस्कचा भाग काढून टाकला जातो. आणि दुसरी शस्त्रक्रिया म्हणजे मायक्रोडिसेक्टॉमी, ज्यामध्ये आपले डॉक्टर मायक्रोस्कोप वापरत असताना नाडीवर दाब पडणाऱ्या डिस्कचा भाग काढून टाकतात.

सायटिकाची समस्या होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

• नियमित व्यायाम करावा. व्यायामाने कंबरेचे व खुब्याच्या स्नायू मजबूत होण्यास मदत होईल.
• चालणे, सायकलिंग किंवा पोहण्याचा व्यायाम करावा.
• स्ट्रेचिंगचा व्यायाम करावा.
• कंबर आणि पायांवर जास्त वजनाचा भार पडू नये यासाठी वजन आटोक्यात ठेवावे.
• अवजड वस्तू उचलताना काळजी घ्यावी.
• कंबरेला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
• खुर्चीत बसल्यावर आपल्या पाठीला योग्य आधार मिळेल अशा पद्धतीने खुर्चीत बसावे.
• खुर्चीत बसल्यावर आपले पाय फरशीला व्यवस्थित टेकलेले असावेत.


हे सुद्धा वाचा..

सांधेदुखीचा त्रास आणि उपाय
आमवात माहिती व उपचार
गुडघेदुखीची कारणे व उपचार