पोहण्याचे फायदे तोटे मराठी माहिती आणि पोहताना कोणती काळजी घ्यावी..?

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Benefits Of Swimming Exercise in Marathi, Swimming for Fitness in Marathi information

पोहण्याचा व्यायाम :

पोहणे किंवा स्विमिंग हा संपूर्ण शरीरासाठी एक एरोबिक व्यायाम आहे. पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहण्याच्या व्यायामामुळे पाठीचे स्नायू, छातीचे स्नायू, हात आणि पायांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. पाण्यातील व्यायामाने शरीराला अधिक फायदे मिळतात. पाण्यातील व्यायामाने शरीराचे तापमान न वाढता, घाम न येताही अधिक वेळ व्यायाम करता येतो.

पोहण्याच्या व्यायामात Breaststroke, Backstroke, Sidestroke, Butterfly, Freestyle असे अनेक पोहण्याचे प्रकार असून त्यांचा पोहताना आपल्या वर्कआऊटमध्ये समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. सर्वच वयोगटातील व्यक्ती अगदी लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्ती पोहण्याचा व्यायाम करू शकतात.

स्विमिंग करण्याचे किंवा पोहण्याचे फायदे :

पोहण्याच्या व्यायामामुळे ह्रदय, फुफुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते, शरीरात रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते, शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. याशिवाय स्विमिंग करण्याने चांगली भूक लागते, चांगली झोप लागते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. पोहण्याचे फायदे खाली दिले आहेत.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर..
पोहण्याच्या व्यायामामुळे ह्रदय आणि फुफुस यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील रक्त संचारण (blood circulation) व्यवस्थित होते. रक्तदाब नियंत्रित होतो, रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे पोहण्याच्या व्यायामामुळे हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, लकवा (पक्षाघात), डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

स्नायू बळकट होतात..
स्विमिंग करण्याने संपूर्ण शरीराच्या मांसपेशी आणि हाडांची स्वतंत्र हालचाल होते. पोहल्याने स्नायू बळकट होतात. पोहताना पाण्यातून मार्ग काढत जावे लागल्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात. अशाप्रकारे वजन उचलून वर्कआऊट करण्यापेक्षा मोकळेपणे पोहून आपले स्नायू तुम्ही बळकट बनवू शकतो. त्याचबरोबर हाडे व सांधे मजबूत होण्यासही यामुळे मदत मिळते.

दुखापतीचा धोका नाही..
वजन उचलणे, जॉगिंग अशा अनेक वर्कआऊटमध्ये दुखापत किंवा इंज्युरी होण्याची शक्यता असते. मात्र पोहताना दुखापत होण्याचा धोका नसतो. कारण पोहताना आजूबाजूच्या पाण्यामुळे स्नायू व सांधे यावर विशेष ताण येत नाही. त्यामुळे दुखापत होण्याची भीती असणारे रुग्ण आणि सांधेदुखी, मल्टीपल स्क्लेरोसिस, अस्थमा (दमा) अशा रोगांतही पोहण्याचा व्यायाम करू शकतात.

मानसिक स्वास्थ्य सुधारते..
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारचे तणाव असतात. मात्र स्विमिंग ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे तणावापासून आराम मिळतो व मेंदू आणखी सक्षमरीत्या काम करतो. यामुळे पूर्ण शरीराची एक्सरसाईज होते. यामुळे अनेक बाबतीत स्विमिंग जीमपेक्षाही बेस्ट ऑप्शन आहे.

घाम येत नाही..
पोहण्याचा उत्तम फायदा म्हणजे घाम न येता वर्कआऊट होते. जिममध्ये वर्कआऊट करताना येणाऱ्या घामाचा त्रास सहन न होणाऱ्यांसाठी पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. पाण्यात राहिल्याने शरीराला थंडावा मिळतो. यामुळे घाम न येताही संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

चांगली झोप लागते..
पोहण्याच्या व्यायाम केल्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे रात्री निवांत झोप लागण्यास मदत होते. झोप पूर्ण होऊन सकाळी ताजेतवाने वाटते. स्विमिंगमुळे झोपेच्या तक्रारी दूर होतात.

वजन नियंत्रित ठेवते..
पोहण्याचा व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण पोहताना आपल्या शरीराचे सर्व स्नायू (मसल्स) काम करतात. फक्त अर्धा ते एक तास पोहण्याने तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो. एक तासाच्या पोहण्याच्या व्यायामातून 400 ते 800 कॅलरीज बर्न करता येते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास पोहण्याच्या व्यायामाने मदत होते. स्विमिंग करण्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

पोहण्याचा व्यायाम आणि बर्न होणारी कॅलरीज :
Swimming and Weight loss tips in Marathi.
60 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 590 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 413 कॅलरीज बर्न होतात.

70 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 704 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 493 कॅलरीज बर्न होतात.

80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 817 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 572 कॅलरीज बर्न होतात.

90 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने एक तास पोहण्याचा व्यायाम जलदरीत्या केल्यास 931 कॅलरीज बर्न होतात तर सावकाश पोहल्यास 651 कॅलरीज बर्न होतात. कॅलरीज म्हणजे काय, वजन कमी करण्यासाठी कॅलरीज का कमी कराव्या लागतात हे जाणून घ्या..

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

स्विमिंग करताना किंवा पोहताना कोणती काळजी घ्यावी..?

• स्विमिंग शिकण्याआधी योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतरच प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली पाण्यात उतरा.
• जर तुम्ही नुकतेच स्विमिंग शिकत असाल, तर प्रशिक्षकाशिवाय पाण्यात उतरू नका.
• अनोळखी ठिकाणी, पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पाण्यात उतरू नका.
• पोहण्याचा व्यायाम हा शक्यतो जलतरण तलाव यामध्येचं प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली करावा.
• पोहण्याचा व्यायाम सकाळी व संध्याकाळच्या वेळेत करावा. दुपारच्या भर उन्हात स्विमिंग करू नये.
• स्विमिंग करण्यापूर्वी तहान लागलेली नसतानाही पुरेसे पाणी प्यावे. त्यामुळे व्यायाम केल्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
• लहान मुले स्विमिंग करत असताना आजूबाजूला प्रशिक्षित व्यक्ती असाव्यात.
• दूषित पाण्यात पोहणे टाळावे. कारण यामुळे इन्फेक्शन होऊन त्वचेचे विकार होऊ शकतात.
• स्विमिंग पूलमधील पाणी हे chlorinated असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला सोरायसिससारखा त्वचा विकार असल्यास त्वचेला खाज होऊ शकते. त्यामुळे कोणताही त्वचाविकार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोहण्याचा व्यायाम करू नका.
© HealthMarathi.com

हे सुद्धा वाचा..
नियमित व्यायामाचे फायदे जाणून घ्या
व्यायाम सुरू करताना कोणती काळजी घ्यावी
वजन कमी करण्याचे उपाय

Benefits Of Swimming For Health And Fitness in Marathi information, is swimming good exercise Marathi, advantages and Disadvantages of swimming in Marathi benefits of swimming everyday swimming benefits for womens.