अंजीर फळ (Fig Fruit) :

अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते.

अंजीर फळातील पोषकतत्वे :

अंजीर हे अनेक खनिजतत्वे, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असून अंजीराच्या फळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, फायबर्स, व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. तसेच यात फॅटचे प्रमाणही अत्यल्प असून ते कोलेस्टेरॉल फ्री असते. अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा जास्त पौष्टीक असते. आरोग्यासाठी अंजीर खाण्याचे होणारे फायदे खाली दिले आहेत.

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

बद्धकोष्ठता दूर होते..
नियमित पोट साफ न होण्याची तक्रार असल्यास अंजीर खावे. कारण यामध्ये फायबर्स (तंतुमय पदार्थ) भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. अंजीर खाण्यामुळे मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते. मूळव्याधविषयी माहिती जाणून घ्या..

पित्त कमी करते..
अंजीर हे थंड गुणाचे आणि पित्तशामक असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर उपयुक्त आहे.

थकवा दूर करते..
अंजीर फळ खाण्यामुळे शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्यास अंजीर खावेत, त्याचा फायदा होतो. आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.

रक्ताचे प्रमाण वाढवते..
अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने शरीरातील रक्ताची वाढ होण्यास उपयुक्त ठरते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव कमी होत असेल किंवा ज्यांच्या अंगात हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशांनी रोज एक-दोन अंजीर खावेत.

शरीरातील रक्त संचारण (blood circulation) वाढवण्यासाठी दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यावे.

हृदयासाठी हितकारी..
अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते. हार्ट अटॅकची संपूर्ण माहिती मराठीत..

त्वचाविकार कमी करते..
अंजीर हे रक्तशुद्धीकर आणि पित्तनाशक असल्याने पांढरे डाग, शीतपित्त यासारख्या अनेक त्वचेच्या विकारांमध्ये अंजीर नियमित खाल्याने फायदा होतो.

तोंड येत असल्यास..
तोंड येणे या त्रासात ओठ, जीभ, तोंड यांना फोड येतात. अशावेळी अंजीर खाल्ल्यास या जखमा लवकर भरून येतात. तसेच कच्च्या अंजीराचा चीक या जखमांना लावावा. पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.

दमा आणि खोकल्यावरही गुणकारी..
अंजीर दूधात गरम करून सकाळ आणि संध्याकाळ खाल्ल्याने कफाचं प्रमाण कमी होतं तसंच दम्याचा त्रासही कमी होतो. कोरड्या खोकल्याचा त्रास वारंवार जाणवत असेल तर अंजीर खावा. खोकला होत नाही. छातीत कफ जमा झाला असेल तर अंजीर आणि पुदिना एकत्र करून खावा, त्याने कफ सुटतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अंजीर कोणी खाऊ नये व अंजीर खाण्यामुळे होणारे नुकसान :

अंजीर हे पचनास जड आहे. त्यामुळे अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन पोटदुखीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पचनशक्ती विचारात घेऊनच योग्य प्रमाणात अंजीर खावेत. मधुमेह असणाऱ्यांना ताजे अंजीर उपयुक्त आहे. मात्र सुके अंजीर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे.

हे सुद्धा वाचा..

यासारखीच विविध फळे, हिरव्या भाज्या, फळभाज्या, धान्ये, मसाल्याचे पदार्थ यांतील पोषक घटकांची मराठीत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Fig Fruit Health benefits information in Marathi.