चाकवत भाजी खाण्याचे फायदे मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Health Benefits of Chakvat in Marathi, Nutritional contents of Chakvat bhaji in Marathi.

चाकवत भाजीतील पोषक घटक :

चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर्स (तंतुमय पदार्थ) यासारखी अनेक पोषकतत्वे असतात.

अर्धा कप शिजवलेल्या भाजीत 300 mg कॅल्शियम आणि 11600 IU व्हिटॅमिन-A असते. ही भाजी लसूण, आले, जिरे, सैंधव इत्यादी घालून करतात तर काही ठिकाणी ताक घालूनदेखील ही भाजी केली जाते.

चाकवत भाजीची इतर नावे :
शास्त्रीय नाव – Chenopodium album
इंग्लिश नाव – Pigweed, Goosefoot, Fat-hen
हिंदी नाव – बथुआ

चाकवत भाजीचे फायदे :

चाकवत भाजी खाल्याने आरोग्यासाठी होणारे फायदे खाली दिले आहेत.

पोटाच्या विकारावर उपयुक्त..
चाकवतच्या भाजीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे यासारख्या समस्येत उपयोगी ठरते. याशिवाय पोटात गॅस होणे, पोट फुगणे यासारख्या पोटांच्या विकारात ही भाजी उपयुक्त ठरते. अनेक दिवस चाकवत भाजी खाल्याने पोटातील कृमींही कमी होतात.

हिमोग्लोबिन वाढवते..
या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ह्या भाजीचे सेवन करावे. रक्तातील अशुद्धी दूर करण्यासही मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे, अनेक त्वचा विकार यांवर ही भाजी उपयुक्त आहे

तोंडाला रुची आणते..
ही भाजी रुचकर आल्याने ताप किंवा आजारपणामुळे  तोंडाची चव गेली असल्यास भाजीच्या सेवनाने तोंडाला चव येते.

कावीळवरही उपयुक्त..
छातीत जळजळ होत असल्यास मसाले न घालता साध्या पद्धतीने पातळ भाजी तयार करून त्याचे सेवन करावे. अशा साध्या पद्धतीने केलेली भाजी ही कावीळ झालेली असल्यास आहारात घ्यावी. कावीळ आजाराची माहिती व उपचार जाणून घ्या..

तोंड येणे यावर उपयुक्त..
तोंड येण्याच्या त्रासावर किंवा हिरड्यातून रक्त येत असल्यास चाकवतची कच्ची पाने चावल्याने हा त्रास कमी होतो. तोंड येण्याची कारणे व उपाय वाचा..

लघवीच्या त्रासावर उपयुक्त..
लघवीस जळजळत असल्यास असल्यास दररोज 10 ग्रॅम चाकवतच्या पानांच्या रसात 50 मिली पाणी मिसळून प्यावे.

केसांच्या आरोग्यासाठी..
चाकवतमध्ये अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन आणि प्रोटीन मुबलक असते त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून केस गळणे, तुटणे या समस्या कमी होतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी..
चाकवतमध्ये व्हिटॅमिन A, आयर्न आणि झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते.

चाकवत भाजीचे नुकसान काय आहेत ..?
चाकवत भाजी खाताना कोणती काळजी घ्यावी..?

कोणतीही भाजी प्रमाणातच खाली पाहिजे. याला चाकवतही अपवाद नाही. चाकवतमध्ये Oxalic acid चे प्रमाण जास्त असते त्यामुळे कॅल्शियम आणि आयर्नचे शोषण होण्यास अडथळा आणते तसेच यामुळे किडनीत calcium oxalate चे मुतखडे होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असल्यास ही भाजी खाणे टाळा. मुतखड्याचा त्रास माहिती व उपचार जाणून घ्या..

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

तसेच चाकवतची भाजी जास्त खाल्ली गेल्यास अतिसार (डायरिया), पोटदुखी यासारखेही त्रास होऊ शकतात. त्यामुळे पचनशक्ती कमकुवत असणाऱ्यांनी ही भाजी खाणे टाळावे.

गरोदरपणात चाकवत भाजी खाऊ शकतो का..?
चाकवतच्या बियांमध्ये abortifacient घटक असल्याने गर्भपात होण्याचा धोका असल्याने गरोदर स्त्रीने चाकवतची भाजी खाणे टाळावे. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा हे सुद्धा वाचा..

Benefits of Bathua (Chenopodium Album) & Its Side Effects in Marathi, pigweed Fat hen goosefoot vegetables in Marathi.