तोंड येणे यावर हे करा घरगुती उपाय – Mouth sores in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

तोंड येणे – Mouth Sores :

तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे. या त्रासात ओठा, जीभ, घसा, गालाचा आतला भाग, हिरड्या यांवर फोड व जखम होत असते. या त्रासामुळे दात घासताना किंवा गरम अन्न खाताना त्याठिकाणी अतिशय वेदना होऊ लागतात.

तोंड येण्याची कारणे – Causes of Mouth sores :

अनेक कारणांमुळे तोंड येत असते.
• तुटलेला किंवा धारदार दात लागल्यामुळे,
• अन्न चावताना गाल किंवा जिभेच्या ठिकाणी चावल्यामुळे,
• दात घासताना ब्रश लागल्यामुळे,
• गरम पदार्थांचा चटका बसल्यामुळे,
• तिखट, मसालेदार, अम्लीय पदार्थ खाण्यामुळे,
• तंबाखूजन्य पदार्थ खाण्यामुळे,
• तोंडातील इन्फेक्शनमुळे,
• काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे,
• शरीरातील व्हिटॅमिन-B12 आणि फोलेटच्या कमतरतेमुळे,
• प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे प्रामुख्याने तोंडात फोड येऊन तोंड येण्याची समस्या होत असते.

याशिवाय इम्युन सिस्टीमचे आजार, तोंडाचा कर्करोग ल्युकोप्लाकिया, कॅन्डिडिआसिस, हर्पस सिम्प्लेक्स, लाइकेन प्लॅनस, एरिथ्रोप्लाकिया अशा अनेक आजारातसुद्धा तोंडात फोड व जखमा होऊ शकतात.

तोंड आल्याची लक्षणे – Mouth sores symptoms :

तोंड येणे यामध्ये ओठ, जीभ, हिरड्या, गाल, घसा ह्यावर फोड व जखम होते. फोड आलेल्या ठिकाणी वेदना जाणवत असतात. विशेषतः कोणताही पदार्थ खाताना किंवा पिताना त्रास अधिक होऊ लागतो. अशी लक्षणे या त्रासामध्ये असतात.

तोंड आल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?

तोंड येण्याची समस्या सामान्य असल्यास साधारण 10 – 12 दिवसांत त्रास बरा होतो. मात्र जर वारंवार तोंडात फोड व व्रण होत असल्यास, अनेक महिने तोंडातील जखम भरुन न आल्यास किंवा फोडांवर पांढरे ठिपके आले असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

तसेच जर आपणास तंबाखू, पानसुपारी, गुटका, बिडी, सिगारेट किंवा मद्यपान यांचे व्यसन असल्यास व असा त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे. कारण ती लक्षणे तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात.

तोंड येणे यावरील उपचार – Mouth sores treatments :

बऱ्याचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात हा त्रास कमी होत असतो. तोंड येणे यावर आपले डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे आणि तोंडातील फोडांवर लावण्यासाठी मलहम देऊ शकतात. तसेच व्हिटॅमिन्स किंवा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे तोंड आले असल्यास डॉक्टर मल्टी-व्हिटॅमिन, B-कॉम्प्लेक्सची औषधे देतील.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

तोंड आल्यावर हे करा घरगुती उपाय – Mouth sores Home remedies :

• ‎तोंड आल्यास हळद घातलेले थंड दूध प्यावे.
• आहारात दूध, तूप, तोंडलीची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.
• तोंड आलेल्या ठिकाणी तूप, मध, कोरफड लावल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
• तुळशीची 3-4 पाने चावल्यानेही तोंड आलेल्या समस्येत आराम पडतो.
• कडुनिंबाच्या रसात मध मिसळून गुळण्या केल्यानेही आराम पडतो.

तोंड येण्याची समस्या होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

• वारंवार तिखट, मसालेदार, खारट व अम्लीय पदार्थ खाणे टाळावे.
• जास्त गरम पदार्थ खाणे टाळा.
• काळजीपूर्वक आणि सावकाश अन्न चावून खावे.
• दात गालावर किंवा ओठांवर लागून जखम होत असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्या.
• रोजच्या रोज दात घासावेत.
• दात घासण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करा.
• जास्त जुने झालेले ब्रश वापरणे टाळा.
• तोंडाची स्वच्छता ठेवा.
• कोमट पाण्याने गुळण्या करा किंवा माऊथवॉशचा वापर करा.
• वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा.
• तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहावे.
• दारू, अल्कोहोल पिणे टाळावे.

तोंड येणे यासंबंधीत खालील माहितीपूर्ण लेखही वाचा..
तोंडाच्या कर्करोगाविषयी माहिती
पोट साफ न होण्याची समस्या आणि उपाय

2 Sources