मळमळ होणे – Nausea :
मळमळणे ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी होत असते. उलटी येईल असे वाटणे, पोट फुगणे, अस्वस्थ वाटणे, काहीही खाण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे मळमळ होत असल्यास जाणवतात. याठिकाणी मळमळ होणे यावरील उपायांची माहिती सांगितली आहे.
मळमळ होण्याची कारणे (Nausea causes) :
अनेक कारणांमुळे मळमळत असते. मात्र बहुतेक वेळा मळमळणे हे कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण नसते. पचनसंस्थेतील गडबडी, पित्त वाढणे, डोकेदुखी, मायग्रेन, लांबचा प्रवास यामुळे मळमळ होऊ शकते. तसेच प्रेग्नन्सी मध्येही सुरवातीच्या दिवसात मळमळ होत असते.
मळमळणे यावरील घरगुती उपाय :
आले (अद्रक) –
मळमळ होत असल्यास आले खूप उपयोगी ठरते. आल्याची फोड सैंधव मीठ लावून खाल्यास मळमळणे दूर होते. याशिवाय आले थोड्या पाण्यात घालून उकळून घ्यावे आणि त्या पाण्यात मध घालून पिण्यामुळेही मळमळ कमी होण्यासाठी मदत होते.
लिंबू रस –
लिंबूरसाच्या वासानेच मळमळणे कमी होते. मळमळ होत असल्यास लिंबू रसात थोडे पाणी आणि मीठ घालून पिऊ शकता. किंवा लिंबू रसात मध घालून मिश्रण तयार करावे व त्याचे चाटण केल्यानेही मळमळ कमी होते.
जिरे –
पचनक्रिया व्यवस्थित होण्यास जिरे उपयुक्त ठरते त्यामुळे मळमळत असल्यास थोडे जिरे चावून खावेत. किंवा जिरे आणि जायफळ घालून चहा करून प्यावा.
दालचिनी –
कपभर पाण्यात दालचिन घालून ते पाणी गरम करावे. पाणी कोमट झाल्यावर प्यावे यामुळे मळमळणे दूर होईल.
बडीशेप –
मळमळत असल्यास थोडी बडीशेप चावून खावी. बडीशेपमध्ये अनेक बायोऍक्टिव्ह घटक असतात त्यामुळे पोट फुगणे आणि त्यामुळे मळमळ कमी होते.
उलटी होत असल्यास ती थांबवू नये. उलटी पडून गेल्यामुळे मळमळ बऱ्यापैकी कमी होते. उलटी पडून गेल्यावर पचनास हलका आहार म्हणजे वरणभात, सफरचंद किंवा केळे खावे. तेलकट, मसालेदार, तिखट पदार्थ खाणे टाळावे.
हे सुद्धा वाचा :
मायग्रेनमध्येही मळमळ होऊ शकते. त्यामुळे मायग्रेन डोकेदुखीवरील उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Nausea causes and home remedies. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.