मासिक पाळी म्हणजे काय..?

मासिक पाळी म्हणजेच Menses किंवा सर्वसाधारणपणे M.C. अशा रुढार्थाने वापरली जाणारी, स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना! मासिक पाळी येणे ही स्त्रियांमध्ये एक नैसर्गिक आणि प्रजनोत्पादनसाठी आवश्यक अशी बाब असते. Menstruation period information in Marathi.

मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला स्त्रियांमध्ये योनीमार्गातून बाहेर पडणारा रक्तस्राव. हा रक्तस्राव साधारणपणे दोन ते सहा दिवसापर्यंत येत असतो. त्यानंतर त्या महिन्यातील पाळी थांबते आणि पुढच्या महिन्यात साधारण 24 ते 28 दिवसांनी पुन्हा पाळी येते. अशारीतीने स्त्रीमध्ये मासिक चक्र (Menstrual Cycle किंवा MC) सुरू असते.

मासिक पाळी का येते..?

स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतील आवरण दर महिन्याला तयार होऊन संप्रेरकातील बदलांमुळे बाहेर टाकले जाते. ते बाहेर पडताना रक्तस्राव येत असतो. त्यालाच Bleeding असे म्हणतो.

मुलींमध्ये मासिक पाळी कधी सुरू होते..?

साधारणपणे वयाच्या नवव्या ते चौदाव्या वर्षांपासून मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते. या वयात मुलींमध्ये अचानक बदल जाणवू लागतात. मुलींची उंची व वजन वाढायला लागते, स्तनांची वाढ होऊ लागते, जननेंद्रियांची वाढ होऊन त्याभोवती केस उगवू लागतात, काखेमध्ये केस येऊ लागतात. याबरोबरच या वयात मासिक पाळी चालू होते.

प्रत्येक मुलींमध्ये पाळी सुरू होण्याचे वय कमी अधिक असू शकते. कोणात फार लवकर पाळी सुरु होऊ शकते तर काही मुलींमध्ये फार उशीराही पाळी सुरू होऊ शकते. मात्र वयाची सोळा वर्ष झाल्यानंतरही जर पाळी आली नाही तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मासिक पाळीत किती दिवस रक्तस्राव होतो..?

बहुतेक वेळा मासिक पाळीत 2 ते 6 दिवसापर्यंत रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यानंतर त्या महिन्यातील पाळी थांबते. आणि पुढच्या महिन्यात पुन्हा मासिक पाळी येते.

पुन्हा मासिक पाळी किती दिवसांनी येते..?

एका महिन्यात पाळी आल्यानंतर पुढील चोवीस ते पस्तीस दिवसांच्या कालावधीत मासिक पाळी होत असते. अशारीतीने स्त्रीमध्ये मासिक चक्र (Menstrual Cycle किंवा MC) सुरू असते.

मासिक पाळीत किती प्रमाणात रक्तस्राव होत असतो..?

साधारण 60 to 80ml इतका रक्तस्राव दर महिन्याला होऊ शकतो. म्हणजे एक लीटर रक्त यातून जात असते. ते वाढविण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते.

मासिक पाळीमध्ये कोणकोणते त्रास होऊ शकतात..?

मासिक पाळीच्या वेळी काही स्त्रियांमध्ये पोट दुखणे, कंबर दुखणे, उलटी होणे, हातापायात गोळे येणे, भूक कमी होणे, डोकेदुखी, अंगदुखी, झोप न लागणे असे त्रास होऊ शकतात. हे त्रास अधिक तीव्रतेने होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मासिक पाळी केंव्हा केंव्हा येत नाही..?

गर्भधारणा झाली असल्यास, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्यास, सेकंडरी अमेनोरिया किंवा मासिक पाळी अनियमित असल्यास पाळी येत नाही.

मासिक पाळी येणे कधी थांबते..?

चाळीस ते पंचावन्न वय झाल्यानंतर स्त्रियांमध्ये नियमित येणारी मासिक पाळी येणे बंद होते. ह्या स्थितीला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात.

मासिक पाळीत कोणती काळजी घ्यावी..?

  • मासिक पाळीमध्ये पूर्ण विश्रांतीची घेण्याची गरज नाही.
  • मासिक पाळीमध्ये थकवा आणणारी जास्त कष्टाची कामे करणे टाळावे.
  • मासिक पाळीमध्ये पोट किंवा कंबर अधिक दुखत असल्यास थोडा आराम करावा.
  • ‎मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखावी. यासाठी सकाळी गरम पाण्याने आंघोळ करावी.
  • ‎या दिवसात येणारा रक्तस्राव शोषण्यासाठी योनीमार्गाजवळ कापडाची घडी किंवा सॅनिटरी नॅपकिन ठेवावा लागतो.
  • ‎सॅनिटरी नॅपकिन वापरण्यास सुटसुटीत असते मात्र ते विकत घेणे अनेकांना परवडत नाही. अशावेळी स्वच्छ, कोरडे व सुती कापडाची घडी करून त्याचा वापर करू शकता.

मासिक पाळी पुढे ढकलता येते का आणि असे करणे योग्य आहे का..?

मासिक पाळी पुढे ढकलता येते, यासाठी गोळ्या आहेत. मात्र या गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने कारणे गरजेचे आहे. मासिकपाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेण्याचे प्रमाण तरुणींमध्ये अधिक आहे. मात्र अशा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. कारण या गोळ्यांचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे कधीतरीच या गोळ्यांचा वापर करावा. मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी वरचेवर या गोळ्या घेणे टाळावे.

मासिक पाळीच्या वेळी संबंध ठेवणे योग्य की अयोग्य..?

दोघांचीही मानसिक तयारी असल्यास मासिक पाळीच्या काळात संभोग करण्यास काही हरकत नाही. पण स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास ही विचारात घेणे गरजेचे असते.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

मासिक पाळीसंबंधित खालील माहितीही वाचा..