तुम्ही गरोदर असल्याची ही आहेत प्राथमिक लक्षणे – Pregnancy Symptoms in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

प्रेग्नन्सीची सुरवातीची लक्षणे :

गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा असा काळ असतो. गरोदरपणातील हार्मोन्समधील बदलांमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. अशावेळी त्या स्त्रीला काही लक्षणे जाणवू लागतात. त्या जाणवणाऱ्या लक्षणांवरून गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजण्यास मदत होत असते. यासाठी येथे गरोदरपणात कोणती लक्षणे जाणवू शकतात याविषयी माहिती दिली आहे.

गरोदरपणातील लक्षणे (Pregnancy Signs & Symptoms in Marathi) :

1) मासिक पाळी न होणे –
जर मासिक पाळी नियमित येत असल्यास व यावेळी मात्र पाळी आली नाही तर ते गरोदरपणाचे मुख्य लक्षण असू शकते. गर्भधारणा (Pregnant) झाल्यावर शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार होऊ लागते. या हार्मोनमुळे मासिक पाळी येणे थांबत असते.

2) मळमळ व उलट्या होणे –
गरोदरपण सुरू झाल्यास मळमळ होणे, उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. मळमळ वगैरे लक्षणं केवळ सकाळी न राहता दिवसभर जाणवत राहतात. मात्र सकाळच्यावेळी उठल्यावर याचा त्रास अधिक होत असतो. याला प्रेग्नन्सीतील ‘मॉर्निंग सिकनेस’ असेही म्हणतात. तसेच काही ठरावीक वास आल्यानंतरही मळमळ वैगरे लक्षणे जास्त जाणवतात. गरोदरपणातील साधारण दुसऱ्या ते आठव्या आठवड्यांपर्यंत हे त्रास जाणवत राहतात.

3) मूड स्विंग –
गर्भधारणा सुरू झाल्यावर त्या स्त्रीच्या शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे तिची मनःस्थिती सतत बदल असते. अशावेळी ‘मूड’मध्ये होणारा बदल अनेक प्रकारचा असतो. काहीवेळा खूप टेन्शन, खूप काळजी वाटते; तर काहीवेळा एकदम आनंदी, आल्हादकारक वाटते. नक्की काय होतंय हे न समजल्यामुळे नैराश्य पण वाटू शकते. प्रेग्नसीमध्ये झपाट्याने बदलणारी संप्रेरके याला जबाबदार असतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

4) स्तनांमध्ये बदल जाणवणे –
प्रेग्नंट असल्यास स्तनांच्याठिकाणी जडपणा जाणवू लागतो. तसेच तेथे स्तनांमध्ये सूज व वेदनाही होत असते. तर निप्पलचा भाग हा अधिक गडद झाल्याचे जाणवते.

5) थकवा जाणवणे –
गरोदर असल्यास सुरवातीच्या काळात स्त्रीला काहीही न करता थकल्यासारखे वाटू शकते. या वेळी तिला झोपेचाही त्रास होऊ शकतो. गरोदरपणाच्या सुरवीतीच्या काळात गर्भ रुजत असताना शरीरात होणाऱ्या बदलामुळे थकवा येणे, अशक्तपणा किंवा चक्कर येणे असे त्रास जाणवत असतात.

6) वारंवार लघवीला होणे –
गर्भवती असल्यास शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, वारंवार लघवीला होत असते.

7) ओटीपोटात दुखणे –
गर्भधारणेच्या सुरवातीच्या काळात गर्भाशयात गर्भ रोपण होत असते. यामुळे ओटीपोटात दुखण्याची तक्रार होऊ शकते. तसेच योनीतून हलका रक्तस्रावही यावेळी होऊ शकतो.

8) पचनाच्या तक्रारी होणे –
प्रेग्नन्सीमध्ये शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढल्यामुळे बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे), पोटात गॅस होणे, पोटफुगी किंवा छातीत जळजळ होणे, भूक कमी होणे असे त्रास होऊ शकतात. ‘प्रोजेस्टेरॉन’ हे हार्मोन प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले असते. त्यामुळे अशा पचनासंबंधीत तक्रारी यावेळी होऊ शकतात.

गर्भधारणा झाली आहे हे असे समजते :

गरोदर असल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ‘पाळी चुकणे’ हे असते. स्त्रीची मासिक पाळी नियमित असताना जर दहा किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस होऊनही पाळी न आल्यास ती गर्भवती आहे असं अनुमान काढलं जातं; पण या गोष्टीलाही अपवाद आहेत.

काहीवेळा गर्भावस्था नसतानाही पाळी बंद होऊ शकते. तसंच काही स्त्रियांना दिवस राहूनही पाळीच्या दिवसांत रक्तस्राव होऊ शकतो. मग असे असताना गर्भधारणा झाली आहे की नाही हे कसे समजावे असा अनेक स्त्रियांचा प्रश्न असतो. यासाठी येथे गर्भधारणा झाली आहे की नाही हे कसे ओळखावे याविषयी माहिती खाली दिली आहे.

प्रेग्नंट आहे हे किती दिवसात समजते..?

साधारणपणे सेक्सनंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत ती स्त्री गरोदर होऊ शकते. अशावेळी गर्भधारणा झाल्यावर काही लक्षणे जाणवू शकतात त्यानुसार तसेच प्रेग्नन्सी टेस्ट करूनही ती स्त्री गरोदर आहे की नाही ते समजते.

लैंगिक संबंधानंतर काही मिनिटांपासून ते 5 दिवसापर्यंत स्त्रीबीज आणि पुबीज यांचे मिलन होऊन फर्टिलाईजेशन होते. त्यानंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत मिलनातून फर्टिलाईज झालेले अंडे हे गर्भाशयात रुजण्याची प्रक्रिया (Implantation) सुरू होते व तेंव्हा गर्भधारणा होते. म्हणजे सेक्सनंतर साधारण 6 ते 15 दिवसात स्त्री गर्भवती होत असते.

सेक्सनंतर गर्भधारणा किती दिवसात होते..?

1) सेक्स – पहिला दिवस
2) फर्टिलाईजेशन – सेक्सनंतर 5 दिवसापर्यंत
3) गर्भधारणा (Implantation) – 6 ते 15 दिवसांपर्यंत
4) प्रेग्नन्सी टेस्ट करावी – सेक्सनंतर 1 ते 2 आठवड्यानंतर करावी.

गरोदर आहे की नाही हे खालील लक्षणांवरून असे ओळखावे :

सर्वसाधारणपणे गर्भारपणाच्या सुरुवातीला पुढील काही लक्षणे आढळू शकतात. त्यायोगे गरोदर असल्याचे कळू शकते. मात्र ही लक्षणे जाणवण्यासाठी 2 ते 3 आठवडे जाणे आवश्यक असते.
1) मासिक पाळी न येणे,
2) स्तन दुखू लागणे, स्तन जड व सुजल्यासारखे वाटणे,
3) मळमळणे व उलट्या होणे,
4) थकवा व अशक्तपणा जाणवणे,
5) पोट फुगल्यासारखं किंवा गच्च वाटणे,
6) सारखे-सारखे लघवीला होणे,
7) अंग गरम झाल्यासारखे वाटणे,
8) चिडचिडेपणा वाढणे, मूड सतत बदलत राहणे.

गरोदर असल्यास वरील गर्भधारणेची लक्षणे त्या स्त्रीमध्ये जाणवू शकतात. मात्र गरोदर असण्याची निश्चित खात्री करून घेण्यासाठी काही चाचण्यांचा आधार घ्यावा लागतो. विशेषतः जर एखाद्या स्त्रीची पाळी ही ‘अनियमित’ असल्यास त्यांच्यामध्ये चुकलेल्या पाळीवरून गरोदरपणाचे निदान करणे हे अवघड असते. यासाठी गरोदर आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी काही चाचण्या करणे आवश्यक असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गर्भावस्थेचे खात्रीशीर निदान करणाऱ्या चाचण्या :

गर्भधारणा झाली आहे की नाही याचे निदान लघवीच्या साध्या चाचणीवरून करता येते. या चाचणीला ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ असे म्हणतात. यासाठीचे किट्स मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असते. त्याद्वारे घरातही टेस्ट करता येते. याद्वारे लघवीची तपासणी करुन गर्भधारणा असल्याची किंवा नसल्याची खात्री फक्त पाच मिनिटातच करता येते. प्रेग्नन्सी टेस्ट किटचा वापर कसा करावा हे जाणून घ्या..

काहीवेळा ही टेस्ट प्रेग्नेंट असल्याचे निश्चित निदान देऊ शकत नाही. किंवा ज्या स्त्रियांची पाळी अनियमित असते, त्यांच्यात ही तपासणी करणे अवघड होते. अशावेळी ब्लड टेस्ट करून रक्तातील बिटा एचसीजी हे हार्मोन तपासून प्रेग्नन्सीचे निदान होऊ शकते. याशिवाय सोनोग्राफी तपासणीतून प्रेग्नेंट आहे की नाही ते खात्रीशीररित्या कळते. तसेच यामध्ये गर्भाशयात वाढणारा गर्भ नक्की किती आठवड्यांचा झालेला आहे हेसुद्धा समजू शकते.

Information about Pregnancy Signs and Symptoms in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.