गरोदरपणातील उलट्या व मळमळ होण्याच्या त्रासावर हे करा उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गरोदरपणात मळमळ व उलटी होणे :

गरोदरपणात जाणवणारी मळमळ आणि उलटी होण्याची समस्या ही अगदी सामान्य बाब आहे. प्रेग्नन्सीमध्ये दिवसभरात केंव्हाही मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. मात्र सकाळी उठल्यावर मळमळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याने याला ‘मॉर्निंग सिकनेस’ असे म्हंटले जाते. गर्भावस्थेत काही गरोदर स्त्रियांना केवळ मळमळ होत असते तर काही गर्भवती महिलांना मळमळ आणि उलटीही होत असते. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात हा त्रास होत असतो.

गरोदरपणातील मळमळ आणि उलटीचा गर्भावर काही विपरीत परिणाम होईल का..?

प्रेग्नन्सीत आपले खाणेपिणे योग्य असल्यास मळमळ आणि उलटी होण्याने गर्भावर काही विपरीत परिणाम होत नाही. मात्र वारंवार उलट्या होत असल्यास शरीरातील तरल पदार्थ कमी होत असतो. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो.

डिहायड्रेशनमुळे आई आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यासाठी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून उलट्या होत असल्यास वरचेवर द्रवपदार्थ म्हणजे पाणी, लिंबूपाणी, शहाळ्याचे पाणी पिणे आवश्यक आहे.

गर्भावस्थेत किती दिवस मळमळ किंवा उलट्या यांचा त्रास होत राहील..?

गर्भावस्थेत पहिल्या तीन महिन्यात हार्मोन्समधील बदलांमुळे मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ शकतो. बहुतांश गर्भवती स्त्रियांचा पाहिले त्रैमासिक संपल्यावर हा त्रासही कमी होतो. तर काही गरोदर महिलांना संपूर्ण गरोदरपणात मळमळ व उलटीचा त्रास जाणवू शकतो.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गरोदरपणाची पहिलीच वेळ असल्यास, आपल्याला प्रवासात मळमळ किंवा उलटीचा त्रास असल्यास, मायग्रेनचा त्रास होत असल्यास किंवा जुळी बालके असल्यास आपणास मळमळ आणि उलटीचा त्रास इतरांपेक्षा थोडा जास्त होऊ शकतो.

गर्भावस्थेतील मळमळ आणि उलटी होणे यावर हे करा उपाय :

पुरेसे तरल पदार्थ प्या..
उलटीचा त्रास होत असल्यास डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे द्रवपदार्थ प्यावेत. यासाठी आपण वरचेवर पाणी, लिंबू पाणी, रसाळ फळे, शहाळ्याचे पाणी प्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ORS चा वापरही करू शकता.

पुरेशी विश्रांती घ्या..
गरोदरपणात हार्मोनल बदलांमुळे मळमळ आणि उलटी होत असते. अशावेळी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असते .

सकाळी नाश्ता करा..
सकाळी उठल्यावर मळमळ अधिक होत असल्यास, उठल्यावर लगेच टोस्ट किंवा बिस्किटे, इडली, सँडविच असे पदार्थ खाणे उपयुक्त ठरते.

वेळोवेळी आहार घ्यावा..
बराचवेळ काही न खाल्याने मळमळ होऊ शकते. यासाठी वरचेवर थोडे थोडे खात राहावे. जेवण वेळच्यावेळी करावे. हलका आहार घ्यावा. मात्र मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

हे घरगुती उपाय करा..
मळमळत असल्यास लिंबाचा वास घ्यावा. याशिवाय आल्याचा रस व लिंबूचा रस एकत्र करून ते मिश्रण थोड्या थोड्या वेळाने घ्यावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?

प्रेग्नन्सीमध्ये थोडीफार मळमळ किंवा कोरड्या उलट्या होणे, दिवसातून दोन ते तीन वेळा उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. मात्र अधिक प्रमाणात त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. स्वतःच्या मनाने कोणतेही उलटी थांबवणारे औषध घेऊ नये.

गरोदरपणात जास्त प्रमाणात उलट्या होत असल्यास ते ‘हायपेरेमेसिस ग्रॅव्हिडारम’चे लक्षण असू शकते. यामध्ये गर्भवतीस नेहमीपेक्षा जास्त उलट्या होतात ज्यामुळे ती कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत, गर्भवतीचे वजन गर्भधारणेदरम्यान 15 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. ही एक गंभीर समस्या असून यासाठी दवाखान्यात जाणे आवश्यक असते.

Nausea & Vomiting during pregnancy information in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.