त्रास अपचनाचा – कारणे, लक्षणे आणि उपचार

18540
views

अपचन म्हणजे अन्न नीट न पचणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांमध्ये अपचन, गॅसेस, अॅसिडिटी याचा त्रास होताना दिसतो, याला कारण आपली फास्ट जीवनपद्धती. अपचनाचा त्रास प्रत्येकात वेगवेगळे लक्षण घेऊन प्रकटू शकतो. यामूळे भोजनानंतर अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, छातीत जळजळणे, हृद्य अधिक धडकणे, वारंवार ढेकर येणे, घाम येणे या लक्षणाबरोबर मळमळणे, कोष्ठबद्धता (शौचास साफ न होणे) हे लक्षणसुद्धा आढळतात.

पोटामध्ये अन्नाचे पचन करणाऱ्‍या पाचक स्त्रावांची (Digestive enzymes) निर्मिती होत असते. पचन म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पाचक रसात रूपांतर होणे, ज्यामुळे आपलं पोषण व शरीरधारणा होत असते. आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत गेलेली एक लांबलचक पोकळ नळीच होय, ज्याची लांबी साधारणपणे नऊ मीटर इतकी असते. अन्नाचे पूर्ण पचन करून त्यातली पोषणद्रव्ये शरीरात शोषून घेणे व शेवट राहिलेला मळ शरीरातून गुदद्वारामाग्रे बाहेर टाकणे हे काम पचनसंस्था अव्याहतपणे करत असते.
सामन्यता घेतलेले अन्न अन्ननलिकेतून पोटामध्ये आल्यानंतर त्यावर पाचक स्त्रावांची प्रक्रिया होते व त्या अन्नाचे पचन योग्य रितीने होते. मात्र जेंव्हा ह्या पाचक स्त्रावांची उत्पत्ती कमी होते तेंव्हा अन्नाचे पचन योग्य रित्या होत नाही यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवतात.

अपचनाची कारणे :

अपचनाचा विकार मुख्यत: दोन कारणांनी होतो. अयोग्य जीवनशैलीमुळे आणि काही शारीरिक व्याधीमुळे अपचनाचा त्रास होतो.

 • शरीरात पाचक रसांचा अभाव किंवा कमतरता निर्माण झाल्यास अपचनाची समस्या उद्भवते.
 • अयोग्य आहारामूळे, आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात भोजन करणे, रात्री उशीरा भोजन करणे, भोजनाच्या वेळा न पाळणे, भराभर जेवण करणे, अन्न व्यवस्थित न चावता गिळणे,
 • अधिक तेलकट – मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे, चहा – कॉफी – सोडावाटर यांचे अधिक सेवन करणे.
 • दारू, तंबाखूच्या व्यसनामूळे अपचनाच्या तक्रारी वाढतात.
 • रात्रीच्या वेळेची जागरणे, अतिताण, मानसिक तणाव, अतिकाळजी या सर्वामुळे अपचनाचा विकार वाढतो.
 • वेदनाशामक औषधे, स्टिरॉईड्स यांचा अतिरिक्त वापरामुळे अपचनाच्या तक्रारी वाढतात.

अपचनाची लक्षणे :
भूक न लागणे, आंबट ढेकर येणे, तोंडात आम्ल पाणी येणे, मळमळ होणे, छातीत जळजळणे.
डोके दुखणे, चक्कर येणे, हृद्य अधिक धडकणे, पोटात गॅस तयार होतो भोजनपश्चात पोट फुगणे,
कोष्ठबद्धता (शौचास साफ न होणे),
अन्न न खाण्याची इच्छा होणे,
वारंवार सुस्ती येते, कोणत्याही कार्यात मन लागत नाही,
अल्प परिश्रम केल्यावरही थकवा जाणवतो,
अनिद्रा, वारंवार झोपमोड होणे यासारखी लक्षणे अपचणात जाणवतात.

अपचन ही समस्या काही गंभीर आजारांचे पूर्व लक्षण असू शकते. म्हणूनच अपचनाबरोबरचं सतत उलट्या होणे , उलटीत रक्त पडणे , वजन कमी होणे वा भूक मंदावणे, घास गिळताना त्रास होणे – अशी लक्षणे दिसून येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यावा .

हे करा..

 • संतुलित पोषक आहार घ्या. पचनास हलका असा आहार घ्या. वरण-भातातून तूप घालून खावे.
 • दिवसभरात एकाचवेळी भरपूर जेवण्यापेक्षा अनेकदा थोडे थोडे जेवावे.
 • आवश्यक ती विश्रांती घ्या.
 • मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी योग वा रीलॅक्सेशन थेरपीचा अवलंब करावा.
 • जड आहार, तिखट – तेलकट पदार्थांचे सेवन करू नये.
 • तम्बाखुचे सेवन, मद्यपान, धूम्रपान करने टाळा.
 • चहा, कॉफी, कोल्ड्रिंकचे सेवन करू नये.
 • जेवल्यावर लगेच झोपू नये. शक्य असल्यास शतपावली करावी. ते शक्य नसल्यास किमान थोडावेळ बसून रहावे व मगच झोपावे .

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.