रक्ताची उलटी होण्याची कारणे – रक्ताची उलटी कशामुळे होते ते जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

रक्ताची उलटी होणे (Vomiting Blood) :

रक्ताची उलटी होण्याची कारणे अनेक असतात. यातील काही कारणे ही अगदी सामान्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. प्रामुख्याने पोटातील दुखापत, आजारपण किंवा काही विशिष्ट औषधाच्या वापरामुळे रक्ताची उलटी होऊ शकते.

ह्यामध्ये गडद लालसर ते काळपट रंगाचे रक्त पडू शकते. रक्ताची उलटी होणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत हेमेटिमिसिस असे म्हणतात. याठिकाणी रक्ताची उलटी का होते, रक्ताची उलटी कशामुळे होते, त्याची कारणे काय असतात याविषयी माहिती दिली आहे.

रक्ताची उलटी होण्याची कारणे :

रक्ताची उलटी असणारी साधारण कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
• पोटातील अल्सर,
• नाकातील रक्तस्राव,
• तीव्र खोकला,
• एस्पिरिन किंवा इतर वेदनाशामक औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे,
• अन्नातून विषबाधा झाल्याने,
• ऍसिडिटी, गॅस्ट्रो किंवा जठराला सूज आल्यामुळे,
• स्वादुपिंडाला सूज आल्यामुळे,
• उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास,
• अधिक प्रमाणात मद्यपान, अल्कोहोल पिण्यामुळे रक्ताची उलटी होऊ शकते.

रक्ताची उलटी असणारी गंभीर कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
• अन्ननलिका कर्करोग,
पोटाचा कर्करोग,
स्वादुपिंड कर्करोग,
• हार्ट अटॅक,
• हिपॅटायटीस, यकृत निकामी होणे, यकृताचा कँसर किंवा लिव्हर सिरोसिस अशा यकृताच्या आजारांमुळेही रक्ताची उलटी पडू शकते.

त्यामुळे रक्ताची उलटी येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने त्याचे निदान आणि योग्य वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.

रक्ताची उलटी होण्याचे निदान :

रक्ताची उलटी कशामुळे होते याचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी करण्यात येईल. त्याबरोबरचं एंडोस्कोपी तपासणी, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एक्स-रे यांचा वापर नेमक्या निदानासाठी करावा लागू शकतो.

डॉक्टरांकडे केंव्हा जाणे अत्यंत आवश्यक आहे..?

• उलटीतून अधिक प्रमाणात रक्त जाणे,
• चक्कर येणे,
• डोळ्यांनी अंधुक व अस्पष्ट दिसणे,
• हृदयाचा ठोके जलद होणे,
• बेशुद्ध पडणे,
• पोटात तीव्र वेदना होणे,
• संडासमधून रक्त पडणे अशी लक्षणे असल्यास तात्काळ रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

दवाखाना जवळ नसल्यास 108 ह्या क्रमांकावर डायल करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी व रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे.

Vomiting Blood Causes, Symptoms, and Treatments in Marathi.