एपिलेप्सी आजाराची मराठी माहिती (Epilepsy information in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

एपिलेप्सी आजार :

Epilepsy in Marathi – एपिलेप्सी (Epilepsy) या आजाराला मराठीमध्ये अपस्मार, फेफरे येणे, मिरगी किंवा फिट येणे असेही म्हणतात. एपिलेप्सी हा मेंदूसंबंधी एक आजार आहे. या आजारात रुग्ण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो.

एपिलेप्सीची लक्षणे – Epilepsy Symptoms Marathi :

• पेशंट अचानकपणे तोल जाऊन खाली बेशुद्ध होऊन पडतो.
• ‎शरीर आकडते, झटका येतो.
• ‎शरीराच्या विचित्र हालचाली होतात.
• ‎जीभ किंवा ओट दातांनी चावले जाते, दातखिळी बसते.
• ‎तोंडातून फेस येऊ लागतो.
• ‎रुग्ण डोळे फिरविते, शुद्धी हरपते.
या आजारामुळे आलेली बेशुद्धी एक ते तीन मिनिटापर्यंत असू शकते. त्यानंतर ती व्यक्ती शुद्धीवर येते.

एपिलेप्सी कारणे – Epilepsy Causes :

मानसिक ताणतनावामुळे, अपूर्ण झोपेमुळे, ताप-सर्दी-खोकला हे आजार झाल्यास, रक्तदाब वाढल्यास, रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, Anti-psychotic किंवा Anti-depressant औषधांच्या दुष्परिणामामुळे, डोक्याला मार लागल्यामुळे, कडक उन्हाच्या त्रासामुळे एपिलेप्सीचा झटका येऊन बेशुद्ध पडण्याची संभावना वाढते.

एपिलेप्सीचे निदान :

वारंवार अचानकपणे चक्कर येऊन बेशुद्धी येत असल्यास मेंदूरोग तज्ज्ञाकडून Epilepsy चे निदान करून घेणे आवश्यक असते. पेशंटची हिस्ट्री, शारीरिक तपासणी आणि E.E.G (Electroencephelography), MRI स्कॅन, CT स्कॅन इ. चाचण्या करून याचे निदान केले जाते.

एपिलेप्सी आजार उपचार – Treatment of Epilepsy in Marathi:

तज्ज्ञ डॉक्टरांकडून एपिलेप्सीचे निदान झाल्यानंतर आधी Anti-epileptic औषधे सुरू केली जातात. औषधांनी जर एपिलेप्सी नियंत्रणात येत नसल्यास मेंदूवरील सोपी आणि सुटसुटीत शस्त्रक्रियने (Operation) एपिलेप्सीवर यशस्वी उपचार होऊ शकतात.

जर एखाद्यास एपिलेप्सीचा झटका आल्यास काय करावे..?

• स्वतः शांत राहा व भयभीत होऊ नका.
• ‎बेशुद्ध येऊन पडलेल्या रुग्णास जबरदस्तीने हलवू नका.
• ‎रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला असल्यास त्या वस्तू दूर करा.
• ‎रुग्णाला डाव्या किंवा उजव्या बाजूस वाळवावे त्यामुळे रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
• ‎त्यानंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
• ‎रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नका.
• ‎चप्पल, कांदा यासारख्या वस्तू रुग्णाच्या नाकाला हुंगायला लावू नका.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

एपिलेप्सीच्या झटक्यामध्ये दोन ते तीन मिनिटे अशा प्रकारे रुग्णाची शुध्द हरपते. थोड्या वेळात रुग्ण आपोआप शुद्धीवर येतो. तर कधीकधी वैद्यकीय इमर्जन्सीचीही गरज पडू शकते. 10-15 मिनिटे होऊनही जर रुग्ण शुद्धीवर आला नाही तर रुग्णास तातडीने दवाखान्यात घेऊन जावे किंवा 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.

एपिलेप्सी रुग्णासाठी महत्त्वाच्या सूचना : :

• डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.
• ‎नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
• ‎पुरेशी झोप घ्यावी.
• ‎मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
• ‎नियमित व्यायाम करावा.
• ‎चहा, कॉफी, सिगारेट, बीडी, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळा.
• ‎रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव, पत्ता, घरातील फोननंबर आणि Epilepsy रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवावी. या चिट्टीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयी ही माहिती लिहिलेली असावी.

Epilepsy in Marathi – Epilepsy Symptoms, Causes & Treatments information in Marathi.