डोळे येणे आजार – Conjunctivitis :

डोळे येणे हा डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे डोळे येण्याची साथ अनेकदा आलेली आढळते. डोळे येणे या आजारास english मध्ये Pink eye किंवा Conjunctivitis (कॉन्जुक्टीव्हिटीज) असे म्हणतात. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदर्शक पडदा असतो त्यालाच कान्जुक्टीव्हा असे म्हणतात.

डोळे येण्याच्या त्रासात डोळ्यातील या कॉन्जुक्टिव्हा भागात जळजळ किंवा आग होऊ लागते व त्याठिकाणी सूज येऊन डोळे गुलाबी होतात. म्हणून ह्या डोळ्याच्या आजारास पिंक आय असेही म्हंटले जाते.

डोळे येण्याची ही आहेत कारणे :

डोळे येण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इन्फेक्शन होऊन डोळे येणे व दुसरा म्हणजे कोणत्यातरी एलर्जीमुळे डोळे येणे. 

त्यातही इन्फेक्शन म्हणजे संसर्गामुळे डोळे येण्याचे प्रमाण जास्त आहे. डोळ्यात बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांचे इन्फेक्शन होणे हे डोळे येण्यास कारणीभूत ठरते. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने डोळे येण्याच्या साथीचा प्रसार एकमेकांच्या संसर्गाने होत असतो.

त्याचप्रकारे सर्दीमुळेही डोळे येऊ शकतात किंवा केमिकल्स, दूषित वायू, अल्ट्राव्हायोलेट किरण यांच्या संपर्कात आल्यानेही डोळे येऊ शकतात. तसेच कॉन्टॅक्ट लेन्सच्या चुकीच्या वापरामुळे आणि डोळ्यातील सौदर्य प्रसाधनाच्या अतिवापरामुळेही हा त्रास होऊ शकतो.

डोळे येण्याची लक्षणे अशी असतात :

• डोळ्यात खुपल्यासारखे होणे,
• डोळा लालसर किंवा गुलाबी होणे,
• डोळ्यात जळजळ होणे,
• डोळ्यातून सुरुवातीला पाणी व त्यानंतर चिकट घाण येणे,
• डोळ्यांच्या पापण्या चिकटणे, 
• उजेड सहन न होणे अशी डोळे येण्याची लक्षणे असतात.

डोळे आल्यास अशी घ्यावी काळजी :

• डोळ्याची जळजळ होत असल्यास थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत आणि डॉक्टरांनी दिलेली ड्रॉप्स डोळ्यात घालावेत.
• डोळे आल्यावर डोळ्यात पाणी येत असल्यास हाताने डोळे पुसू किंवा चोळू नयेत. यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. कारण त्यामुळे इन्फेक्शन इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते.
• डोळे आल्यावर स्वच्छ आणि दर्जेदार गॉगल घालावा. यामुळे धूळ, कचरा, वारा डोळ्यात जात नाही तसेच उजेडाचा त्रासही होत नाही.
• कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास डोळे आल्यावर लेन्स लावू नयेत. आजार बरा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करावा.
• डोळे येणे हा आजार संसर्गजन्य असल्याने डोळे आलेले असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
• डोळे आलेल्या व्यक्तीचा हातरुमाल, टॉवेल आदींचा वापर करु नये.
• ऍलर्जिक प्रकाराचे डोळे आले असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन निदान व योग्य उपचार करू घ्यावे.

डोळे येणे यावरील उपचार :

डोळे येणे हा त्रास दोन ते तीन दिवसात कमी होत असतो. यावरील उपचारासाठी आपले डॉक्टर डोळ्यात घालण्यासाठी अँटीबायोटिक ड्रॉप्स देतात. याशिवाय सूज आणि वेदना कमी करण्यासाठीही औषधे देऊ शकतात.

डोळे येणे यावर हे करा घरगुती उपाय :

डोळे येणे यावर आयुर्वेदानुसार एरंडेल तेल काजळासारखे पापण्यांना लावल्यानेही आराम पडण्यास मदत होते व डोळे येण्याचा त्रास कमी होतो.

डोळे दुखत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)