रजोनिवृत्ती होणे म्हणजे काय..?
स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणे पूर्णतः बंद होते त्या काळास ‘रजोनिवृत्ती होणे’ असे म्हणतात. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरवात होते, शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिकस्त्राव पूर्णपणे बंद होण्यास सुरवात होते.
रजोनिवृत्ती का व कधी येते..?
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात आणि ते स्वाभाविकच असतात. प्रत्येक महिन्याला येणाऱया मासिक स्त्रावामध्ये बदल होणे व क्रमाक्रमाने मासिक पाळी येणे थांबते. स्त्रीयांमधील डिम्बग्रंथीत वाढत्या वयाबरोबर निष्फलता उत्पन्न होते. त्यामुळे शरीरात ईस्ट्रोजेनचा अभाव निर्माण होऊन रजोनिवृत्ती उत्पन्न होते.
साधारणतः 40शी नंतर पूर्ण वर्षभर जर मासिक स्त्राव आला नसेल तर निश्चितपणे रजोनीवृत्ती सुरु झाली असे म्हणता येईल. रजोनिवृत्ती 40 ते 55व्या वर्षी प्रामुख्याने आलेली आढळते. रजोनिवृत्ती काळाचे सरासरी वय हे 47 वर्ष इतके आहे. येथे रजोनिवृत्ती काय आहे, रजोनिवृत्ती का व कधी होते, त्याची लक्षणे व रजोनिवृत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी अशी उपयुक्त माहिती मराठीत सांगितली आहे.
रजोनिवृत्तीची लक्षणे काय आहेत..?
शारीरीक, मानसिक आणि भावनिक स्तरावर रजोनिवृत्तीमध्ये खालिल लक्षणे उत्पन्न होतात.
- शारीरीक थकवा जाणवणे,
- अंगदुखी, डोकेदुखणे, कंबर आणि सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे,
- अनुत्साह, आळस येणे,
- चिडचीड होणे,
- छातीत धडधडणे,
- त्वचा कोरडी होणे,
- हाडे ठिसूळ होणे,
- भुक मंदावणे,
- झोप न लागणे ही लक्षणे रजोनिवृत्तीमध्ये व्यक्त होऊ शकतात.
रजोनिवृत्तीमध्ये स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी..?
- रजोनिवृत्तीची भीती मनातून काढून टाकावी.
- रजोनिवृत्ती ही एक स्वाभाविक अवस्था असून त्याविषयी भयभीत होण्याचे काहीच कारण नाही.
- रजोनिवृत्तीमध्ये आहाराकडे विशेष ध्यान देणे आवश्यक असते. पौष्टिक, सहज पचणारा आहार घ्यावा.
- हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा.
- या अवस्थेमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे आहारात कैल्शियम युक्त पदार्थांचा समावेश ठेवावा. ऑस्टिओपोरीस ह्या हाडे ठिसूळ होणाऱ्या आजाराची माहिती जाणून घ्या..
- रजोनिवृत्ती अवस्थेमध्ये हलका व्यायाम करावा. नातवंदसमावेत खेळावे यांमुळे शारीरिक व्यायामासोबतच मनही रमून जाईल.
- सकाळ-संध्याकाळी फिरावयास जावे. योगासने करावीत.
- नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. महिलांनी कोणत्या वैद्यकीय तपासण्या करून घेणे आवश्यक आहे ते जाणून घ्या..
- मानसिक ताण, तणावापासून दूर राहावे, यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करावी. अध्यत्माची ओढ लावून घ्यावी. विविध कादंबऱ्या, पुस्तके वाचावीत, आपल्या आवडीचा छंद जोपासावा.
Read Marathi language article about Menopause.