ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय व हाडे ठिसूळ होणे यावरील उपचार – Osteoporosis in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

हाडांचा ठिसूळपणा – Osteoporosis :

हाडे ठिसूळ होणे या समस्येला ‘ऑस्टिओपोरोसिस’ असे म्हणतात. ऑस्टिओपोरोसिस या स्थितीमध्ये आपल्या हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. यामध्ये हाडांच्या आतील घनता (बोन डेन्सिटी) कमी होत जाऊन हाडे पोकळ व ठिसूळ बनतात.

ऑस्टिओपोरोसिसमुळे ठिसूळ झालेली हाडे खूपच कमजोर होत असतात. यामुळे हाडांचे फ्रॅक्चर होणे, हाडे मोडणे या समस्या अधिक होऊ लागतात. तसेच गंभीर स्वरूपातील ऑस्टिओपोरोसिसमुळे रुग्णाला उभे राहणे किंवा चालणेही कठीण होऊ शकते.

ऑस्टिओपोरोसिस हा विकार कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो. त्यातही साठ वर्षापुढील व्यक्ती आणि महिलावर्ग यांमध्ये हाडे ठिसूळ बनण्याचे प्रमाण हे अधिक आहे.

ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे – Osteoporosis symptoms :

ऑस्टिओपोरोसिस असूनही काहीवेळा सुरवातीला कोणतीही लक्षणे जाणवतसुद्धा नाहीत. मात्र छुप्या स्वरूपात हा विकार हाडे ठिसूळ करण्याचे कार्य हळूहळू करीतच असतो. आणि जेंव्हा पाहिले फ्रॅक्चर होते तेंव्हा, ऑस्टिओपोरोसिसची समस्या असल्याचे लक्षात येते. त्यामुळेचं ऑस्टिओपोरोसिसला ‘सायलंट किलर’ असेही म्हणतात.

ऑस्टिओपोरोसिसमध्ये खाली दिलेली काही लक्षणे जाणवू शकतात.
• पाठ व कंबरदुखी,
• हाडांमध्ये वेदना होणे,
• हाताची पकड सैल पडणे,
• नखे कमकुवत आणि ठिसूळ होणे,
• छोट्यास्या धक्यानेही हाडे फ्रॅक्चर होणे,
• पाठीला बाक येणे,
• उंची कमी होणे अशी लक्षणे ऑस्टिओपोरोसिसमध्ये असू शकतात.

ऑस्टिओपोरोसिस कोणाला होऊ शकतो..?

वयाच्या तिशीनंतर हळूहळू हाडांतील घनता (बोन डेन्सिटी) कमीकमी होत जाते. त्यामुळे उतारवयात ऑस्टियोपोरोसिसची समस्या होत असते. त्यामुळे 60 वर्षानंतरच्या व्यक्तींमध्ये ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका हा अधिक असतो. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर म्हणजे वयाच्या 45 ते 55 वर्षानंतर हार्मोनल बदलांमुळे ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका अधिक असतो.

हाडे ठिसूळ होण्याची कारणे – Osteoporosis causes :

• कुटुंबात ऑस्टिओपोरोसिसची अनुवंशिकता असणे,
• ‎आहारात कॅल्शियम व इतर पोषकतत्वांची कमतरता असणे,
• ‎‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता,
• ‎अयोग्य आहारामुळे जसे जंकफूड-फास्टफूड आणि मैद्याचे पदार्थांचे अधिक सेवन करणे,
• ‎बैठी जीवनशैली,
• शारीरिक हालचाल व व्यायामाचा अभाव,
• ‎मद्यपान, धुम्रपान व तंबाखुजन्य पदार्थांच्या व्यसनांमुळे,
• ‎हाडांचा कर्करोग किंवा हायपरथायरॉईडीझम यासारख्या आजारांमुळे,
• स्त्रियांमध्ये लवकर रजोनिवॄत्ती (मेनोपॉज) आल्यामुळे,
• ‎कॉर्टिकोस्टेरॉईड्स व मुत्रल औषधांच्या दुष्परिणामांमुळे हाडे ठिसूळ होण्याची अधिक शक्यता असते.

ऑस्टिओपोरोसिसचे निदान असे केले जाते :

ऑस्टिओपोरोसिसचे निदान करण्यासाठी हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी तपासली जाते. या चाचणीला बोन डेन्सिटोमेट्री किंवा ड्युअल-एनर्जी एक्स-रे absorptiometry (DEXA स्कॅन) असे म्हणतात. ह्या डेक्झा स्कॅनमुळे मनगट, खुभा (hips) किंवा मणक्यांमधील हाडांची घनता तपासली जाते. या चाचणीस 10 ते 30 मिनिटे लागू शकतात. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. याशिवाय काही ब्लड टेस्टसुद्धा कराव्या लागू शकतात.

ऑस्टिओपोरोसिसवर असे करतात उपचार – Osteoporosis treatments :

ऑस्टियोपोरोसिस असल्याचे निदान झाल्यास यावरील उपचारासाठी आपले डॉक्टर बिस्फॉस्फोनेट्स यासारखी औषधे देतील. तसेच जीवनशैलीमध्ये बदल करण्याच्या सूचना देतील. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D साठी कोणता आहार घ्यावा, व्यायाम कसा व कोणता करावा याविषयी सूचना देतील. औषधे, योग्य आहार आणि व्यायाम याद्वारे ऑस्टियोपोरोसिसची समस्या आटोक्यात ठेवली जाते.

ऑस्टिओपोरोसिस आणि आहार – Osteoporosis diet chart :

योग्य आहार घेतल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत होत असते. त्यामुळे हाडे निरोगी राहण्यासाठी, आपल्याला दररोजच्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-D अशी पोषकतत्वे असणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील हाडे मजबूत राखण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे आणि आहारातून घेतलेले कॅल्शियम हाडांमध्ये जाण्यासाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक असते. याशिवाय आहारात प्रोटिन्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-K आणि जस्त यांचा समावेश असणेही गरजेचे असते.

हाडे ठिसूळ झाल्यास काय खावे..?
आहारात दूध व दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, कडधान्ये, सुकामेवा, मांस, मासे, अंडी, तीळ, मेथीचे दाणे, पालक, नाचणी अशा पदार्थाचा आहारात समावेश करावा. बकऱ्याच्या पायापासून बनवलेला पाया सूपही पिणे उपयुक्त ठरते. अशा पदार्थांतून कॅल्शियम, प्रोटिन्स व इतर पोषकघटकही मिळतात.

सर्वसाधारणपणे आपल्या शरीराला 1000 मिलिग्रॅम कॅल्शिअमची दिवसाला गरज असते. मात्र आपल्याकडच्या चुकीच्या आहारपद्धतीमुळे ती केवळ 300 ते 500 मिलिग्रॅम इतकीच मिळते. ही कमतरता भरून काढण्यासाठी दररोज दीड कप दूध किंवा दही यांचा आहारात समावेश करावा.

आपण कितीही कॅल्शियम वाढवण्यासाठी आहार किंवा गोळ्या घेत असल्यास त्या कॅल्शियमचे आपल्या हाडांत शोषणही होणे गरजेचे असते. घेतलेले कॅल्शियम असल्यास हाडांत जाण्यासाठी व्हिटॅमिन-D ची गरज असते. व्हिटॅमिन-D विषयी अधिक माहिती जाणून घ्या..

हाडे ठिसूळ झाल्यावर काय खाऊ नये..?
फास्टफूड, जंकफूड, चरबी वाढवणारे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, कोल्ड्रिंक्स खाणेपिणे टाळावे. तसेच हाडांच्या आरोग्यासाठी मद्यपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

ऑस्टिओपोरोसिस आणि व्यायाम :

केवळ पोषक आहार घेतल्याने हाडे मजबूत होऊ शकत नाही. हाडांच्या बळकटीसाठी ‎नियमित व्यायाम करणेदेखील खूप महत्वाचे असते. चालण्याचा व्यायाम, सायकलिंग, पायऱ्या चढणे उतरणे, योगासने हे व्यायाम करावेत. दररोज किमान अर्धा तास चालण्यास जावे. मात्र जास्त वजनदार व्यायाम करू नयेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 मिनिटे बसावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन-D ची कमतरता दूर होईल व आपली हाडे मजबूत होतील.

हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

वयाच्या तिशीनंतर आपल्या हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होऊ लागते. त्यामुळे या वयापासून योग्य आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे. ऑस्टिओपोरोसिस होऊ नये म्हणून काय करावे, कोणती काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.
• कॅल्शियम व व्हिटॅमिन-D युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
• सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 मिनिटे बसा.
• नियमित व्यायाम करावा.
• किमान अर्धा तास चालण्यास जावे.
• चालणे, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, मैदानी खेळ, योगासने हे व्यायाम करावेत.
• लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
• स्मोकिंग आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
अशी काळजी घेतल्यास ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा..
संधीवाताचा त्रास माहिती व त्यावरील उपाय
आमवात आजाराची माहिती व उपचार

4 Sources