Dr. Satish Upalkar’s article about Cataract or Motibindu causes, symptoms, diagnosis and treatment in Marathi.

मोतीबिंदू म्हणजे काय..?

Cataract Information in Marathi
मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो. आज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक प्रमुख कारण ठरत आहे.

मोतीबिंदू होण्याची कारणे – Causes of Cataract in Marathi :

कशामुळे होतो मोतीबिंदू, त्याची कारणे पुढीलप्रमाणे असतात.

  • मोतीबिंदू हा विकार प्रामुख्याने उतारवयात जास्त प्रमाणात आढळतो. तर मधुमेहामुळे मोतीबिंदू हा तरुणपणी ही होऊ शकतो. काही बालकांमध्ये जन्मतःच मोतीबिंदूही असतो.
  • ‎सतत प्रखर प्रकाशात, सतत उन्हात काम करण्यामुळे,
  • ‎मधुमेह, हाय ब्लडप्रेशर सारख्या विकारामुळे,
  • ‎स्टिरॉईड, अँटी-बोयोटिक्स यासारख्या औषधांच्या दीर्घकालीन दुष्परिणामामुळे,
  • ‎धुम्रपान, दारू यांच्या व्यसनांमुळे,
  • ‎तसेच स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टीव्ही यांच्या अतिवापरामुळे अकाली मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मोतीबिंदू लक्षणे – Cataract Symptoms in Marathi :

  • मोतीबिंदूमध्ये नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. सर्व काही अस्पष्ठ दिसते.
  • ‎रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे, रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वर्तुळे दिसतात.
  • ‎प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश सहन होत नाही.
  • ‎वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double Vision).
  • ‎चष्म्याचा नंबर सारखा सारखा बदलत असतो.

मोतीबिंदू होऊ नये यासाठी उपाय – Cataract Prevention in Marathi :

मोतीबिंदू टाळण्यासाठीचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

  • डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.
  • ‎डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यानी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.
  • ‎डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.
  • ‎उन्हात काम करताना दर्जेदार गॉगल्स घाला.
  • ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे उदा. गाजर, बीट, टोमॅटो इ. खावीत.
  • ‎टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा.
  • ‎कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

मोतीबिंदूवरील उपचार – Cataract Treatments in Marathi :

औषधाने मोतीबिंदू घालवणे शक्य नाही. मोतीबिंदूमध्ये डोळ्यांतील भिंग अपारदर्शक झाल्यामुळे नजर कमी होते. यावर उपाय म्हणून शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम भिंगरोपण करणे आवश्यक आहे.

पूर्वी मोतीबिंदू काढून जाड भिंगाचा दिला जात होता. आता डोळ्यातील मोतीबिंदू काढल्यानंतर त्या जागेवर कृत्रिम भिंगरोपण केली जाते. या भिंगाने चष्म्याची गरजच राहिली नाही. या शस्त्रक्रियेच्या दोन पध्दती आहेत.

साधी टाक्याची पध्दत –

यात बुबुळाच्या परीघाला छेद घेऊन आतला मोतीबिंदू अख्खा काढतात. या जागी आता नवीन कृत्रिम भिंग बसवतात. या शस्त्रक्रियेत छेद मोठा असल्यामुळे टाके टाकावे लागतात. हे टाके जखम भरायला थोडे दिवस लागतात. ही पध्दत सरकारी रुग्णालयात जास्त प्रमाणात वापरली जाते.

बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract surgery) –

फेकोम्युलसिफिकेशन या आधुनिक उपचार पद्धतीने डोळ्याला भूल देऊन अथवा भूलेचे इंजेक्शन न देतासुद्धा ही शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये छेद फक्त 3-5 मि.मी.चा असतो. या आधुनिक तंत्राने मोतीबिंदू लहान छेदातून काढतात व त्या ठिकाणी कृत्रिम भिंग बसवतात. हे भिंग घडी करून आत सरकवले जाते व आत ते उघडते.

ह्या पद्धतीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

  • दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत शस्त्रक्रिया पूर्ण होते.
  • ‎या तंत्रामुळे छेद लहान असतो व जखमेला टाके लागत नाहीत.
  • ‎यात सूक्ष्म छेद असल्यामुळे आणि टाके नसल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता कमी असते. टाके नसल्यामुळे जखम लवकर भरते. तसेच शस्त्रक्रियेनंतर डोळा लाल होणं, डोळ्यातून पाणी येण्याचं प्रमाण खूप कमी असते.
  • ‎शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला लगेच घरी जाता येते. या शस्त्रक्रियेनंतर दूरच्या नंबरचा चष्मा लागण्याचे प्रमाण ही ‌अतिशय कमी आहे.
  • ‎शस्त्रक्रियेनंतर सुमारे 98% लोकांना पूर्णपणे दृष्टीलाभ होतो. त्यामुळे ही पद्धत जास्त प्रमाणात आज अनेक हॉस्पिटलमध्ये वापरली जाते.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि येणारा खर्च – Cataract Surgery cost :

महाराष्ट्रात पुणे, मुंबई येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी साधारण 16,000 ते 30,000 रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.

डोळ्यांच्या अन्य आजारांविषयीही माहिती जाणून घ्या..

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...