डोळे लाल होणे – Eye redness :

अनेकांना डोळे लाल होण्याचा त्रास होत असतो. वाढलेले प्रदूषण व धुळीमुळे डोळे लाल होण्याच्या त्रासाने आज अनेकजण त्रस्त झालेले आहेत. डोळ्यातील हा लालसरपणा संपूर्ण डोळ्यावर किंवा डोळ्याच्या अगदी कडेला असू शकतो.

डोळे लाल होण्याची कारणे –

कडक उन्हात फिरणे, प्रदूषण, धूळ-धूर यांच्या संपर्कात आल्यामुळे प्रामुख्याने डोळे लाल होत असतात. याशिवाय खालील कारणे सुद्धा डोळे लाल होण्यासाठी जबाबदार असतात.

 • डोळ्यातील इन्फेक्शन किंवा जंतुसंसर्ग झाल्यामुळे डोळे लाल होत असतात.
 • डोळे खाजवल्याने डोळे लाल होत असतात.
 • अँलर्जीमुळे डोळे लालसर होत असतात.
 • डोळे कोरडे पडण्याच्या समस्येमुळे डोळे लाल होऊ शकतात.
 • एखादी बाहेरील वस्तू (फॉरन बॉडी), धुळ, कचरा, मेकअप वैगेरे डोळ्यात गेल्यामुळे डोळे लाल होत असतात.
 • डोळ्याला इजा झाल्याने डोळे लालसर होऊ शकतात.
 • हाय ब्लडप्रेशरमुळे डोळे लालसर होऊ शकतात.
 • डोळ्यातील रक्तवाहिनी फुटल्याने देखील डोळे लाल होत असतात. अशावेळी तातडीने उपचार होणे गरजेचे असते.
 • पापण्या सूजल्यामुळे म्हणजेच ब्लेफेरिटिसमुळे डोळे लाल होत असतात.
 • काचबिंदू, कॉर्नियल अल्सर, युव्हिटिस, स्क्लेरायटिस, डोळे येणे अशा डोळ्यांच्या विविध आजारामुळे डोळे लाल होऊ शकतात.
 • कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत असल्यास त्यामुळेही डोळे लाल होऊ शकतात.
 • स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यांचा डोळ्यांना ताण येईपर्यंत अतिवापर करण्यामुळे डोळे लाल होत असतात. स्मार्टफोनवर सातत्याने डोळे ताणून व्हिडीओ बघणे, गेम्स खेळत राहणे. ही आजच्या डिजिटल काळातील डोळे लाल होण्याची, डोळ्याचे आरोग्य बिघडवणारी प्रमुख कारणे आहेत.

अशा विविध कारणांनी डोळे लाल होत असतात.

डोळे लाल होणे यावर उपाय :

 • डोळे लाल होत असल्यास फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे. हा उपाय केल्याने डोळ्यांना आराम मिळून डोळे लाल होणे थांबते.
 • डोळे लाल होत असल्यास बटाट्याचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे. हा उपाय देखील डोळे लाल होणे यावर उपयोगी पडतो.
 • डोळे लाल होण्याची समस्या असल्यास गुलाबजलात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावेत.
 • एक थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही डोळ्यातील लालसरपणा दूर होण्यास मदत होते.
 • एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा डोळ्यावर काही वेळ ठेवावा. या उपायामुळेही डोळे लाल होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

डोळे लाल होऊ नये यासाठी घ्यायची काळजी :

 • डोळे किमान दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवावेत.
 • प्रदूषण व फॉरन बॉडीजपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी दर्जेदार गॉगलचा वापर करा.
 • नेहमी डोळ्यांची अधुनमधून उघडझाप करा. डोळ्यांचा व्यायाम करा. (डोळ्यांचा व्यायाम कसा करावा हे आपल्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या)
 • कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास ते नियमितपणे स्वच्छ करा. रात्रभर कॉन्टॅक्ट लेन्स घालू नका.
 • स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा.
 • जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा. कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.
 • जर डोळ्यांतील लालसरपणा कमी न झाल्यास आपल्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आयड्रॉप्स व औषधे घ्यावीत..
अनेकजण अचानकपणे डोळे लाल दिसायला लागले की मेडिकलमधून परस्पर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयड्रॉप्स आणि औषधे घेतात. मात्र असे करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. परिणामी अंधत्व येण्याचाही धोका असतो. त्यामुळे आपल्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नेहमी आयड्रॉप्स व औषधे घ्यावीत.

डोळे लाल होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका..
डोळे लाल होण्याचा त्रास हा वरवर जरी साधा वाटत असला तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरात छुप्या स्वरूपात (Silent Killer) असलेल्या हाय ब्लडप्रेशरमुळेही डोळे लाल होण्याचा त्रास होत असतो. अशा स्थितीत डोळ्यात रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

तसेच काचबिंदूसारख्या (Gaulcoma) विकारात अचानकपणे डोळ्याच्या बुब्बुळाभोवतीचा भाग लाल होतो. डोळ्याच्या ठिकाणी तीव्र वेदना होत असतात, नजर अस्पष्ट होते. प्रसंगी अंधत्वही येऊ शकते. काचबिंदू विषयी अधिक माहिती जाणून घ्या.

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा..?

 • बरेच दिवस डोळे लाल होण्याची समस्या असल्यास,
 • डोळ्यांनी स्पष्ट दिसत असल्यास,
 • डोळ्यात वेदना होत असल्यास,
 • उजेड सहन होत नसल्यास,
 • डोळ्यांना इजा झाल्याने डोळे लाल झाले असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

डोळे लाल होण्याच्या छोट्याशा लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास असे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे जर डोळे लाल होत असतील तर ते नेमके कशामुळे होत आहेत? हे पाहण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञांना दाखवून घ्यावे.

हे सुध्दा वाचा – डोळ्यांची जळजळ होण्याची कारणे व उपाय जाणून घ्या.

Read Marathi language article about Eye redness Causes, Treatments and solutions. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.