उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

उच्च रक्तदाब म्हणजे काय..?

बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आज अनेकांना होत आहे. रक्तदाब हा 140/90 mm Hg पेक्षा अधिक असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात.

उच्च रक्तदाब असल्यास त्यावर वेळीच योग्य उपचार करून रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. कारण रक्तदाब वाढल्यास हृदयविकार, हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी येथे रक्तदाब कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत यांची माहिती दिली आहे.

उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी हे करावे उपाय :

योग्य आहार घ्यावा –
आहारातील तेला-तुपाचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, खारट पदार्थ, लोणची, पापड, चरबीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. चहा, कॉफीही वारंवार पिणे टाळावे.

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. केळी, मनुका, पालक भाजी यासारख्या पोटॅशियम मुबलक असणाऱ्या आहाराचा समावेश करावा.

मीठाचे प्रमाण कमी करा –
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. एका दिवसामध्ये 2.5 gm (2500 mg) पेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. यासाठी जेवनाव्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या पाकीटावरील सोडियमचे प्रमाणही तपासावे.

पुरेसे पाणी प्यावे..
दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, रक्तातील अशुद्धी दूर होते, लघवीस साफ होऊन किडनीचे आरोग्यही चांगले राहते पर्यायाने रक्तदाब आटोक्यात राहतो.

वजन आटोक्यात ठेवावे..
वजन जास्त असल्यासही रक्तदाब वाढत असतो. यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे. नियमित व्यायाम, योगासने करावी. यामुळे वजन आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. दररोज सकाळी अर्धा तास चालण्यास जावे. सायकलिंग, एरोबिक व्यायाम, स्विमिंग, पायऱ्या चढणे हे व्यायाम करावेत. व्यायाम कसा करावा हे जाणून घ्या..

मानसिक ताण घेऊ नये –
अचानक बसलेला मानसिक धक्का, भीती, राग, टेन्शन आदी मानसिक कारणांचा परिणाम निश्चितपणे रक्तदाबावर होत असतो. या मानसिक कारणांमूळे रक्तदाबामध्ये 20 ते 30 mm Hg पर्यंत वाढ होते. यासाठी नियमित ताण-तणाव रहित राहावे. मानसिक तणावापासून दूर राहाण्यासाठी ध्यान-धारणा करावे. तसेच पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. जागरण करणे टाळावे.

व्यसनांपासून दूर राहा –
मद्यपान, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्याबरोबरच उच्च रक्तदाबाची समस्याही होत असते. रक्तदाब अधिक असल्यास सिगारेटचे व्यसन करणे अत्यंत धोकादायक असून यामुळे हार्ट अटॅक, लकवा याचा धोका वाढतो. यासाठी रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यसन करणे ठाळावे.

रक्तदाब कमी करण्यासाठी हे आहेत घरगुती आयुर्वेदिक उपाय :

लसूण –
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी लसणीच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. लसणीमुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते व धमनीकठिण्यता हा विकार होत नाही. आहारातही लसूणचा वापर वाढवावा. लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करून 5 मिनिटे तशाच ठेवाव्यात त्यानंतरचं ते तुकडे खावेत. असे करण्याने लसूण मधील रक्तदाब नियंत्रित करणारा Alliinase हा उपयुक्त घटक त्यामधून मिळतो.

कांदा –
अर्धा चमचा कांद्याचा रसात अर्धा चमचा मध मिसळावे. हे मिश्रण सकाळी व रात्री या मिश्रणाचे चाटण करावे. कांद्याच्या रसात Quercetin हे अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

आले –
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज आल्ल्याचा छोटासा तुकडाही खाऊ शकता.

लिंबू रस –
कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक होतात आणि रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.

बदाम –
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी सोलून खाऊ शकता. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात येतो.